computer

कोरोनाचा रुग्ण शोधण्यासाठी चीनी पोलिसांनी कोणता हायटेक मार्ग शोधलाय?

गर्दीतून कोरोनाग्रस्त लोकांना कसं ओळखायचं हा मोठा प्रश्न आहे. यासाठी चीनने एक भन्नाट आयडिया शोधली आहे. सध्या चीनमधल्या पोलिसांना एक हेल्मेट देण्यात आलं आहे. या हेल्मेटच्या माध्यमातून लोकांच्या शरीराचं तापमान तपासलं जातं. जर कोणाच्या शरीराचं तापमान ३७.३ पेक्षा जास्त असेल तर हेल्मेटमधून एकप्रकारचा अलार्म वाजतो. यानंतर त्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी केली जाते. सायफाय सिनेमाला शोभेल असं हे यंत्र आहे. चला तर या हेल्मेटबद्दल आणखी जाणून घेऊया.

या हेल्मेटचं नाव आहे Smart Helmet N901. शेंझेन येथील ‘क्वांग ची’ या कंपनीने या हेल्मेटची निर्मिती केली आहे. चीनमधल्या जवळजवळ सर्वच मुख्य शहरांमध्ये पोलिसांना Smart Helmet N901 देण्यात आलं आहे. या हेल्मेटने ५ मीटरवरून शरीराचं तापमान मोजता येतं. शरीराचं तापमान मोजण्यामागचं कारण म्हणजे कोरोना विषाणूमुळे सर्वात आधी ताप येतो.

 

या हेल्मेटचा हा एवढाच उपयोग नाही. हेल्मेटच्या रडारवर येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावरून पोलिसांना त्या त्या व्यक्तीची माहिती देखील समजते. याखेरीज हे हेल्मेट अत्यंत वेगवान काम करतं. एका पोलीस अधिकाऱ्याला १०० पेक्षा जास्त लोकांची चाचणी २ मिनिटात पूर्ण करता येईल, एवढी या हेल्मेटची क्षमता आहे. कंपनीचा दावा आहे की हेल्मेट १००% खात्रीशीर माहिती पुरवतं.

सध्या चीनमध्ये नवीन कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे, पण कोरोनाचा चीन बाहेर धुमाकूळ सुरु आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार ९४,००० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि ३२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बातमी अशी की जवळजवळ ५०,००० लोक यातून बचावले आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required