f
computer

पावसाळ्याच्या दिवसात काय असावं घरातल्या औषधपेटीत !!

पावसाळ्यात पहिल्या चार सरी येऊन गेल्यावर हवेत जंतूंचे आणि विषाणूचे प्रमाण वाढत जाते. सोबतच पाण्यातूनही जंतू संसर्ग वाढत जातो.  साहजिकच अनेक साथीचे रोग फैलावत जातात. अशा वेळी प्राथमिक उपचारासाठी  आपल्या घरातील औषधाच्या साठ्यात काय असावे ते आज बघूया !

१. सर्वप्रथम घरातील सर्व जुनी औषधे जर वापरण्याच्या तारखेपलीकडे गेली असतील तर ती काढून कचर्‍याच्या पेटीत टाका.

२. घरातील वृध्द माणसांची नियमित लागणारी औषधे :

औषधांचा कमीतकमी १ आठवड्याचा आगाऊ साठा तयार ठेवा. वृध्द माणसे पावसात बाहेर जाऊन औषधे आणण्याचे टाळतात.  वृध्दांची मेडिकल हिस्टरी लक्षात घेऊन काही आणखी तयारी करावी. उदाहरणार्थ, अस्थमा रुग्णांचा दमा या दरम्यान कधीही उफाळून येऊ शकतो. अशावेळी अस्थमा पंप हाताशी असलेला सोयीचा पडतो. 

३. घरात लहान बाळ असेल तर :

घरी लहान बाळ असेल तर ताप, सर्दी, खोकला यावरची त्यांच्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेगळी आणून ठेवा. उदाहरणार्थ, मोठ्या माणसांचे आणि बाळाचे तापाचे औषध जरी एकसारखेच असले तरी लहान बाळाला देण्याचे डोस वेगळे असतात. त्यांना बहुतेक औषधे लिक्वीड ड्रॉप्सच्या स्वरुपात दिली जातात. झालंच तर रांगणार्‍या बाळाच्या घरात लाद्या जंतूनाशकाने दिवसातून कमीतकमी दोनदा पुसुन घ्याव्यात.

४. पावसाळा आणि पोटाचे विकार :

या काळात पोट बिघडणे, उलट्या होणे, अतिसार (हगवण ) असे त्रास बहुतेकांना होतात. Domstal, Avomine or Perinorm  यांसारखी औषधे आणून ठेवा..Perinorm  ची अ‍ॅलर्जी असेल तर पर्यायी औषध विचारून घ्या. अतिसारामुळे थकवा येतो. शरीरातील सोडीयम पोटॅशियम या क्षारांचे प्रमाण कमी होते म्हणून इलेक्ट्रालची चार पाकीटे घरात  हवीच. याखेरीज गॅसचा त्रास असेल तर इनोचे चार पाच पाउच असलेले बरे !

५. पावसात भिजून घरी आल्यावर सर्दी पडसे अचानक जोर धरते. अशा वेळी वाफारा घेण्यासाठी मेन्थॉल असलेली लिक्वीड, इनहेलर, Cetirizine किंवा Allegra या गोळ्यांची एखादी स्ट्रीप घरी असावी.

६. पावसाळ्यात होणाऱ्या जखमांसाठी :

सतत पावासात फिरल्यावर पायाच्या बोटांच्या मध्ये चिखल्या वगैरे होतात, अशा वेळी त्यासाठी एखादे मलम आणून ठेवावे. पाय घसरून पडणे, खरचटणे, असे प्रसंग कधीतरी उदभवू शकतात. डेटॉल -सॅवलॉन यासारख्या जखमा स्वच्छ करणार्‍या जंतूनाशकांची एखादी छोटी बाटली कामास येते. बिटाडाइन, सिल्व्हरेक्स, निओस्पोरीन, सोफ्रामायसीन अशी मलमे  आपल्या पेटीत अत्यंत आवश्यक आहेत. या खेरीज एक छोटे बँडेज, स्ट्रेच बँडेज ऐन वेळी कामास येते.

७. नोकरी धंद्यानिमित्त बाहेर फिरणार्‍यांनी या काळात सॅनीटायझर्स आपल्या बॅगेत ठेवणे जरूरीचे आहे.

८. या सर्व औषधांची गरज तत्कालीक आणि ताबडतोब करायचे उपाय यासाठी असते. म्हणून ही औषधाची यादी एकदा फॅमीली डॉक्टरला दाखवून घेणे गरजेचे आहे.

९. कोणतेही अँटीबायोटीक स्वतःच्या मनाला वाटले म्हणून घेऊ नये.

१०. ही यादी फक्त डॉक्टरला भेट देईपर्यंतची पर्यायी यादी आहे. जर कोणतेही लक्षणे २४ तासापेक्षा जास्त टिकली तर डॉक्टरकडे जाणे टाळू नये.

सबस्क्राईब करा

* indicates required