computer

जिवंतपणी आणि मृत्यूनंतर काय दान करता येते? अवयवदान कसे चालते?

आपल्याकडे दान खूप् महत्त्वाचं मानलं जातं. अन्नदान, जलदान, धनदान, विद्यादान, रक्तदान ही सगळीच दाने श्रेष्ठ मानली गेली आहेत. याच यादीत अजून एक नाव जोडणे गरजेचे आहे, ते म्हणजे अवयवदान. जिवंतपणी आणि मृत्यूनंतरसुद्धा हे दान करून गरजूंचे प्राण वाचवता येतात. एका व्यक्तीने दान केलेले अवयव दुसऱ्या गरजू व्यक्तीच्या शरीरात बसवले जातात, म्हणजेच प्रत्यारोपित केले जातात. यामुळे तिचा केवळ जीवच वाचतो असे नाही तर जगण्याचा दर्जाही सुधारतो.

एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारे अवयवांचे प्रत्यारोपण आज जगभरात असाध्य आजारावरचा उत्तम पर्याय म्हणून स्वीकारला जात आहे. गंभीर स्वरूपाचा हृदयविकार किंवा शेवटच्या स्टेजचा किडनीचा आजार यासारख्या गंभीर रोगांसाठी ऑर्गन डोनेशन किंवा संबंधित अवयवाचे प्रत्यारोपण हा खात्रीशीर उपाय ठरतो.

तज्ञांच्या मते एका व्यक्तीमुळे आठ लोकांचे प्राण वाचू शकतात. परंतु भारतासारख्या देशात त्याला अजूनही खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आजही आपल्याकडे दरवर्षी अवयवांच्या प्रतिक्षेत शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. एकतर अवयव दानाबाबत आपल्याकडे पुरेशी जागृती झालेली नाही. शिवाय मृत्यू, अंत्यसंस्कार, आत्म्याची मुक्ती यांसंबंधी असलेल्या अनेक समजुतींमुळे अवयव दान करणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी आहे. यामुळे अवयवप्रदाते आणि अवयवांच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण यांच्यामधील दरी अजूनही रुंदावलेलीच आहे.

यासंबंधी किती भयानक परिस्थिती आहे हे समजून घ्यायचे असेल तर पुढील आकडे बघा:

- भारतातील जवळपास पावणे दोन लाख रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहे,त पण केवळ पाच हजार लोकांना प्रत्यारोपित किडनीचा लाभ झालेला दिसतो.
- तीसपैकी एका व्यक्तीला किडनी मिळते.
- विविध अवयवांच्या वेटिंग लिस्टमधील ९० टक्के लोक अवयव न मिळाल्याने मृत्युमुखी पडतात.

- भारताला दरवर्षी प्रत्यारोपणासाठी १,००,००० यकृतांची गरज भासते, त्यापैकी फक्त १००० रुग्णांना यकृत मिळते.
- यकृत देणाऱ्यांपैकी जिवंत डोनर्सचे प्रमाण ७० टक्के आहे, तर मृत डोनर्सचे केवळ ३० टक्के.

- दरवर्षी सुमारे ५०,००० हृदयांची आणि २०,००० फुफ्फुसांची गरज असते.

प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने जरी अवयवदानाचा संकल्प केला तरी हे चित्र खूप पालटेल.

अवयव प्रदाते म्हणजेच डोनर दोन प्रकारचे असतात

- मृत व्यक्ती- जिचे अवयव दान करावयाचे आहेत ती- किडनी, स्वादुपिंड, यकृत, फुप्फुसे, हृदय, आतडी, त्वचा दान करू शकते.

- जीवित व्यक्ती- किडनी, यकृताचा काही भाग, फुफुस, आतडे, स्वादुपिंड दान करू शकते.

१९९४ मध्ये केंद्र सरकारने यासंबंधीचा कायदा संमत केला. त्यानुसार मेंदू मृत झालेल्या परंतु हृदयक्रिया सुरू असलेल्या रुग्णाचे अवयव दान करण्यासाठी काढून घेता येतात. ब्रेन डेथ ही अशी कंडिशन आहे ज्यामध्ये मेंदूला गंभीर आणि दुरुस्ती पलीकडली इजा होते. यामुळे मेंदूशी संबंधित सर्व क्रिया बंद पडतात. परंतु ब्रेन डेथ म्हणजे कोमा किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेट नाही. ब्रेन डेथ मध्ये मेंदूला इजा होऊन तो काम करेनासा होतो, परंतु हृदयाचे कार्य सुरळीतपणे सुरू असल्यामुळे महत्त्वाच्या इंद्रियांना होणारा रक्तपुरवठा काही तास किंवा दिवस व्यवस्थित सुरू राहतो. ब्रेन डेथचे निदान काही साध्या शारीरिक तपासण्यांच्या सहाय्याने करता येते. ब्रेन डेथनंतर शारीरिक पातळीवर अनेक बदल दिसून येतात. यामध्ये डोळ्याच्या बाहुली कडून मिळणारा प्रतिसाद, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, आणि शरीराचे तापमान यात बदल दिसतात. हे बदल आणि इतर नैसर्गिक प्रतिसादांच्या सहाय्याने ब्रेन डेड(मेंदू मृत पावला आहे की नाही) आहे की नाही याचा अंदाज बांधता येतो. या नैसर्गिक प्रतिसादांमध्ये श्वासोच्छवास, खोकला, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप यांचा समावेश होतो. या चाचण्या दर सहा तासांनी केल्या जातात आणि होणारे बारीकसारीक बदल नोंदवले जातात. रुग्ण ब्रेन डेड झाल्याचे निश्चित झाले की डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकाला त्याबद्दल माहिती देऊन रुग्णाचे कुठले अवयव दान करण्याची इच्छा आहे का यासंबंधी विचारतात. रुग्ण जर लहान मूल असेल तर त्याच्या पालकांच्या इच्छेनुसार पुढील कार्यवाही केली जाते. या सगळ्यांमध्ये वेळ हा महत्त्वाचा घटक आहे, कारण मृत्यूनंतर काही काळातच अवयव नैसर्गिकरीत्या निकामी व्हायला सुरुवात होते.

अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया:

या प्रक्रियेमध्ये शस्त्रक्रियेच्या साहाय्याने गरजू रुग्णाच्या शरीरात अवयव प्रत्यारोपित केला जातो. त्यामध्ये पुढील टप्पे समाविष्ट आहेत
- अवयवदान व प्रत्यारोपण यासाठी हॉस्पिटलचा स्वतंत्र विभाग कार्यरत असतो आणि अवयव प्रत्यारोपणाची संबंधित सर्व गोष्टींचा समन्वय साधण्याची जबाबदारी या विभागाकडे असते. मृत व्यक्तींचे अवयवदान आणि प्रत्यारोपण ही कामेही या विभागात केली जातात
- अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पाडण्यामध्ये ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका असते. ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर संभाव्य डोनर असलेल्या हॉस्पिटलला भेट देऊन डोनरची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री आणि सध्याची परिस्थिती जाणून घेतो. त्यानुसार डोनर आणि तो ज्या अवयवाचे दान करू इच्छित आहे त्याचे मूल्यमापन केले जाते. नंतर डोनरच्या जवळच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांची संमती मिळाली की एका संमतीपत्र (कन्सेंट फॉर्म)वर त्यांची सही घेतली जाते आणि त्यानंतर प्रत्यारोपणाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होते.
- काही प्रकारचे दाते इच्छा असूनही अवयवदान करू शकत नाहीत. मृत्यूसमयी कॅन्सर पसरत असलेले, एचआयव्ही बाधित किंवा कोणताही गंभीर जंतुसंसर्ग असलेले रुग्ण, तसेच मधुमेह, कॅन्सर, एचआयव्ही, किडनीविकार असलेले जीवित रुग्ण यांना अवयवदान करता येत नाही.
- प्रत्यारोपण करणाऱ्या टीममध्ये सर्जन, परिचारिका, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर यांच्या व्यतिरिक्त ऑर्गन प्रीझर्वेशन टेक्निशियन(अवयव टिकवण्याच्या तंत्रातले जाणकार) यांचा समावेश असतो.
- दात्याच्या शरीरातून अवयव काढून येण्याची प्रक्रिया ऑपरेटिंग रूममध्ये केली जाते. दात्याच्या शरीरातून अवयव काढून घेण्यापूर्वी त्यावर असलेले रक्त काढून टाकून तो अवयव 'साफ' केला जातो. यासाठी बर्फाएवढे थंड तापमान असलेले विशिष्ट प्रीझर्वेशन सोल्युशन वापरतात. त्यात इलेक्ट्रोलाईट आणि इतर पोषक घटक असतात.
- त्यानंतर हा अवयव निर्जंतुक केलेल्या कंटेनरमध्ये ठेवतात. हे कंटेनर बर्फामध्ये पॅक करून गरजू व्यक्तीसाठी ट्रान्सप्लांट सेंटरकडे वाहून नेले जातात. ही क्रिया शक्य तितकी झटपट करावी लागते.
- हृदय आणि फुप्फुसे डोनरच्या शरीरातून बाहेर काढल्यापासून चार तासांच्या आत ट्रान्सप्लांट करावी लागतात. यकृत बारा ते अठरा तासांपर्यंत प्रीझर्व्ह करता येते. स्वादुपिंड आठ ते बारा तास टिकू शकते. आतडे सुमारे आठ तास, तर किडनी २४ ते ४८ तास व्यवस्थित राहू शकतात.

या 'टाईम फॅक्टर'चा विचार करूनच ग्रीन कॉरिडॉर ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. यात अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना जर त्या रस्त्याला रहदारी जास्त असेल किंवा तो जास्त रहदारीचा काळ म्हणजे पीक अवर असेल तर रस्त्यावरील एक लेन मोकळी ठेवतात. यामुळे हा अवयव वाहून नेणाऱ्या वाहनाला रहदारीमुळे विनाकारण होणाऱ्या विलंबाचा सामना करावा लागत नाही आणि अवयव निकामी होण्यापूर्वी गरजू व्यक्तीला उपलब्ध होतो.

एकावेळी अनेकांची नड भागवणारे अवयवदान किती श्रेष्ठ आहे याबद्दल आतातरी तुमची खात्री पटली असेल ना? तसे असेल तर आजच अवयवदानासंबंधीचा फॉर्म भरून टाकायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते?

सबस्क्राईब करा

* indicates required