computer

व्हॅक्सीनच्या ट्रायलमध्ये भाग घेतलेल्या डॉ. मिलिंद पदकी यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात वाचा !!

सध्या जग ज्या बातमीची रोज आतुरतेने वाट बघते आहे ती बातमी म्हणजे निरनिराळ्या व्हॅक्सीनच्या ट्रायलची! बोभाटाने आधी लिहिलेल्या लेखात या ट्रायल कशा घेतल्या जातात याची सविस्तर माहिती दिलीच होती. ट्रायलच्या बातम्या रोज येत आहेत. जशा खर्‍या बातम्या येत आहेत तशा खोट्या अपप्रचार करणार्‍या बातम्या पण माध्यमांतून येत आहेत. ट्रायलमध्ये भाग घेणार्‍यांकडून थेट आपल्यापर्यंत फारच कमी बातम्या पोहचतात. 

दोन दिवसांपूर्वी 'बोभाटा'चे मित्र डॉ. मिलिंद पदकी यांनी एका व्हॅक्सीनच्या ट्रायलमध्ये भाग घेतला होता. या ट्रायलसबंधी अधिक माहिती देण्यापूर्वी डॉ. मिलिंद पदकी यांची ओळख करून घेऊया. डॉ. मिलिंद पदकी गेली अनेक वर्षे अमेरिकेतल्या एका औषध कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. आता ते या विषयावर स्वतंत्र लिखाण करतात. त्यांनी ट्रायलमध्ये सहभाग घेतल्यावर जे अनुभव आले ते आम्ही त्यांच्याच शब्दात देत आहोत. हे वाचल्यावर तुमच्या मनात जे प्रश्न येतील ते कमेंटबॉक्स मधून विचारा. डॉ. मिलिंद पदकी त्या प्रश्नांची उत्तरे देतील. 

३० /११/२०२०

व्हॅक्सिन घेण्यासाठी न्यूयॉर्कच्या हॉस्पिटलमध्ये निघालो आहे. 'प्लासिबो' सलाईनचा असणार आहे. तो मिळाल्यास ताप, वेदना, हुडहुडी वगैरे काहीच न झाल्यामुळे, तो दिला गेला आहे का हे उद्यापर्यंत समजेलच. बाकी 'अनुभवा'ची पुढची पोस्ट सात तासांनी.

- Covid-19 व्हॅक्सिन घेऊन आलो.  पाण्यासारखे इंजेक्शन, अर्धा मिलिलिटर व्हॉल्युम, इन्ट्रामस्क्युलर*. घेताना बारीकसे दुखले. 

- वीस एक मिनिटे इंजेक्शनच्या जागी दुखले. 

- आता तीन तास झाले, कोणताही त्रास नाही. 

- झालाच तर 'खरा' त्रास (ताप, हुडहुडी) १२ तासात होईल असे तिथले लोक म्हणाले. 

- THEY will pay me a total of $600/-. Got $ 100/- today.

- आधी पूर्ण मेडिकल हिस्ट्री, मग मेडिकल चेकअप झाला. Also nasal swab and blood sample.

- १, २ आठवड्यांनी फोनवर फॉलोअप. 

- ४ आठवड्यांनी दुसरा डोस.

-मग २,३, ६ महिने आणि १,२ वर्षांनी फॉलोअप. 

- वरच्या दोन गोऱ्या डॉक्टर बायका सोडल्यास सर्व स्टाफ आशियाई (मुख्यतः भारतीय) होता. 
बाकी क्रमशः

६ तासांनंतर

व्हॅक्सिन घेऊन आता सहा तास झाले. शरीराच्या तापमानात फरक नाही. आधी ९७. ४ सें होते, आता ९७. ५ आहे. थोडी मरगळ जाणवते आहे.

त्यानंतर १ तासाने

आता झोपतो. मला फ्लू व्हॅक्सिनने तरी ताप येत नाही,  कदाचित यानेही येणार नाही. त्यामुळे ताप हे लक्षण, व्हॅक्सिन का प्लासिबो हे ओळखण्यासाठी वापरणे चुकीचेही असू शकेल. सकाळी लेटेस्ट अपडेट देईनच.

त्या रात्रीचा अनुभव:

- कोव्हीड व्हॅक्सिन घेऊन १४ तास होऊन गेले. रात्र सरली. 

- रात्र अस्वस्थ गेली. झोप लागली नाही. इंजेक्शनच्या जागी बारीक वेदना आहे. ताप असल्याची "भावना" आहे, पण तो थर्मामीटरवर  दिसत नाही. मनाचे खेळ असू शकतात. मरगळ खूप आहे. 

- ट्रायल डिझाईनप्रमाणे मला दिलेला प्लासिबो असण्याची शक्यता ३३ टक्के आहेच. हे कोडे अजून सुटलेले नाही. 

- व्हॅक्सिन संदर्भात भारतात एका कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे खटले वगैरे चालू असल्याचे ऐकतो. माझे हे मांडणे भलत्याच जागी 'कोट' वगैरे होण्याच्या भानगडीत मला पडायचे नाही. त्यामुळे मी  कोणत्या कंपनीचे व्हॅक्सिन घेतले आहे हे मी सांगू शकत नाही. पण माझ्या या पोस्ट्स,  भारतातल्या सत्य-शोधकांना  रेलेव्हंट आहेत हे नक्की. 

- क्रमशः

२४ तासांनंतर..

कोव्हीड व्हॅक्सिन घेऊन २४ तास झाले. प्रकृती आता पूर्णपणे सुधारली आहे. थकलेपणा गेला आहे. इंजेक्शनच्या जागी वेदना नाहीत. ताप नाही.

व्हॅक्सिन कुणाला "आधी" मिळावे याबाबतचे अमेरिकेतले अधिकृत विचार पाहिले तर सुमारे १५ कोटी लोक माझ्या आधी येतात. वयस्क, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, सैन्य, रोग्यांचे नातेवाईक इ. इ. गटांतल्या लोकांना प्राधान्य असावे. त्यामुळे सध्या मला मिळालेले व्हॅक्सिन प्लासिबो* नसावे अशी प्रार्थना करीत आहे.

 

तळटीप:

इन्ट्रामस्क्युलर: स्नायूत दिले जाणारे औषध. सहसा इंजेक्शन ही शिरेतून दिली जातात, पण इन्सुलिनसारखी काही औषधे स्नायूत दिली जातात.

प्लासिबो: औषध म्हणून दिले जाणारे न-औषध. कधीकधी लोक औषधापेक्षा औषध घेतले आहे या भावनेने बरे होतात. अशी शक्यता पडताळून पाह्यण्यासाठी दिले जाणारे औषध प्लासीबो म्हणून ओळखले जाते.

सबस्क्राईब करा

* indicates required