computer

औषधाला दाद न देणारा डोंबिवली फिवर माणसाच्या कोणत्या चुकीमुळे उद्भवला? हे सहज टाळणं कसं शक्य होतं??

नव्वदीच्या दशकातला 'डोंबिवली फिवर' आठवतो का ? १९९० च्या दरम्यान डोंबिवलीत तापाच्या एका विचित्र साथीने कहर केला होता. या साथीला बळी पडणार्‍यांची लक्षणे म्हणजे फक्त ताप यायचा. सुरुवातीला १०० च्या आसपास असलेला ताप हळूहळू वाढत १०३ आणि पुढे जायचा. डॉक्टरांनी दिलेले कोणतेच औषध लागू पडायचे नाही. बर्‍याच दिवसाच्या तापानंतर इतर काँप्लीकेशन्स वाढत जायची आणि रोग्याचा जीव जायचा. त्यावेळी डोंबिवलीसारख्या  शहरात जनरल प्रॅक्टीशनर म्हणजे फॅमिली डॉक्टरांची कमतरता नव्हती. अनेक नावाजलेले स्पेशालिस्ट पण डोंबिवलीत होते. पण कोणाचाही फारसा इलाज चालायचा नाही. मग ही साथ ठाणे-मुंबईत पण पसरली. अनेक लोकांचे प्राण गेले. त्यात वय , राहणीमान, लिंग असा काही भेदभाव दिसत नव्हता. उपलब्ध असलेली सर्व प्रतिजैविके म्हणजे अँटिबायोटिक्स निष्फळ ठरली होती. मग काय होता हा साथीचा प्रकार? ते आज आपण जाणून घेणे फारच महत्वाचे आहे. 

रोगाच्या साथीमागे सामाजिक बदलांचा फार मोठा हात असतो. एक छोटेसे गाव असलेले डोंबिवली शहर कसे झाले हे आधी समजून घेऊ या. १९९०च्या आधीच्या दोन दशकात मुंबई बाहेरून आलेल्या, नोकरी करणार्‍या, सुशिक्षित लोकांना स्थायिक होण्यासाठी डोंबिवली आकर्षक वाटायला लागले होते. घरे स्वस्तात मिळायची. घरे भाड्यानेही सहज मिळायची. शाळा आणि दवाखाने होते. त्यामुळे ज्यांना मुंबईतल्या चाळीतल्या खोल्या विकून पैसे मिळायचे, त्यांना त्याच पैशात इथे जुन्या खोलीतून मोठा फ्लॅट मिळायचा. त्यानंतर आसपासच्या शेतात अनधिकृत चाळींचे पेव फुटले. साधारण तीसएक हजारात दोन खोल्या सहज मिळायच्या. थोडक्यात हे त्या काळचे "अ‍ॅफोर्डेबल हाऊसिंग" होते असे म्हणायला हरकत नाही.

पण ज्याप्रमाणात माणसं येत होती त्या प्रमाणात इतर सुविधा नव्हत्या. गटारे उघडी होती. कचर्‍याची विल्हेवाट उकीरड्यावर व्हायची. वस्ती वाढत होती, पण सार्वजनिक आरोग्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. नागरिकांनाही याची पर्वा नव्हती, कारण अर्धी डोंबिवली सकाळी मुंबईत जायची आणि रात्री झोपायला घरी यायची. याच दरम्यान शहरातल्या पिण्याचे पाणी पुरवणारे पाईप केवळ सोयीसाठी गटाराच्या आतूनही जायचे. याच पाण्याने डोंबिवलीचा घात केला. सांडपाणी आणि पेयजल बर्‍याच ठिकाणी एकमेकात मिसळले. त्यातून अनेक प्रकारचे रोग उद्भवले, पण त्याचे साथीत रुपांतर झाले नाही . अशीच काही वर्षे गेल्यावर 'डोंबिवली फिवर'ने मात्र अनेकांचे प्राण घेतले. याचा उलगडा प्रख्यात वैद्यकीय सल्लागारांना पण सुरुवातीला झाला नाही. आधी हा व्हायरस आहे, त्यावर काही उपाय नाही अशी मानसिकता तयार झाली. पण अंतिमतः सत्य बाहेर आलेच. पण तोपर्यंत अनेकांचे प्राण गेले होते. 

मग नक्की काय होता 'डोंबिवली फिवर'? 

'डोंबिवली फिवर' हा व्हायरस नव्हता. 'डोंबिवली फिवर' म्हणजे टायफॉइड होता. पण मग तो टायफॉइड होता तर त्यावरची सगळी प्रतिजैविके उपलब्ध होती, ती वेळोवेळी दिल्यावरही लोकांचे प्राण का गेले? दरवर्षी भारतात दिड-दोन कोटी माणसांना टायफॉइड होतो. मृत्युचे प्रमाणही स्थिरच आहे. प्रश्न असा आहे की डोंबिवलीतला 'टायफॉइड' असा काय वेगळा होता? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की हा टायफॉइड "ड्रग रेझीस्टंट" होता. म्हणजेच या टायफॉइडचे जंतू प्रतिजैविकांना दाद देत नव्हते. दाद न देण्याचे करण हे होते की त्यांना या अँटीबायोटीक्सची  सवय झाली होती. तेच ते अँटीबायोटीक वर्षानुवर्षे वारंवार मोठ्या प्रमाणावर वापरले की जंतूंना त्याची सवय होते. इथेही तेच घडले होते.

