मुंबईत म्याँव म्याँवची साथ? हे म्याँव म्याँव आहे तरी काय?

म्याँव म्याँव ही काही तापाची साथ नव्हे.  तर ही साथ आहे मुंबई आणि उपनगरातल्या तरुणांना नशेच्या भोवर्‍यात गुंतवणार्‍या एका अंमली पदार्थाची!कोकेनबद्दल तर तुम्ही ऐकून असालच. तर कोकेनसारख्या अनेक पदार्थांसारखाच हा एक अंमली पदार्थ आहे, ज्याला ड्रोन - एमडी-बाथ सॉल्ट अशी पण नावं आहेत. आता कदाचित ही समस्या किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. सोबत काही प्रश्न पण उभे राहिले असतील. या प्रश्नांची उत्तरे आम्ही इथं देण्याचा प्रयत्न  करतो आहे.

या पदार्थाला म्याँव म्याँव का म्हणतात?
याच्या नशा केल्यावर डोळ्याच्या बाहुल्या विस्तारतात आणि उठून दिसतात म्हणून हे नाव दिलं गेलं आहे. काही जणांच्या मते या पदार्थाला मांजरीच्या मुताचा वास येतो म्हणून हे नाव मिळालं आहे .
ही समस्या नविन आहे काय ? 
तशी ही समस्या नविन नाही. पण या समस्येनं आता गंभीर रुप धारण केलंय. सध्या जे रेव्ह पार्टीचे खूळ माजलं आहे, त्या पार्टीत आता या पदार्थाचा वापर वाढत जातो आहे. याच्या सेवनाने काय होतं?
सोप्या भाषेत सांगायचं तर हा नशेचा प्रकार आहे. मानसिक पातळीवर  अत्यंत रीलॅक्स झाल्याचा भास होतो. अंगात प्रचंड ताकद आल्यासारखी वाटते. लैंगिक इच्छा बळावते आणि त्यामुळे बर्‍याचशा केम-सेक्स पार्टीत याचा वापर केला जातो .
कायदा आणि पोलीस काय करत आहेत?
या अमली पदार्थाचे शास्त्रीय नाव Mephedrone (मेफीड्रोन) आहे . कायद्यानं बंदी घालण्यासाठी अमली पदार्थाचे वर्गीकरण Narcotic Drugs and Psychotropic Substances Act खाली करावं लागतं. या पदार्थाचा उगम २००७ साली युरोपात झाला आणि त्यावर  बंदी २०१० साली आली. आपल्या भारतात असे वर्गीकरण करून २०१५साली बंदी आली आहे. 
बंदी नंतरही अजून साथ का वाढते आहे?
इतर अंमली पदार्थ ओळखण्यासाठी पोलीसांकडे टेस्टींग किट तयार असतं. पण या पदार्थाचं असं किट नसल्यानं, छापा टाकल्यावर सापडलेला पदार्थ म्याँव म्याँव आहे असं गृहीत धरलं जातं. प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत आरोपींना पुरावा नष्ट करण्याची संधी मिळते. आधिक माहीतीसाठी फेमस " बेबी पाटणकर " खटल्याची माहिती नक्की वाचा. 
आणि काही कारणे आहेत का ?
होय. इंटरनेटच्या जमान्यात काही गुन्हेगार ऑनलाईन बुकींग करतात आणि घरपोच माल देतात.  पैसे बिटकॉइन्सच्या चलनात वसूल केले जातात. त्यामुळं काहीच पुरावा राहात नाही. दुसरी अडचण अशी आहे की सप्लायर मोटर सायकलीवरून फिरत हा धंदा करतात. त्यामुळं पक्की खबर मिळाल्या शिवाय पोलीस काही करू शकत नाहीत.
सामान्य नागरीकांनी काय केले पाहीजे?
सावध राहणं हा चांगला उपाय आहे. घरातील तरुण मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. या पदार्थाचं व्यसन लागल्यावर मुलांच्या स्वभावात अचानक बदल दिसून येतो. असं काही ध्यानात आल्यावर समुपदेशन करण्यासाठी तज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे .गेल्या आठवड्यातच एका पालकाला हा अनुभव आला आणि त्यांनी बारीक लक्ष ठेवून मुलाला तर वाचवलेच, पण वेळेत माहिती मिळाल्यानं ड्र्ग सप्लायर पकडले गेले .
बोभाटावर हा लेख देण्याचे प्रयोजन काय?
प्रबोधन हा आमच्या सामाजिक कर्तव्याचा भाग आहे. आमचा वाचक वर्ग हा मुख्यतः तरुण मुलांचा आहे. या काळजीपोटी ही माहिती दिली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required