computer

ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये म्हणून त्याने २२ लाखांची गाडी विकली....मुंबईच्या 'ऑक्सिजन मॅन'बद्दल जाणून घ्या !!

जेव्हा एखादे मोठे संकट येते तेव्हाच माणुसकीची खरी किंमत कळते. सध्या सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर संकट असताना सर्व यंत्रणा तोकड्या पडत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे.ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांचा ऑक्सिजनअभावी जीव जात आहे. अश्या वेळी एक सर्वसामान्य मुंबईकर गरजूंना मोफत ऑक्सिजन पुरवून अनेकांचा जीव वाचवत आहे. शहानवाज शेख असे त्या अवलियाचे नाव असून तो ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखला जातोय.

या कामासाठी मालाडमधील शहानवाज शेख यांनी स्वत:ची २२ लाखांची फोर्ड एण्डीव्हर ही महागडी एसयुव्ही गाडी विकली. गेल्या वर्षी शहानवाज शेख यांच्या सहकार्याचे ऑक्सिजन अभावी निधन झाले. त्या सहकारी महिलेला वेळीच ऑक्सिजन मिळाला असता तर तिचे प्राण वाचले असते, हे जेव्हा शहानवाजला समजले तेव्हा त्यांनी ऑक्सिजनशिवाय कोणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून स्वत:ची गाडी विकून गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांच्या  एका मित्राने त्यांना थेट ऑक्सिजन सिलिंडर बनवणाऱ्याशी संपर्क करुन दिला. जेव्हा त्यांना शहानवाज शेख यांचा हेतू समजला तेव्हा त्यांनाही कौतुक वाटले व त्यांनी सिलिंडर पुरवले. 

पहिल्या तीन आठवड्यांमध्ये शहानवाजने २५० हून अधिक कुटुंबांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवला. त्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्यांनी डॉक्टरांचे शिफारस पत्र आणि स्वत: सिलिंडर घेऊन जाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. घरी विलीगीकरणात असणाऱ्यांना ते स्वतः सिलेंडर पोहोचवतात व कसा वापरावा याची माहितीही देतात. त्यासाठी त्यांनी डॉक्टरांची मदत घेऊन व्हिडीओ बनवला आहे.

झोपडपट्टीमध्ये अनेक गरीब लोक राहतात ज्यांना प्रवासाचा आणि रुग्णालयांचा खर्च परवडत नाही. अशा अनेकांना  रुग्णालयात घेऊन जाण्यासाठीही त्यांनी कार वापरली आहे. करोनाबाधित असलेल्या रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने ते आपल्या कुटुंबापासूनही लांब राहतात.

आजही त्यांना फोन येतात आणि ते जशी जमेल तशी मदत करतात. फक्त व्यवस्थेला किंवा सरकारी यंत्रणेला नाव न ठेवता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वाना प्रेरणा देणारे काम केले आहे. सोशल मिडीयावर शहानवाज शेख यांचे खूप कौतुक होत आहे.

सामान्यातील असामान्य अश्या या अवलियाला मनापासून सलाम.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required