कावीळ आणि हेपॅटायटिसमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या या रोगाची लक्षणे आणि उपाय!!

सर्वसाधारणपणे आपण हेपॅटायटीस आणि कावीळ हे शब्द एकाच अर्थाने म्हणजे कावीळ अशा अर्थाने वापरतो. अर्थात त्याला कारणही आहेच.  हेपॅटायटीसची लागण झाल्यावर डोळे पिवळे होणं, लघवी पिवळी होणं आणि कावीळ जास्तच असेल तर त्वचा पिवळी पडणं वगैरे  काविळीची लक्षणंच आपल्या नजरेस येतात. आज आम्ही तुम्हाला हेपॅटायटीस -ए किंवा हेपॅटायटीस-बी असे प्रकार आणि सोबत कावीळ या विषयी थोडी माहिती देणार आहोत.

संपत आलेला उन्हाळा, सोबत घटत असलेल्या पाण्याचा साठा आणि एखादं-दुसरी मान्सूनपूर्व पावसाची सर अशा वातावरणात हेपॅटायटीसच्या साथीला सॉलीड जोर येतो. पण सर्वप्रथम आपण समजून घेऊ या कावीळ आणि हेपॅटायटीस या दोन शब्दांमधला फरक!

लिव्हरला आलेली सूज म्हणजे हेपॅटायटीस!
एक सोपा वैद्यकीय संकेत आधी समजून घेऊ या. ज्या शब्दाच्या शेवटी itis ही अक्षरे येतात ती 'सूज' दर्शवतात. उदाहरणार्थ मॅनेनजायटीस - मेंनेंजेस म्हणजे मेंदूचे आवरण, त्याला आलेली सूज म्हणजे मॅनेनजायटीस.  घशाला म्हणजे फॅरींक्सला आलेली सूज म्हणजे फॅरींजायटीस.  याच धर्तीवर लिव्हरला आलेली सूज म्हणजे हेपॅटायटीस. हेपॅ हा शब्द लिव्हरच्या सर्व स्थितीत वापरला जातो.  तर अशा या हेपॅटायटीसमुळे लिव्हर म्हणजेच यकृतामधून रक्तात बिलिरुबिन या घटकाचे प्रमाण वाढते आणि जी लक्षणे दिसतात ज्याला आपण कावीळ म्हणतो. 

स्रोत

थोडक्यात लक्षणे म्हणजे कावीळ आणि मूळ रोग म्हणजे  हेपॅटायटीस!

हेपॅटायटीस होतो व्हायरसमुळे. या व्हायरसच्या अनेक प्रजाती आहेत. या प्रजातींना A-B-C-D-E अशी नावे आहेत. ज्या प्रजातीमुळे हा रोग होतो त्याप्रमाणे त्याचे वर्गीकरण होते. उदाहरणार्थ ,जर B व्हायरसमुळे हेपॅटायटीस झाला असेल तर त्याला हेपॅटायटीस-बी म्हटले जाते. तर मग अशी सूज आली तर यकृताच्या सर्व कामगिरीवर परिणाम होतो. मग आपल्या शरीरात अन्नपचनासाठी उपयुक्त bile म्हणजे पित्तरस तयार करणे, अतिरिक्त ग्लुकोजचा साठा करणे, शरीरातली विषे बाहेर टाकणे ही सर्व यकृताची कामे मंदावतात. परिणामी रक्तात बिलिरुबिन वाढत जाते. हे उत्सर्जित बिलिरुबिन लाल रक्तपेशींचे कार्य बंद पाडते आणि रुग्णाला मृत्यूकडे नेते.

 मंडळी, आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी या रोगाची लक्षणे कशी ओळखावी, त्याचा प्रतिबंध कसा करावा हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या त्या वातावरणात आणि त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात या रोगासंबंधी आपण सर्वांनी जास्त जागरूक असायला हवे. सध्याचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे व्हायरसची उत्पत्ती होण्यास अनुकूल असते. पाण्याचा शिल्लक साठा तळागाळातला असतो. सांडपाण्याचे प्रमाण मात्र तितकेच असते. पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळले तर हेपॅटायटीसची लागण झालीच असे समजा.

(हिपॅटायटिसने बाधित यकृत असे दिसते - स्रोत)

भूक आणि अन्नावरची इच्छा उडणे. वारंवार मळमळ जाणवणे, उलटी होणे, पोटात दुखणे, पिवळीजर्द लघवी होणे, डोळ्यांत पिवळसर रंग येणे ही हेपॅटायटीसची लागण झाल्याची सर्वसामान्य लक्षणे आहेत. मात्र, व्हायरसच्या प्रकारानुसार कावीळ कमी जास्त होते. हेपॅटायटीस-ए  चा संसर्ग झाला तर काही आठवड्यांत तो आपोआप कमी होतो. हेपॅटायटीस-बी आणि सी हे दोन्ही क्रॉनिक म्हणजे शरीरात मुरू शकतात, जुनाट होतात, त्यामुळे कावीळ पुन्हा होऊ शकते.  हेपॅटायटीस बी आधीच शरीरात संक्रमित असेल तरच हेपॅटायटीस-डी चा संसर्ग होतो. हेपॅटायटीस-इ पण काही दिवसांनी बरा होतो.
 या व्हायरल हेपॅटायटीससाठी प्रतिबंधक लशी उपलब्ध आहेत. जर तुमच्या आसपास असेल एखाद-दुसरा  रुग्ण असेल तर रोग व्हायची वाट न पाहता लस टोचून घेणे हितावह असेल. पाणी उकळून पिणे, पूर्णतः शिजलेले अन्न खाणे हे सर्वसाधारण उपाय पण हेपॅटायटीसला रोखू शकतात. घरातली रांगणारी बाळे, शाळेत जाणारी मुलं यांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मंडळी, सध्याच्या वातावरणात होऊ शकणाऱ्या हेपॅटायटीस आणि कावीळ याबद्दल इथे माहिती दिलीच आहे. या खेरीज अतिरिक्त मद्यपानामुळे होणारा अल्कोहॉलिक हेपॅटायटीस, टॉक्सिक हेपॅटायटीस, ऑटो इम्युन हेपॅटायटीस असेही आणखी हेपॅटायटीसचे विविध प्रकार आहेत.  पण भारतात हेपॅटायटीस ए, बी आणि इ चे वारंवार संक्रमण होत असते  म्हणून आपल्या वाचकांनी सावध असावे हा बोभाटाचा उद्देश आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required