computer

मंकी पॉक्सची साथ... फार गंभीर लक्षणं नसताना आणि विशेष प्रसारही झालेला नसताना मंकी पॉक्सला एवढं महत्त्व देण्याचं कारण काय?

क छोटा किस्सा. एका ट्रेनच्या डब्यात एक आजीबाई बसलेल्या आहेत. डबा जवळपास रिकामा. मध्ये कुठल्याशा स्टेशनवर एक तरुण मुलगी डब्यात चढते. आजीबाईंच्या समोरच्या बाकावर येऊन बसते. त्यांच्याकडे बघून छान हसते. आजीबाई खूश. हळूहळू गप्पा सुरू होतात. तुम्ही कुठले आम्ही कुठले या जुजबी गप्पांनंतर हळू हळूहळू गप्पांना रंग भरतो. मग नकळत बोलण्याची सूत्रं मुलीकडे जातात. ती इतकी बोलते, इतकी बोलते, की काही वेळानंतर आजीबाईंना आपलं डोकं दुखतंय असं वाटायला लागतं. तरीही पठ्ठी थांबायला तयार नाही. हळूहळू आजीबाईंचं डोकं चांगलंच ठणकायला लागतं. आता ही बया तोंडाचा पट्टा थांबवेल तर बरं असं त्यांना मनोमन वाटायला लागतं. शेवटी हळूच त्या तिला तसं सुचवतात. ती चतुर मुलगी गोडसं हसते आणि आपल्या बॅगेतून एक बामची डबी काढून देते. किंमत फक्त वीस रुपये. मार्केटिंगचा हा अनोखा फंडा पाहून आजीबाई अवाक होतात.

हा किस्सा आपल्या आजच्या विषयाशी बराचसा जवळचा आहे.
कोव्हिडनंतर आता एका नवीन विषाणूची चर्चा सुरू आहे. तो म्हणजे मंकीपॉक्स. हा तसा आपल्या देवी ऊर्फ स्मॉलपॉक्सचा जातभाई. आजतागायत चौदा देशांमध्ये मिळून या रोगाचे १००ही रुग्ण नाहीत. अजून एक जमेची बाजू म्हणजे या मंकी पॉक्स विषाणूने भारताचा उंबरठा ओलांडलेला नाही. तो तिकडे दूर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युके, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल, बेल्जियम, जर्मनी, नेदरलॅंड्स, इटली, स्वीडन या देशांमध्ये तळ ठोकून आहे. अलीकडे इस्रायल आणि स्वित्झर्लंड या देशांमध्येही काही रुग्ण आढळलेत. पण तरी त्याच्यासाठी 'दिल्ली बहोत दूर हैं..'

या विषाणूचं मूळ आफ्रिकेतलं. मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत या रोगाचे रुग्ण आहेत. रोग बरा होण्याचा कालावधी साधारण दोन ते चार आठवडे एवढा आहे. या रोगाने बाधित रुग्णांना ताप, पुरळ आणि मानेजवळ असलेल्या लिंफ नोड नावाच्या ग्रंथींना सूज येणं ही लक्षणं जाणवतात. हे पुरळ डोक्यापासून सुरू होऊन शरीरभर पसरतं आणि देवीच्या व्रणांप्रमाणेच त्याचे व्रण दिसतात.

हा विषाणू मुख्यतः दोन प्रकारे पसरतो. एक म्हणजे प्राण्यांकडून मानवाकडे आणि दुसरे म्हणजे संसर्गबाधित रुग्णाकडून निरोगी व्यक्तीकडे. फुटलेली किंवा भेगा पडलेली त्वचा, श्वसन मार्ग, किंवा डोळे, नाक, तोंड यासारखी श्लेष्मपटल असलेली इंद्रियं यांतून हा विषाणू पसरतो. मंकी पॉक्स बऱ्याच प्रमाणात देवी सारखा असला तरी देवीच्या तुलनेत कमी संसर्गजन्य आहे. रुग्णांच्या जखमांशी थेट संपर्क आल्यास किंवा त्याचे कपडे, अंथरुण-पांघरुण यांच्या संपर्कात आल्यास निरोगी व्यक्तीला रोगाची बाधा होते. विशेष म्हणजे यामध्ये मृत्यूचं प्रमाण अत्यल्प आहे.