आता हे नेमके कसे आणि का होते हे पण समजून घ्या.

(टायफॉइडचे जंतू)

आधी जेव्हा आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जायचो तेव्हा ते आपल्याला तीन दिवसाचे औषध द्यायचे. ते लागू नाही पडले की पुन्हा या असे सांगितले जायचे. तीन दिवसानंतरही लक्षणे कायम राहिली तर अँटीबायोटीक्स सुरु केली जायची. पण बदलत्या जमान्यात कामावर शक्य तितक्या लवकर जायची घाई असलेले लोक ताबडतोब इलाजाचा आग्रह करायचे. डॉक्टरही पहिल्याच दिवशी अँटीबायोटीक्स घ्यायला सांगायचे. त्यामुळे लोक लवकर बरे व्हायचे, पण अशा पध्दतीने अँटीबायोटीक्सचा अतिवापर वाढला. त्यांचे सांडपाण्यातले प्रमाण वाढले. टायफॉइडचे जंतू ज्याला साल्मोनेला टायफी किंवा पॅरा टायफी असे म्हणतात त्या जंतूंना Chloramphenicol, co-trimoxazole, furazolidon, amoxycillin या प्रतिजैवकांशी लढायची सवय झाली. परिणामतः जन्माला आलेली त्याच जंतूंची नवी फौज औषधाला दाद देईनाशी झाली. शास्त्रीय भाषेत याला Multi Drug Resistant Typhoid (MDRT) म्हणतात. 

पण हे कळेस्तोवर जो वेळ गेला त्या दरम्यान अनेक लोकांना प्राण गमवावे लागले. बाँबे हॉस्पिटलच्या जर्नलमध्ये नोंदलेले कारण पाहा- "This resistance has developed because of our overuse, misuse and abuse of the drugs available."

आणखी एका अभ्यासानुसार गोळा केलेल्या साल्मोनेला टायफीच्या सँपलमधये हा ड्रग रेझीस्टन्स १९८८ साली ६.२%, १९८९ साली २३.२% होता आणि १९८९ साली हेच प्रमाण ६७.६% वर पोहोचले होते. यानंतरच सुरु झाला 'डोंबिवली फिवर'!!

पण वाचकहो, जे डोंबिवलीत झाले ते कोणत्याही शहरात घडू शकते. असेच प्रकार नंतरच्या काळात कलकत्ता, ओरीसा, पंजाब आलेल्या 'ड्रग रेझीस्टंट' साथींनी सिध्द केले आहे. डोंबिवली या घटनेतून काही शिकले का? याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही आहे. या साथीनंतर आरोग्य व्यवस्था सुधारली, पण औषधाचा अतिवापर थांबलेला नाही. २०१२ सालचे हे ' लोकसत्ता' दैनिकातले वृत्त वाचा.

(प्रातिनिधिक फोटो)

गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत विचित्र तापाची साथ आली असून या ‘डोंबिवली फीवर-२’च्या लक्षणांमुळे येथील डॉक्टरही हैराण झाले आहेत. हा ताप एकदा आल्यानंतर दहा ते बारा दिवस कमी होत नाही. उपचार केल्यानंतर काही काळासाठी ताप उतरतो; पण पुन्हा त्यात चढउतार होत राहतात. रुग्णाला सलग दहा ते बारा दिवस ताप येत असल्याने आणि सर्व प्रकारचा औषधोपचार करूनही तो ताप कायमचा जात नसल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या तापाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.
विविध प्रकारचे जंतू, वातावरणातील बदलामुळे हा ताप येतो. हा ताप प्रसंगी मलेरिया, टायफॉइडवरही जाऊ शकतो. मिक्स व्हायरल प्रकारचा हा ताप असल्याने या तापाच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या तरी त्यामधून काहीही निष्पन्न होत नाही. अशा प्रकारच्या तापाचे निदान डॉक्टरांना होत नाही, असे पालिकेतील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ('लोकसत्ता', २४/११/२०१२)

(प्रातिनिधिक फोटो)

आम्हाला या लेखातून सांगायचे होते ते असे की निसर्ग वारंवार येणार्‍या संकटाची सूचना देत असतो. आपण ते ऐकत नाही, कारण ते आपल्या सोयीचे नसते. परिणाम दिसायला लागेपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असते. औषधांचा अतिवापर हा एक गंभीर विषय आहे, तो आपण लवकरच बोभाटावर वाचू या! 

तोपर्यंत प्रश्न विचारा आणि आम्हालाही माहिती द्या!

सबस्क्राईब करा

* indicates required