computer

कोरोनाचे व्हॅक्सीन तयार करण्यासाठी तंबाखू आणि गांजाच्या पानांचा वापर का होतोय? पूर्ण माहिती वाचा !!

कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनच्या शोधात जगभरात अनेक औषध कंपन्या वेगवेगळे मार्ग तपासून बघत आहेत. आश्चर्य वाटेल, पण या प्रयत्नात आपण कल्पना करू शकणार नाही अशा पदार्थांचा वापर सध्या शास्त्रज्ञ करत आहेत. उदाहरणार्थ, काही कंपन्या तंबाखूच्या पानांचा वापर करून बघत आहेत. काही शास्त्रज्ञ गांजाचा पानाचा वापराने काही फरक पडतो का हे पाहात आहेत. या दोन्ही वनस्पतींची पाने केवळ एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन तयार करण्यासाठी वापरली जातात. ते का आणि कसे हे सांगण्यापूर्वी एक महत्वाची सूचना! तंबाखू खाण्याचा आणि गांजा ओढण्याचा व्हॅक्सीन संबंध जोडून व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट तयार करू नका.

ब्रिटिश-अमेरिकन टोबॅको कंपनी (BAT) आणि फिलीप मॉरीस या दोन सिगारेटच्या कंपन्यां अनुक्रमे केंच्युकी बायोप्रोसेसींग आणि मेडिकॅगो या दोन औषध कंपन्यांसोबत व्हॅक्सीनवर संशोधन करत आहेत. त्यापैकी ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनी (BAT)च्या चाचण्या आता दुसर्‍या टप्प्यावर पोहचल्या आहेत. आता हे सगळे कसे काम करतात हे समजण्यासाठी आधी अँटीजेन म्हणजे काय ते समजून घेऊया!

अँटीजेन म्हणजे ज्यामुळे अँटीबॉडीज तयार होतात असे प्रथिन. अँटीबॉडीज म्हणजे व्हायरसचा मुकाबला करणारे प्रथिन. यासाठी आधी शास्त्रज्ञांनी अँटीजेनचे डोस तंबाखूच्या वनस्पतीला टोचले. ते टोचल्यावर अँटीजेन मोठ्या प्रमाणात वनस्पतीत तयार झाले. अशा अँटीजेनयुक्त झाडाची पाने वाळवून त्यातून अँटीजेन वेगळे केले जाते. त्याचे शुध्दीकरण करण्यात येते आणि व्हॅक्सीन म्हणून त्याचा वापर करण्यात येतो. याच पध्दतीने गांजाच्या झाडाचाही अँटीजेन तयार करण्यासाठी झियस ही कॅनडातील कंपनी काम करते आहे. कॅनडामध्ये औषधी वनस्पती म्हणू गांजाला मान्यता असल्याने हा प्रयोग केवळ कॅनडापुरताच मर्यादित आहे.

हे प्रयत्न वनस्पतीच्या माध्यमातून लस तयार करण्याचे झाले. याच वेळी काही शास्त्रज्ञ किटकांपासून अँटीजेन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. निसर्गत: कीटकांचे एक वैशिष्ट्य असे आढळते की एका किटकाला बाधणारा व्हायरस दुसर्‍या किटकाला बाधेलच असे नसते. या गुणधर्माचा वापर करून अनेक त्रासदायक किटकांचा नायनाट करण्यात येतो. कोरोनाची लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ आपण ज्याला पतंग म्हणतो त्या किटकाचा वापर करत आहेत. आपल्या घरात संध्याकाळी दिव्याभोवती फिरणारे किंवा शेरोशायरीत प्रेमाचे प्रतिक असलेला किटक म्हणजे पतंग!

(फॉल आर्मीवर्म)

आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक किटकाचे गुणधर्म वेगळे असतात. कोवीडची लस बनवण्यासाठी एका विशिष्ट जातीच्या पतंगाचा वापर केला जातो, त्याला फॉल आर्मीवर्म म्हटले जाते. शास्त्रीय संज्ञेप्रमाणे त्याचे नाव Spodoptera frugiperda असे आहे. या पतंगांच्या अळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात पाने खातात की त्यामुळे शेतीचे फार मोठे नुकसान होते.साहजिकच या प्रजातीचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास तयार आहे. शास्त्रज्ञ या किटकाला जेनेटीक बदल केलेले बॅक्युलोव्हायरस टोचतात. या बॅक्युलोव्हायरसचा पतंगाच्या शरीरात प्रवेश झाला की त्याचा मुकाबला करण्यासाठी अँटीजेन तयार होते. हे अँटीजेन व्हॅक्सीन बनवण्यासाठी वापरले जाते.

आता तुमच्या मनात असे आले असेल की सगळे प्रयोग अंदाज पंचे दाहोदरसे या पध्दतीचे आहेत का? तर नाही. पतंगांपासून अँटीजेन बनवायचे यशस्वी प्रयोग करून या आधी सॅनोफीने (प्रोटीन सायन्स) हेच तंत्र वापरून फ्लूच्या व्हायरसवर फ्लूब्लॉक हे व्हॅक्सीन बनवलेले आहे. सध्या सॅनोफी आणि नोव्हॅव्हाक्स, डेन्मार्कची एक्स्प्रेशन बायोटेक्नॉलॉजी, जपानी कंपनी शिओनोगी आणि स्पॅनिश अ‍ॅल्जीनेक्स या सर्व कंपन्या किटकांच्या माध्यमातून व्हॅक्सीन बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.

आपण यापैकी कोणाला तरी यश मिळू दे अशीच आशा करू शकतो नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required