computer

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे कशी काय मिळतात? ओटीसी उत्पादने काय असतात ?

जुन्या काळात छोट्या मोठ्या दुखण्यांसाठी आज्जी आपला बटवा उघडत असे. डोकेदुखीला सुंठाचा लेप, पोटदुखी म्हणले की ओवा आणि गरम पाणी, पित्त म्हणले की आले आणि लिंबू.. वगैरे..

भरपूर कष्ट आणि गावातले हवापाणी यामुळे लोक आजारी पडत नसत. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि यंत्रयुगात लोकांचे आयुष्य यंत्रासारखे झाले आहे. लोक दिवस उजाडला की घराबाहेर पडतात आणि दिवसभर धावपळ करून मेहनत करून थकतात. घरी येतात आणि जेवून झोपतात. या अशा दगदग करण्यामुळे आम्लपित्त, पोटदुखी, डोकेदुखी आणि मायग्रेन सारख्या समस्या डोके वर काढत आहेत.

बदलत्या काळाप्रमणे हवामानात होणारे बदल सर्दी, ताप खोकला यासारखे रोग घेऊन येतात, पण प्रदूषण आणि पर्यावरणाचं नुकसान झाल्यामुळे हे रोग चिवट होत आहेत. वेळेचा अभावामुळे लोक दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. आजार तसा छोटासाच असतो. किंवा अचानकच एखादा त्रास सुरू होतो. उलट्या जुलाब किंवा डोकेदुखी वगैरे आणि अशा वेळेस डॉक्टरकडे जाईपर्यंत पेशंटला धीर धरवला जात नाही.

काय बरे करावे अशा परिस्थितीत? मग वेळेला केमिस्ट येतो धावून. केमिस्टला विचारून मग पेशंटला एखादे औषध दिले जाते. तसा केमिस्टपण त्या बाबतीत जाणकार असल्याने तो व्यवस्थित औषधे देतो. कशी काय मिळाली बरे ही औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय? पडलाय का तुम्हाला हा प्रश्न? की केमिस्ट कायद्याचे पालन न करता तुम्हाला ही औषधे देतोय जाणून घेऊ, चला तर मग!

जुन्या काळात लोक घरगुती उपाय करत असत हे तर आपण पाहिले पण मग सगळी औषधे डॉक्टरकडे मिळत असत. चिठ्ठी असेल तरच केमिस्ट औषधे देत असे किंवा त्यानुसार बनवत असे. पण नंतरच्या काळात असे होऊ लागले की पेशंट जास्त वेळ थांबू शकत नसे. डॉक्टर येईपर्यंत त्याच्या वेदना थांबत नसत. मग केमिस्टसाठी वेगळा एक अभ्यासक्रम निघाला. त्या अभ्यासक्रमात त्यांना व्यवस्थित औषढविषयक ज्ञान देण्यात येऊ लागले.

या औषध निर्मात्या वर्गाने नंतर साध्या आजारांवर चालणारी आणि चिठ्ठी शिवाय घेता येणारी काही औषधे शोधून काढली. अन्न आणि औषध नियमन प्रशासनाकडे ही औषधे देण्यात आली आणि अन्न व औषध नियामक प्रशासनाने चाचणी केली. त्यातून जी औषधे सुरक्षित आहेत आणि जरा जास्त प्रमाणात घेतल्या गेले तरी अपाय होणार नाही, अशी औषधे वेगळी करून ती केमिस्ट प्रिस्क्रिप्शन शिवाय विकू शकतो हे ठरवले गेले. याच औषधांना 'ओटीसी उत्पादने' असे म्हणले जाते.

आपल्याला माहीत असावीत अशी काही ओटीसी उत्पादने ...

१. पॅरासेटामॉल:

हे घराघरात वापरले जाणारे औषध आहे. हे डोकेदुखी, अंगदुखी आणि तापासाठी वापरावे. 500 मिलिग्रामची आणि 650 मिलिग्रामची अशा दोन प्रकारच्या गोळ्या असतात. 650 मिलिग्रमची गोळी अंगदुखीसाठी वापरली जाते. लहान मुलांसाठी त्यांच्या वजनानुसार पातळ औषधे आहेत.

