computer

डांबराच्या गोळ्या कपाटात ठेवणं हानिकारक का आहे ? ते टाळण्यासाठीचे हे उपायही माहित आहेत ना?

तुमच्या कपाटाचं दार उघडल्यावर एकदम उग्र दर्प येतो? किचन सिंक, वॉश बेसिन या इतर ठिकाणीदेखील सतत ओल असल्यामुळे वास येतो आणि तिथून निघून जावंसं वाटतं? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील तर यावर उपाय म्हणून डांबराच्या गोळ्या वापरणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असणार. घरातील वाळवी आणि अनेक प्रकारचे कीटक यांच्यासाठी डांबराच्या गोळ्या एक प्रभावी कीटकनाशक म्हणून वापरल्या जातात. याचा वापर मुख्य:त्वेकरून विशेष प्रसंगी वापरण्यात येणारे कपडे, लोकरी वस्त्रं या ठिकाणी केला जातो. याच्या वापराने उग्र दर्प कमी होण्यास किंवा ठेवून दिलेल्या कपड्यांना लागणारी कसर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या कपड्यांचा आनंद आपण दीर्घकाळासाठी घेऊ शकतो. पण हे फायदे जरी असले तरी या गोळ्या माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत हे माहिती आहे का?

डांबराच्या गोळ्या म्हणजे काय?

डांबराच्या गोळ्यांचा वापर केलेल्यांना डांबराच्या गोळ्या म्हणजे काय हे माहीत असतंच. थंडीच्या दिवसात लोकरीचे कपडे कपाटातून बाहेर काढले जातात. कपड्यांच्या घड्यांमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोल फुगीर अशा डांबराच्या गोळ्या ठेवलेल्या असतात. त्या ठेवलेल्या नसतील तर कपड्यांना लहान छिद्रं पडू शकतात. याशिवाय विशेषप्रसंगी वापरावयाचे कपडे डांबराच्या गोळ्यांविना ठेवले गेले, तर घडीच्या ठिकाणी ते कपडे विरण्याची शक्यता असते. हे किटक परजीवी असल्यामुळे कपडे लवकर खराब होतात. काही ठिकाणी बुरशी, पतंगासारखा किडा यांच्यातून निर्माण होणाऱ्या रसायनांपासून बचाव करण्यासाठी डांबराच्या गोळ्या वापरल्या जातात.

डांबराच्या गोळ्या कशापासून बनवतात?

सुरुवातीच्या काळात डांबराच्या गोळ्या या निरनिराळ्या रसायनांपासून बनवत. या रसायनांच्या विषारी स्वरूपामुळे पुढे त्यांच्या घटकांत बदल होत गेला. पूर्वी डांबराच्या गोळ्या डांबरापासून बनत. हे डांबर पूर्वी कीटकनाशक म्हणून वापरत. त्यामुळे घरात विषारी वायू पसरत असे. शिवाय त्यातील रासायनिक घटक ज्वलनशील होते. आज डांबराच्या गोळ्यांत डांबराऐवजी १,४-डायक्लोरोबेंझीन हे रसायन वापरलं जातं. यालाच सौम्य स्वरूपाचं डांबर म्हणतात. कारण त्याची ज्वालाग्राही क्षमता कमी असते. असं असूनही कपडे संरक्षित करण्याची त्याची क्षमता डांबराइतकीच आहे. मात्र १,४-डायक्लोरोबेंझीन मनुष्य आणि प्राणी या दोघांसाठीही हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते हे रसायन शरीरात गेल्यास त्यापासून इतर संयुगं तयार होतात आणि ती यकृतासारख्या अवयवांना आणि पेशींना नुकसान पोहोचवतात.

या गोळ्या कसं काम करतात?

गोळ्यांमधील रसायनांच्या वाफेतून निर्माण झालेल्या वायूमुळे कपड्यांवर जगणारे कीटक आणि त्यांच्या अळ्या मारल्या जातात. या गोळ्यांच्या चुकीच्या वापरामुळे किंवा त्यांच्या संपर्कात जास्त काळ आल्यामुळे डोकेदुखी, मळमळ, नाकाची आणि डोळ्यांची आग, क्वचित प्रसंगी खोकला हे त्रास होऊ शकतात. तसंच कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. या गोळ्यांमुळे मूत्रपिंड, यकृत इत्यादी अवयवही खराब होऊ शकतात. त्यामुळे यांचा वापर करताना पुरेशी खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. यासाठी,

-हिवाळ्यात घालायच्या कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवाव्यात.

-हे कपडे हवाबंद किंवा बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होणार नाही अशा पॉलिथिन लॉंड्री बॅग्ज, साडी कव्हर अशा ठिकाणी व्यवस्थित बंद करून ठेवावेत.

-कपडे वापरण्याच्या किमान दोन दिवस आधी ते बाहेर काढून ठेवावेत.

-कपडे काढल्यावर त्याच्यातील गोळ्या काढून घ्याव्यात, यामुळे त्याच्यात निर्माण झालेला रसायनयुक्त वास कमी होईल.

-गोळ्या काढल्यानंतर कपडे लगेच वॉशिंग मशीनमध्ये टाकू नयेत. कारण त्यामुळे इतर कपड्यांना हा वास लागण्याची शक्यता वाढते.

प्रमुख्याने या गोळ्यांमुळे आलेला वास हा उग्र रासायनिक वास असतो. हा वायू हा चार ते सहा आठवड्यांपर्यंत टिकतो. अगदी दुर्मिळ परिस्थितीत हा वास वर्षभर टिकतो. या वासाचे शरीरावर होणारे गंभीर परिणाम बघता या वासापासून सुटका कशी करून घ्यायची हा प्रश्न डोक्यात येणं अगदी स्वाभाविक आहे. हा वास घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रकार करता येतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे कापराच्या वड्यांचा उपयोग करणं. हा प्रकार नवीनच आला असून लोकप्रिय आहे. या प्रकारामुळे हानिकारक वायू निर्माण होऊन हवेत सोडले जात नाहीत. गोळ्यांचा हा प्रकार हवेचं प्रदूषण थांबवतो. त्यामुळे पुढे शरीरावर संभाव्य दुष्परिणाम होत नाहीत. आज बाजारात हवा शुद्ध करणारे अनेक प्युरिफायर्स उपलब्ध असले तरी हा प्रकार चलतीत असण्याचं हे कारण आहे.

या गोळ्यांचे काही फायदे असले तरी बाजारात रस्त्यावर मिळणाऱ्या गोळ्या मात्र बिनकामाच्या असतात. डांबर हा संप्लवनशील पदार्थ आहे. तो वितळत नाही, तर घनरुपातून थेट वायूरूपात जातो. पण या कमअस्सल गोळ्या वितळतात आणि आपले मोलाचे-ठेवणीतले कपडे डाग पडून खराब होतात. कितीही प्रयत्न केले तरी हे डाग काही जात नाहीत. या कपड्यांत लग्नाचे शालू वगैरे असतील तर मग कपडेही जातात आणि आठवणीही कटू होतात.

डांबराच्या गोळ्यांचे फायदे आणि तोटे या एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यामुळे हवा असलेला परिणाम साधण्यासाठी एका बाजूला त्यांचा मर्यादित वापर करून होणारे घातक परिणाम शक्य तितके कमी करणं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वापराने कपड्यांचा टिकाऊपणा वाढवणं, घरातील उग्र वास कमी करणं यांचा समतोल साधायला हवा. नाही का?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required