computer

आता पीपीई किट आतून राहणार 'कुल'..या मुंबईकराने शोधलेला भन्नाट पर्याय पाहा !!

कोरोना बाधितांचा बचाव देखील करायचा आहे आणि स्वतःला देखील कोरोना होऊ द्यायचा नाही यासाठी सर्वात उपयुक्त गोष्ट म्हणजे पीपीई किट. पण या पीपीई किट मध्ये अगदी काही मिनिटे जरी घालवली तरी अंग घामाने डबडबलेले पाहायला मिळते.  पीपीई किट घालून काम करणारे डॉक्टर आणि इतर फ्रंट लाईन वर्कर किती त्रास सहन करत असतील याबद्दल सर्वांना जाणीव आहे. पण यावर उपाय काय याचा शोध मात्र आजवर घेतला गेला नव्हता.

निहाल सिंग आदर्श नावाच्या विद्यार्थ्याला मात्र पीपीई किट घालून काम करणाऱ्या आपल्या आईचा त्रास बघितला गेला नाही. पठ्ठ्याने यावर उपाय शोधायचे ठरवले आणि थेट थंड पीपीई किट शोधून काढली. निहाल हा मुंबईतील सोमय्या इंजिनिअरिंग कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.

गेल्या वर्षी त्याने कॉलेज प्रोजेक्टसाठी हा विषय निवडला आणि त्यासाठी त्याने काम सुरू केले. तेव्हा कुणी या गोष्टीला गंभीरपणे घेतले नसले तरी आज निहालची मेहनत चांगलीच कामी येत आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असून देखील निहाल एकटा लॅबमध्ये थांबून या थंड पीपीई किटवर काम करत होता. या कामात त्याला त्याच्या वडिलांचे आणि दोन मित्रांचे देखील सहकार्य मिळाले.

निहालची आई डॉक्टर आहे. आपली आई १२-१२ तास पीपीई किट घालून त्रास सहन करत असते. ही गोष्ट निहालला खटकत होती. यावर उपाय शोधला पाहिजे हे चक्र त्याच्या डोक्यात सातत्याने सुरु होते. अशातच कॉलेज प्रोजेक्टसाठी हाच विषय निवडावा असे त्याच्या मनात आले.

निहालने तयार केलेले डिव्हाईस पीपीई किटच्या आत हवा खेळती राहण्यासाठी तयार करण्यात आले आहे. याला त्यने 'Cov-Tech' नाव दिले आहे. हे डिव्हाईस बाहेरून हवा आत खेचते आणि आत गारवा निर्माण करते. 'Cov-Tech' तयार करण्यासाठी त्याने अत्याधुनिक ड्रोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या फॅन्सचा वापर केला आहे. बॅटरीसोबत या फॅनचे वजन जवळपास किलोभर आहे. एकवेळा चार्ज केले म्हणजे ८ तास निश्चिंतपणे काम करता येते.

विशेष म्हणजे यात एक असे फिल्टर लावले आहे, जे बाहेरील प्रदूषित हवा देखील शुद्ध करून आत घेते. तसेच अशुद्ध हवा चेहऱ्यापर्यंत जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. इतका भन्नाट शोध लावला म्हटल्यावर हे किट सर्वांच्या वापरात केव्हा येणार याबद्दल उत्स्कुता तर लागणारच. तर निहालने या पीपीई किटचे पेटंट स्वतःच्या नावे रजिस्टर केले आहे. आजवर १५० किट तयार करून वापरात आले आहेत. या किट्सचे मोठया प्रमाणात उत्पादन होण्यासाठी तो अनेक कंपन्यांशी बोलत आहे.

गोष्टी सुरळीत झाल्या तर आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी ठरेल. निहालने लावलेल्या शोधाबद्दल त्याचे अभिनंदन.

सबस्क्राईब करा

* indicates required