२. सिट्रिझीन:

ही छोटी गोळी लोकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. ही गोळी सर्दीसाठी वापरतात. पण ही गोळी ॲलर्जीसाठीसुध्दा वापरता येते हे अनेकांना माहीत नसते. अंगावर खाज येणे, किंवा कुठल्या छोट्या किड्याच्या त्वचेच्या संपर्कात येण्याने झालेले इन्फेक्शन अशा गोष्टींसाठी आपण सिट्रिझीन वापरू शकतो.

३. सिनारेस्ट:

सर्दीसाठी आणि तापासाठी हे औषध खूप लोकप्रिय आहे. यामध्ये पॅरासेटामॉल आणि सर्दीची औषधे मिसळलेली असतात. हे औषध खूप सुरक्षित समजले जाते. याचा जास्तीच डोस चुकून घेतला गेल्यास त्रास होण्याची शक्यता नगण्य असते. याचे पातळ औषध लहान मुलांना वजनाप्रमाणे सर्दिसाठी देता येते. सर्दी जर ही औषधे घेऊनही तीन दिवसांनी कमी होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे चालू करावीत.

४. सायक्लोपाम आणि ड्रोटिन:

पोटाचे स्नायू आखडल्यामुळे पोटदुखी होते. त्यामुळे पोटाच्या स्नायूंना आराम मिळावा म्हणून औषधे दिली जातात. सायक्लोपाम किंवा द्रोटिन ही औषधे पोटदुखीवर उपाय म्हणून देता येतात.

५. लोमौटिल आणि रोको:

जुलाब हा एक साधा वाटणारा पण रौद्ररूप धारण करणारा आजार आहे. जुलाब कमी होण्यासाठी लोमोटील किंवा रोको ही औषधे देता येतात. इसबगोलची पावडर छान लागू पडते. पोटात कळ येऊन जुलाब होत असल्यास त्याबरोबर द्रोटीन किंवा सायक्लोपाम घ्यावी. लिंबू सरबत किंवा इलेक्टरॉल पावडर पाण्यात मिसळून थोडे थोडे पित राहणे बरे पडते. लहान मुलांसाठी उलट्या जुलाब कमी होण्यासाठी मिळणारे औषध घरात ठेवावे. फॅमिली डॉक्टरांना विचारून घरात इमर्जन्सीवेळी वापरता येते. मासिक पाळीचा त्रास: पोटाचे स्नायू आखडले जाऊन ओटीपोटात कळ येत असते.म्हणून सायक्लोपाम बरी पडते. पोटाचे स्नायू मोकळे होऊन पोटाला आराम पडतो.

६. गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर गर्भनिरोधक साधने:

गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर सुरक्षित उपाय डॉक्टरांच्या चिठ्ठी नसतानाही केमिस्टकडून घेता येतात. गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टर लिहून देत नसले तरीही सण, वार किंवा पिकनिकचे कारण देऊन पाळी पुढे ढकलण्यासाठी वापरू नयेत. त्यामुळे पुढे कर्करोगाचा धोका संभवतो.

आजच्या काळात पटकन आजार बरे करणाऱ्या गोळ्या आणि औषधे आहेत. रात्री अपरात्री होणारा त्रास वाचवण्यासाठी आपण ती घेऊन घरात ठेवू शकतो. पण दरवेळी त्याची एक्सपायरी डेट बघून ठेवणे. जुनी औषधे टाकून देणे ह्या गोष्टी करणे गरजेचे आहे. कुठलेही नवे औषध वापरून बघण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरला माहिती विचारून घ्यावी. औषधासोबत येणारी माहितीपत्रके वाचून मगच औषधे घ्यावी.

औषधे अशी काउंटरवर लगेच मिळतात म्हणून कितीही वापरणे आणि सारखी सारखी वापरणे टाळावे. लिव्हर आणि किडनी सारख्या अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. काहीही झाले तरीही शेवटी वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे आणि वेळेवर आहार घेणे यामुळे आपण पूर्णपणे निरोगी होऊ शकतो. त्यामुळे नियमित रहा, निरोगी रहा.

 

लेखिका: क्षमा कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required