computer

जपानमध्ये लोक कोरोनापेक्षा आत्महत्येने का मरत आहेत ? आत्महत्येचा सेपुकू प्रकार काय असतो ?

२०२० साल हे उगवले ते कोरोना विषाणूच्या शिरकावाने. चीनच्या वूहानमधून वाऱ्यासारखा पसरत तो हळूहळू एक एक देश गिळू लागला. आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात लाखो लोक मरण पावले आहेत, हे आपण ऐकले असेलच. कदाचित जपान हा एकमेव असा देश असेल जिथे हे चित्र अगदी उलट आहे.

नुकतंच जपानमधल्या मृत्युच्या बाबतीतली धक्कादायक आकडेवारी समोर आली. कोविडच्या काळात जपानमध्ये कोविडमुळे जितके मृत्यू झाले त्यापेक्षा जास्त मृत्यू आत्महत्येमुळे झाले आहेत. गेल्या महिन्यात जपानमध्ये २१०० पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. या आकडेवारीत पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. सरकारी आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

याबद्दल वाचण्यापूर्वी जपानमध्ये आत्महत्येकडे कोणत्या नजरेने पाहिले जाते ते थोडे जाणून घेऊया.

जपानमध्ये आत्महत्येला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. भारतात जसं कोणी आत्महत्या केल्यास त्यांना एक बेजबाबदार, पळपुटा, पराभूत मानले जाते, तसे जपानमध्ये मानले जात नाही. टोकियो युनिव्हर्सिटीचे मनोवैज्ञानिक निशिदा सांगतात की जपानमध्ये सन्माननीय पद्धतीने आत्महत्या करण्याची अत्यंत प्राचीन संस्कृती आहे. त्यांनी समुराई सैनिकांच्या सेपुकू प्रथेकडे लक्ष वेधले. सामुराई लढाऊ सैनिकांवर जेव्हा अत्यंत  बिकट परिस्थिती येते, जसे की शत्रूच्या हाती लागणे, तेव्हा समुराई स्वत:चा जीव घेतात. ही आत्महत्येची पद्धतीही अत्यंत  क्रूर म्हणता येईल अशी आहे. समुराई तलवारीने स्वतःचे पोट एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत फाडून घेतात. या आत्महत्येस सेपुकू किंवा हाराकिरी असेही म्हणतात. ही एक प्रथा म्हणून जपानमध्ये रूढ आहे.

आज ही प्रथा फारशी प्रचलित नसली तरी आत्महत्या करणे कोणत्याही मार्गाने आत्महत्या करणे पाप समजले जात नाही. त्याऐवजी एक प्रकारची जबाबदारी समजली जाते. जपानचे हेल्पलाइन कर्मचारी केन जोसेफ म्हणतात की, “मी गेल्या ४० वर्षांपासून ते पहात आहे. वृद्ध जेव्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात तेव्हा हे पाऊले उचलतात. जास्त पाऊस पडला तरी लोक आत्महत्या करतात."

जपानमध्ये २० ते ४४ वयोगटातील मुलेही आत्महत्या करीत आहेत. तरुणांचे आत्महत्या करण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. २००८ च्या जागतिक मंदीनंतर तरुणांनी आत्महत्या हा एक सोपा मार्ग निवडला. जपानमधील ४० टक्के तरुणांची समस्या अशी आहे की त्यांना कायम नोकरी मिळत नाही. त्यामुळे नैराश्य येते आणि ते आत्महत्येचा मार्ग निवडतात.

स्वत:ला वनवासात टाकणे जपानमधील आत्महत्येचा पहिला टप्पादेखील मानला जातो. या अवस्थेस जपानमधील हिकिकोमोरी असे म्हणतात. यामध्ये लोक समाज, कुटुंब, मित्र आणि संपूर्ण जगापासून स्वत:ला वेगळे करतात. जपान सरकारच्या एका आकडेवारीनुसार २०१० मध्ये ७ लाख लोक हिकीकोमोरीमध्ये होते. त्यांचे सरासरी वय ३१ होते.

आत्महत्येची संस्कृती असली तरी कॉविड च्या काळात हे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. जपानमध्ये ऑक्टोबर महिन्यात कोविड-१९ च्या तुलनेत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जपानच्या नॅशनल पोलिस एजन्सीनुसार, देशातील मासिक आत्महत्यांची संख्या ऑक्टोबरमध्ये २,१५३ इतकी नोंदविली गेली. त्याच वेळी, आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार जपानमध्ये कोरोनाचे एकूण २,१०६ रुग्ण आढळले आहेत.

जपानमधील आत्महत्यांच्या प्रकरणातील तज्ञ आणि वासेदा युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक मिचिको उएदा यांचं म्हणणं आहे की, "इतर देशांच्या तुलनेत जपानमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण फार कमी आहे, त्यामुळे इथे लॉकडाउन लागू करण्याची गरज नाही. कोविड-१९ चा जपानवर फारसा परिणाम झाला नाही. परंतु इथल्या आत्महत्यांच्या संख्येत मोठी वाढ आहे जी चिंतेची बाब आहे." ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये महिलांच्या आत्महत्या गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत जवळपास ८३% वाढल्या. त्याच वेळी पुरुषांच्या आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, याआधी ऑगस्टमध्ये जपानमध्ये अंदाजे १९०० आत्महत्या झाल्या आहेत. या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत जपानमध्ये आत्महत्यांचे प्रमाण १५.३ टक्क्यांनी वाढले आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये जपानमधल्या आत्महत्येच्या बातम्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. निमित्त ठरलं जगभरात 'मिस शेरलॉक' (Miss Sherlock) म्हणून प्रसिद्ध असलेली जपानी अभिनेत्री 'युकी तेकुची' हिच्या आत्महत्येचं. तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या मृत्युनंतर जपानमध्ये आत्महत्येच्या दरात वाढ झाल्याचं आढळून आलं. आणि धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यात २० ते ४४ हा वयोगट मोठ्या प्रमाणात आहे.

(युकी तेकुची)

आकडेवारी पाहिली, आता करणं समजून घेऊ. प्रमुख कारणे अशी सांगता येतील:

१. नोकरीतल्या कामाच्या वाढलेल्या वेळा(

२. एकटेपणा

३. औदासिन्य

४. नकारात्मक सामाजिक दबाव

५. आर्थिक विवंचना किंवा नुकसान

६. मानसिक ताणतणाव

७. बेरोजगारी

अगदी लहान मुलांमध्येही ही ताणतणाव वाढलाय. त्यातही शाळांचा दबाव हे एक मुख्य कारण दिसून येत आहे. जपानमध्ये ही आकडेवारी स्पष्ट झाल्यामुळे  मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्यासाठी सरकारकडून हालचाल होणार आहे हे अपेक्षित आहे. १०० टक्के साक्षरता असलेल्या देशात आत्महत्यांची झालेली वाढ ही अतिशय चिंतेची बाब आहे. कोविड-१९ विषाणूशी लढतानाच ही टक्केवारी कशी कमी होईल यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागणार हे स्पष्ट आहे.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required