computer

आख्ख्या जगाची डोकेदुखी : मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीची कारणं, लक्षणं वाचा आणि उपायही जाणून घ्या!!

मायग्रेन ऊर्फ अर्धशिशी हा आताशा जास्त हातपाय पसरलेला रोग. म्हणजे पूर्वी या विकाराने त्रस्त अशा काकवा (पूर्वीपासूनच पुरुषमंडळी या डोकेदुखीपासून तशी थोडी लांबच होती. यामागे मानसशास्त्रीय आणि जीवशास्त्रीय कारणं आहेत.) सहसा पन्नाशी ओलांडलेल्या असत. कधीतरी शेजारच्या एका घरातून बाम लावल्याचा म्हणा किंवा जायफळाचा लेप उगाळून लावल्याचा विशिष्ट गंध यायचा आणि तिथे राहणाऱ्या काकूंचं डोकं 'चढल्याची' वर्दी देऊन जायचा. आता मात्र मायग्रेन वय, लिंग, सांपत्तिक स्थिती या भिंती ओलांडून यत्र-तत्र-सर्वत्र पसरला आहे. यामागची कारणं आहेत एकंदर तणावयुक्त जीवनशैली आणि स्क्रीनचा (टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप) वाढलेला वापर.

मायग्रेनचा त्रास अटॅकच्या स्वरूपात जाणवतो. त्याची पूर्वलक्षणं म्हणजे मानेकडून डोक्याच्या बाजूला हळूहळू वेदना होऊ लागणं, मूड बदलणं, खूप जास्त प्रमाणात जांभया येणं, सारखं तहान लागल्यासारखं वाटणं, चिडचिडेपणा, मानेत कडकपणा जाणवणं. ही लक्षणं व्यक्तींनुरूप बदलतात. केवळ ही लक्षणंच नाहीत तर त्यांची तीव्रता, आणि किती काळ हा त्रास होईल हेही वेगवेगळं असतं. काहींची लक्षणं चारेक तासांनी कमी व्हायला लागतात, तर काहींना अगदी ७२ तासांपर्यंत डोकेदुखी जाणवत राहते. अनेक जणांचा अटॅक इतका तीव्र असतो की त्यांची रोजची कामं करणंही अशक्य होऊन बसतं. अटॅक येण्यापूर्वी थोडा वेळ आणि प्रत्यक्ष अटॅकदरम्यान अनेकांना काही तेज:पुंज वलयं डोळ्यासमोर दिसतात. याला वैद्यकीय परिभाषेत 'ऑरा' म्हणतात. बऱ्याच रुग्णांना मात्र असा कुठलाही 'ऑरा' जाणवत नाही.
 

ऑरायुक्त मायग्रेनमध्ये दृष्टी, हालचाल, बोलणं यांच्याशी संबंधित समस्या दिसून येतात. उदाहरणार्थ स्पष्टपणे बोलता न येणं, चेहरा, हातपाय अशा ठिकाणी मुंग्या येणं, तात्पुरतं अंधत्व, डोळ्यांपुढे वेगवेगळे आकार, तेजस्वी ठिपके दिसणं.

प्रत्यक्ष अटॅकदरम्यान उजेड आणि आवाज सहन न होणं, मळमळ, उलट्या, चक्कर आल्यासारखं वाटणं, डोक्याच्या अर्ध्या भागात ठणकल्यासारख्या वेदना अशी लक्षणं आढळून येतात.

मायग्रेनचे लक्षणांनुसार आणि कारणांनुसार अनेक उपप्रकार आहेत. काहीवेळा मायग्रेनमध्ये डोकेदुखी न होता केवळ ऑरा जाणवतो, तर विशेषतः लहान मुलांमध्ये ऍबडॉमिनल मायग्रेन नावाचा विकार आढळतो ज्यात बेंबीच्या आजूबाजूला वेदना होतात, ऑप्टिकल मायग्रेनमध्ये एकाच डोळ्याला ऑराचा परिणाम जाणवतो, क्वचित मायग्रेनच्या जोडीला व्हर्टिगो आढळून येतो, याला व्हेस्टिब्यूलर मायग्रेन म्हणतात.

