पाठदुखीच्या त्रासाने नोकरी सोडावी लागली, पण घरात बसल्या तिने स्वतःचं आयुष्य बदललं....विनिता राफेलची प्रेरणादायी कथा!!
मोठे झाल्यावर आपण अमुक तमुक होणार अशी स्वप्न आपण लहानपणापासूनच पाहतो. मोठेपणी जेव्हा आपली स्वप्न खरीच पूर्ण होतात तेव्हा तेव्हा आपल्या आनंदाला पारावर राहत नाही, पण काही कारणाने आपले पूर्ण झालेले स्वप्नही अर्ध्यावर सोडून द्यावं लागलं तर? तर त्याहून मोठं दु:ख नाही. बरोबर ना? अशीच वेळ कोच्चीच्या विनिता राफेलवर आली होती, पण निराश न होता विनिताने या संकटातूनही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
विनिताला लहानपणापासूनच शिक्षिका व्हायचे होते. तिचे हे स्वप्न पूर्णही झाले. लहान मुलांसोबत वेळ घालवणे, त्यांच्यासोबत नवनव्या गोष्टी शिकण्याचा आनंद लुटणे आणि त्यांच्यासोबतीने पुन्हा एकदा बालपण अनुभवण्यात विनिता गुंग झाली होती. विनिता आपले स्वप्नवत आयुष्य जगत होती. कदाचित तिच्या या आयुष्याला कुणाची नजर लागली की काय पण शिक्षिका म्हणून रुजू झाल्याच्या दोनच वर्षात विनिताला असह्य पाठदुखीने पछाडले.
डॉक्टरांनी विनिताच्या पाठदुखीची तपासणी केली तेव्हा तिला हर्नीएटेड डिस्कचा त्रास असल्याचे आढळून आले. या व्याधीमध्ये रुग्णाला असह्य पाठदुखी सुरु होते ज्यामुळे ती व्यक्ती जास्त काळ उभी राहू शकत नाही. शिक्षिकेच्या पेशात उभं राहून शिकवणं किती महत्त्वाचं असतं तुम्हाला तर माहितीच असेल. विनिताला जास्त काळ उभं राहता येत नसल्याने तिला आता पूर्वीप्रमाणे शिकवणे जमेना. किंबहुना तिला ही नोकरीच करणे शक्य नव्हते.
नियतीने एका हाताने स्वप्नातील आयुष्य जगण्याची संधी दिली आणि दुसऱ्या हाताने हिरावूनही घेतली. विनिताला आपल्या या आजारामुळे शिक्षिकेच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. दोन वर्षे मुलांच्या सहवासात आणि किलबिलाटात वेळ कसा जात होता ते समजत नव्हते, पण आता विनिताला वेळ कसा घालवायचा फक्त बसून राहून काय करायचे हेच समजत नव्हते. आपल्या हातून आता काहीच होणार नाही, आपण कुचकामी आहोत, आपण फक्त कुटुंबीयांवर भार बनून राहू की काय? अशा विचारांनी विनिता हताश होऊ लागली. ही हाताशाच तिला वारंवार सतावू लागली.
विनिताचे संपूर्ण कुटुंब कलेत रमणारे होते. विनितानेही लहानपणी कधीतरी शाळेतील प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून पेंटिंग शिकण्याचा प्रयत्न केला होता. आताही बसून बसून नकारात्मक विचार करण्यापेक्षा निदान ह्यात तरी मन रमवू असा विचार करून विनिता आपल्या जुन्या साड्यांवर पेटिंग करू लागली. या कामात तिचे मन रमू लागले. कुठल्या का कारणाने असेना पण आपल्या मुलीला तिच्या वेदनांचा विसर पडतो हे पाहून विनिताच्या आईला ही आनंद झाला. तिने आपल्याही काही जुन्या साड्या विनिताला दिल्या आणि त्यावर विनिताला पेंटिंग करायला लावले. या पेंटिंगच्या कामात विनितचा चांगला वेळ जात होता.
विनिता जेव्हा या स्वतः पेंट केलेल्या साड्या नसेत असे तेव्हा आजूबाजूच्या महिला तिच्याकडे साडी कुठून घेतली अशी चौकशी करत असत. स्वतः विनीतच आपल्या साड्यांना असे आकर्षक रूप देते हे ऐकल्यानंतर या महिलांना खूपच आश्चर्य आणि कौतुकही वाटले. तेव्हा विनिताने त्यांच्या साड्यांवरही अशीच पेंटिंग करून द्यावी यासाठी त्या हट्ट धरू लागल्या. आपले फॅब्रिक पेंटिंग सुधारण्यासाठी विनिता युट्युबवरील याविषयीचे व्हिडीओज बघू लागली. तिचा भाऊ विपिनही तिला या कामात मदत करू लागला.
हळूहळू विनिताकडे साड्यांवर पेंटिंग करून देण्याची मागणी वाढू लागली. विनिताने पेंटिंग केलेल्या साड्यांना चांगला दर मिळू लागला. हळूहळू विनिताने घरबसल्या हाच व्यवसाय वाढवण्याचे ठरवले. यासाठी तिने यातील नवनवे तंत्र शिकून घेतले. भावाच्या मदतीने तिने आपला व्यवसाय विस्तारण्यास सुरुवात केली. आधी फक्त आजूबाजूच्या महिलाच तिच्याकडे साडी पेंटिंगसाठी देत असत, पण आता तिच्याकडे दुरुदुरून यासाठी ऑर्डर येऊ लागल्या.
महिलांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विनिताची हिंमत वाढली. २०१६ सालच्या ओणम सणावेळी तिने कोच्ची शहरात स्वतःहून पेंटिंग केलेल्या साड्यांचे प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनामुळे तिला आणखी प्रसिद्धी मिळाली आणि व्यवसाय विस्तार करण्याची संधीही. फक्त कोच्ची आणि केरळच नाही तर, आता बाहेरच्या राज्यातूनही विनिताच्या या साड्यांना मोठी मागणी आहे. इला हँडपेंटेड साडी या नावाने तीचा व्यवसाय सध्या जोमाने बहरू लागला आहे.
तुम्हाला पटणार नाही पण सध्या विनिता आपल्या या कलेच्या माध्यमातून महिना तीस हजार हून जास्त कमाई करत आहे. शिक्षिकेची नोकरी सोडावी लागल्याने निराश झालेल्या विनिताने आता स्वतःचा व्यवसाय उभारला आहे आणि त्यात ती यशस्वी झाली आहे. या कामामुळे तिला आपल्या पाठीच्या दुखण्याचाही विसर पडला आहे.
प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते असे म्हटले जाते, ते काही खोटे नाही.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी
आणखी वाचा:
या बाई प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी आणि दीपिका पादुकोणला साडी नेसवतात....असं घडलं त्यांचं करिअर !!




