निकोटीन गमने खरोखर सिगरेटचं व्यसन सुटतं का ? वाचा विज्ञान काय म्हणतंय !!

लहान असताना प्रत्येकजण च्युईंग गम साठी हट्ट करतो… मग तरुणपणी त्यातली काही च्युईंग गम खाणारी बाळं सिगारेटच्या व्यसनाकडे वळतात. हे सिगारेटचे व्यसन इतके पराकोटीला पोचते की त्यातून अनेक आजार उद्भवतात. नंतर सुरू होतो व्यसन सोडण्याचा संघर्ष ! सिगारेट सोडण्यासाठी ना ना प्रकारचे उपाय करून बघितले जातात. त्यातलाच एक उपाय म्हणजे परत च्युईंग गम कडे वळणे. पण हे च्युईंग गम साधं नाही बरका… ते असतं निकोटिन वालं. आता हे निकोटीन गम खरोखरच सिगारेटचे व्यसन सोडवतं का? की ही फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे? आणि या निकोटीन गमचे शरीरावर काही दुष्परिणाम होतात का? चला तर मग जाणून घेऊया…

स्रोत

निकोटीन गम चघळण्याने सिगारेट सुटते. ती कशी? तर यामध्ये असते निकोटिन. होय, तेच निकोटिन जे सिगारेट मध्ये सुद्धा असते… पण या गम मध्ये त्याचे प्रमाण अल्प ठेवले जाते. आणि हे निकोटीन गम इतर च्युईंग गम सारखे चावायचे नसते बरं का! याला दाढेखाली ठेवून निवांत अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचे असते. यातले निकोटिन मग शरीरात शोषले जाऊन सिगारेटची तलफ कमी करण्याचे काम करते. यात एक गंमत अशी होते की, कधी कधी सिगारेटचे व्यसनी सिगारेट सोडून निकोटीन गमचेच व्यसनी बनून जातात आणि एका मागोमाग एक हे च्युईंग गम तोंडात टाकत राहतात. आता निसर्गाचा नियमच आहे की, अति प्रमाणात शरीरात घेतलेली कुठलीही गोष्ट शरीरासाठी घातकच असते. त्यामुळे निकोटीन गमचे सुद्धा शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. 

स्रोत

निकोटीन गमचा ओव्हरडोस झाला तर डोकेदुखी, पोटदुखी, लूज मोशन्स असे आजार होऊ शकतात. तसेच याचे त्वरित दिसून येणारे परिणाम म्हणजे, जबडा दुखणे, उचक्या लागणे, अपचन वगैरे आहेत.
यासोबतच आतड्यात गॅस निर्माण होणे, ऍसिडिटी, तोंडात जळजळ, आंबट ढेकर येणे, गळ्यात खरखर होणे, मळमळ होणे, दात दुखणे, रक्तदाब वाढणे, ह्रदयाची धडधड वाढणे इत्यादी विकार सुद्धा निकोटिन च्युईंग गम मुळे होतात. 

याचा दीर्घकालीन डोस घेतला तर केस झडणे, त्वचा शुष्क होणे इत्यादी परिणाम सुद्धा शरीरावर होऊ शकतात.

स्रोत

निकोटिन च्युईंग गम प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही. याचा वापर कुणी करू नये यासंबंधी सुद्धा काही नियम आहेत. 

हे च्युईंग गम 18 वर्षाखालील व्यक्तीसाठी निषिद्ध आहे. गर्भवती स्त्रियांनी सुद्धा याचा वापर अजिबात करू नये. जर थिओफिलाईन, टाक्रीन, क्लोजापाईन, रोपीनिरोल अशी औषधे सुरू असतील तर हे गम चघळणे अपायकारक ठरू शकते. 

अनियंत्रित उच्च रक्तदाब असेल, स्ट्रोक, पोटाचा अल्सर, यकृताचा आजार, हृदयाचा आजार, मधुमेह, ऍलर्जी, गळ्याची सूज, थायरॉईड समस्या वगैरे आजार असलेल्या व्यक्तींनी हे निकोटिन च्युईंग गम खाणे अतिशय धोकादायक आहे.

स्रोत

निकोटिन स्तनांच्या दुधात प्रवेश करते म्हणून स्तनपान देणाऱ्या मातांनी याचे सेवन केल्यास बाळावर सुद्धा वाईट परिणाम होतात. 

एकंदरीत काय, तर एका व्यसनाच्या तावडीतून सुटण्यासाठी दुसरे व्यसन लावून घेणे आणि त्याचे ‘साईड इफेक्ट्स’ भोगणे चुकीचेच आहे. निकोटीन गमचा वापर अल्पकाळासाठी केला तरच फायदेशीर ठरतो. आणि व्यसन सोडण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे आपला मनोनिग्रह असतो हे लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे! काय म्हणता? बरोबर ना?

सबस्क्राईब करा

* indicates required