WHO प्रमाणेच WHA उर्फ वर्ल्ड हेल्थ असेंब्ली नावाची संघटना आहे, त्यांना तर मंकी पॉक्स ही जागतिक महामारी आहे असं घोषित करण्याची इतकी घाई झाली आहे, की ज्याचं नाव ते. एकदा का जागतिक महामारी घोषित झाली, की लॉकडाऊन, क्वारंटाईन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सक्तीचं लसीकरण हे सगळं आलंच. पण मुळात फार गंभीर लक्षणं नसताना आणि विशेष प्रसारही झालेला नसताना मंकी पॉक्सला एवढं महत्त्व देण्याचं कारण काय?

तर वरवर सांगायचं कारण म्हणजे हा रोग संसर्गजन्य आहे आणि कोव्हिडनंतरचे निर्बंध उठवल्यावर एकंदरीतच जगभरात प्रवासाचं प्रमाण वाढल्यामुळे हा विषाणू जास्त वेगाने पसरून त्याचं महासाथीत रूपांतर होऊ शकतं. पण अंदर की बात कुछ और है!

सध्या अमेरिकेमध्ये मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांसाठी देवीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधं दिली जात आहेत. पण तज्ज्ञांच्या मते देवी या रोगावरची लस ज्यांनी घेतली असेल त्यांना मंकीपॉक्स पासूनही संरक्षण मिळू शकतं. त्यात देवी हा रोग आता जगातून जवळपास हद्दपार झालेला. असं असताना अमेरिकेतील काही कंपन्यांनी आधीपासूनच अशा प्रकारचा रोग उद्भवू शकेल अशी शक्यता वर्तवली आणि लशींचा साठा करून ठेवायला सुरुवात केली. संशयाला जागा आहे ती इथेच. याला पार्श्वभूमी आहे ती कोव्हिड महामारीची.

कोव्हिडची जागतिक साथ हे जैविक युद्ध असल्याची थिअरी आजही प्रचलित आहे. प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या रोगजंतू तयार करायचे आणि त्यांचा शस्त्रासारखा वापर करायचा. म्हणजेच ते मुक्त संचारासाठी सोडून द्यायचे, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर तो रोग पसरेल अशी या जैविक युद्धामागची संकल्पना. अनेकदा राष्ट्रांची सरकारं, किंवा तेथील मोठमोठे उद्योगपती यांचे फार्मा कंपन्यांमध्ये हितसंबंध गुंतलेले असतात. अशा प्रकारे रोगाची साथ येणं ही या फार्मा कंपन्यांसाठी सुवर्णसंधी असते. आधी रोग निर्माण करायचा आणि मग त्यावर ते उपचार विकसित करण्याच्या नावाखाली आपलं उखळ पांढरं करून घ्यायचं ही या लोकांची कार्यपद्धती आहे. नॉव्हेल कोरोना विषाणू हादेखील चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार केल्याचा संशय अजूनही पूर्णतः फिटलेला नाही. त्यामुळेच मंकीपॉक्सच्या बाबतीतही असं काहीतरी असावं असा दाट संशय आहे.

यामध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ या संघटनेची भूमिकाही तपासायला हवी. या संघटनेचे आश्रयदाते बघितले तर त्यात प्रामुख्याने बिल ॲंड मेलींदा गेट्स फाउंडेशन, गावी, तसंच द व्हॅक्सिन अलायन्स या फार्मा कंपन्या यांसारखे मोठे खेळाडू आहेत. या कंपन्यांची अब्जावधींची उलाढाल एक प्रकारे डब्ल्यूएचओ च्याच आशीर्वादाने होत आहे असं म्हणायला वाव आहे.

सत्ता, संपत्ती यांच्या हव्यासापोटी खेळल्या गेलेल्या या खेळात बळी मात्र सामान्यांचाच जात आहे. एकीकडे मुठभर कंपन्या पैशांच्या राशीत लोळत असताना दुसरीकडे अनेकांना रोजगार गेल्याने दोन वेळच्या जेवणाचीही चिंता आहे. हे सगळं कधी आणि कसं थांबणार याचीच सर्वजण वाट पाहत आहेत.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required