लक्षणांमध्ये थोडाफार फरक असला तरी मायग्रेनच्या मुळाशी जी प्रचंड डोकेदुखी असते ती बहुधा सगळ्यांनाच सारखीच त्रासदायक ठरते. यावर काय उपाय करता येतात ते पाहू.

सगळ्यात आधी ट्रिगर ओळखायला शिका.

मायग्रेनचा त्रास सुरू होतो त्यामागे अनेक घटक (ट्रिगर्स) असतात. मानसिक ताणतणाव, अतिश्रम, अचानक डोळ्यांवर पडणारा प्रखर प्रकाश, विशिष्ट गंध, काही खाद्यपदार्थ (चॉकोलेट, शेंगदाणे, चायनीज पदार्थ), कृत्रिम स्वाद, चहा कॉफीसारखी पेयं, अपुरी झोप, काही औषधांचे साईड इफेक्ट्स, मासिक पाळी, ओव्ह्युलेशन किंवा प्रेग्नन्सी यांदरम्यान होणारे हॉर्मोनल चेंजेस अशा अनेक कारणांनी हा त्रास होतो. पुन्हापुन्हा येणाऱ्या अटॅकमध्ये थोडी हिस्टरी तपासून यामागचं कारण शोधता येऊ शकतं. एकदा हे कारण कळलं की ते टाळल्यास समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.
 

मीठाचा वापर करा.

मीठामुळे मायग्रेनवर फायदा होतो. शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी झाल्यामुळे मायग्रेनचा त्रास सुरू होतो. त्यामुळं मीठाचं प्रमाण वाढवणं हाच रास्त उपाय आहे. मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यावर एक ग्लास ताज्या लिंबाचा रस किंवा लेमोनेड प्या. या रसात सैंधव मीठ घाला.

लिंबाचा रस कपाळावर चोळा

हा एक साधा सोपा स्वस्त इलाज आहे. लिंबू कापून त्याचा अर्धा भाग कपाळावर चोळल्यास मायग्रेनची डोकेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते.
 

गरज वाटल्यास वैद्यकीय सल्ला घ्या

विशेषतः मायग्रेनचा अटॅक किती वारंवार येतो, लक्षणांची तीव्रता किती आहे, जोडीला इतर काही लक्षणं आहेत का यांसारख्या बाबी तपासून डॉक्टर काही टेस्ट्स करायला सांगू शकतात. सिटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या चाचण्यांमधून मेंदूत काही बदल झाले असल्यास ते टिपता येतात.

रुग्णाला त्रास होत असताना काही औषधं दिली जातात. यात वेदनाशामकं (पॅरासिटॅमॉल, ॲस्पिरीन), ओपॉइड्स, स्टीरॉइड्स, उलटी-मळमळ कमी करणारी औषधं अशी अनेक प्रकारची औषधं स्वतंत्र किंवा एकत्रितरित्या वापरली जातात. पण ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.

मायग्रेन टाळण्यासाठी ...

• खूप वेळ उपाशी राहू नका.
• ‎मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ टाळा. ‎चहा-कॉफीचा अतिरेक टाळा.
• संतुलित आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं यांचा समावेश करा.
• ‎दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या.
• ‎स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्हीचा वापर मर्यादित ठेवा.
• ‎जागरण टाळा. दररोज किमान ७ तास झोप घ्या.
• ‎नियमित व्यायाम करा.
• ‎मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर राहा. मन शांत ठेवण्यासाठी छंद जोपासा, प्राणायाम, ध्यानधारणा करा.
• ‎वारंवार डोकेदुखी होत असल्यास डोळ्यांचीही तपासणी करून घ्या.
• ‎मायग्रेन डोकेदुखीवर सतत वेदनाशामक औषधं घेणं टाळा.

निरोगी राहा, सुरक्षित राहा!!

सबस्क्राईब करा

* indicates required