computer

तुम्हांला संधिरोग झालाय की नाही हे कसे ओळखाल? ही माहिती वाचा, लक्षणं-उपाय-निदान जाणून घ्या

चाळिशीच्या आतबाहेर असताना कधीकधी पायाच्या किंवा हाताच्या बोटांपाशी किंवा गुडघे, घोटा, कोपर अशा ठिकाणी अचानक सूज येते, ठसठसणाऱ्या वेदना जाणवतात. रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे हे होते. या विकाराला गाउट किंवा संधिरोग असे म्हणतात.

संधिरोग हा आर्थ्रायटिस म्हणजे संधिवाताचाच एक प्रकार आहे. यात सांध्यांच्या अवतीभवती युरिक ऍसिडचे स्फटिक जमा होतात आणि त्यामुळे अचानक त्या जागी सांधेदुखी सुरू होते व सूज येते. हे स्फटिक शरीरात गुडघे, घोटा, कोपर, बोटे, अंगठा अशा ठिकाणी साचतात. हा विकार जास्त करून पुरुषांना होतो आणि साधारण तिशीनंतर उद्भवतो. स्त्रियांना मेनोपॉजमध्ये हा त्रास होण्याची शक्यता वाढते. ह्यामुळे येणारी सूज, लाली अचानक येते, ३-४ दिवस तशीच टिकून राहते आणि नंतर आपोआप नाहीशी होते. संधिरोगाचा प्रभाव पायाची बोटं, तळपायाचा खोलगट भाग, घोटा, गुडघा, बोटं, मनगट, कोपर या जागी जाणवतो.

संधिरोग कशामुळे होतो?

रक्तात अतिरिक्त प्रमाणात तयार झालेले युरीक ऍसिड हे संधिरोगाचे कारण आहे. हे ऍसिड लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. अतिरिक्त ऍसिडचे छोट्या अणुकुचीदार स्फटिकांमध्ये रूपांतर होते. हे स्फटिक सांध्यांपाशी साचून राहिल्याने त्याजागी वेदना, सूज उद्भवतात. याव्यतिरिक्त स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह, जवळच्या व्यक्तीस असलेला संधिवात, किडनीचे विकार, युरीक ऍसिड वाढवणारे अन्नपदार्थ, दारू व इतर अंमली पदार्थांचे सेवन, आंबट चवीचे पदार्थ यांमुळेही संधिरोगाचा विकार बळावतो. मुळात हा श्रीमंती विकार असून याला राजेरजवाड्यांचा रोग म्हणून ओळखले जाई.

संधिरोगाची लक्षणे

अनेक वेळा रुग्णांमध्ये पायाच्या बोटांना सूज येते. कधीकधी ती वाकडी होतात. सांध्यांमध्ये होणाऱ्या अचानक आणि तीव्र वेदना, सांध्यांना आलेली ताठरता, सूज, प्रभावित झालेल्या भागाचा रंग बदलून जांभळा, लाल होणे, सूज उतरल्यावर त्वचा खाजरी, पापुद्र्याप्रमाणे आणि ढलप्यासारखी होणे ही याची मुख्य लक्षणे आहेत. काही रुग्णांना तर त्या भागावर अंथरुण-पांघरूणही सहन होत नाही.
संधिरोगासारखाच परंतु तुलनेने सौम्य असणारा एक विकार म्हणजे स्युडो गाउट. यात कॅल्शियम पायरोफॉस्फेट या पदार्थाचे स्फटिक सांध्यांपाशी साचून राहिल्याने सौम्य स्वरूपाच्या वेदना होतात. हे स्फटिक गुडघ्यासारख्या मोठ्या सांध्यांपाशी जमा होतात.

संधिरोगाचे निदान

दुखणाऱ्या भागाचा एक्सरे, सोनोग्राफी यांच्या साह्याने त्या ठिकाणी संधिरोगाचे स्फटिक आहेत का याची तपासणी करता येते. जॉईंट फ्लुइड टेस्ट या चाचणीत प्रभावित झालेल्या भागातून सुईच्या मदतीने द्रव काढून घेऊन त्याची तपासणी करतात. याशिवाय रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाणही तपासता येते.

संधिरोगावरील उपाय

संधिरोग हा पुन्हापुन्हा डोके वर काढणारा विकार आहे. त्यामुळे त्यावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. जेव्हा वेदना सौम्य असतात तेव्हा केवळ आहारात बदल करून वेदनांवर नियंत्रण मिळवता येते. अल्कोहोलचे व गोड पदार्थांचे सेवन करू नये. व्यायाम व योग्य आहार घ्यावा. आहारात मीठासारखे क्षारयुक्त पदार्थ कमी खावेत. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. तज्ञांच्या सल्ल्यानी औषधोपचार करावेत. लघवी रोखून धरू नये. व्यायाम करावा आणि औषधे सुरू असताना मांसाहार, सीफूड संपूर्ण वर्ज्य करावे.

वेदनांपासून मुक्ती मिळाली तरी ती तात्पुरती असू शकते. त्यामुळे या विकारावर मुळापासून उपचार करणे चांगले.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required