computer

प्रोस्टेट कॅन्सर : सुरुवातीच्या अवस्थेत निष्क्रिय असणारा पण नंतर तितकाच घातक ठरणारा सायलेंट किलर

प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुषांच्या शरीरात असलेली एक प्रमुख ग्रंथी. या ग्रंथी मूत्रपिंडाच्या खाली असतात आणि त्यांना मराठीमध्ये पुर:स्थ ग्रंथी असं नाव आहे. मुख्यतः वीर्याची म्हणजेच सीमेनची निर्मिती हे या ग्रंथीचं कार्य. तिचा आकार साधारण अक्रोडाइतका असतो. या ग्रंथीमध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव झाल्यास तिथल्या पेशींचं विभाजन होऊन तिचा आकार वाढतो. प्रोस्टेट कॅन्सरचं निश्चित कारण माहिती नसलं तरी पाश्चात्य देशांमध्ये याचं प्रमाण बरेच जास्त आहे. शिवाय आरामदायी, बैठी जीवनशैली, अतिरिक्त वजन यांचाही त्याच्याशी संबंध आहे. त्यामुळे आपल्याकडेही मोठ्या शहरांमध्ये याचं प्रमाण वाढतं आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीमधील पेशी त्यांच्या डीएनएमध्ये बदल घडवून आणायला सुरुवात करतात, तेव्हा विकाराचा प्रादुर्भाव होतो. या डीएनएमध्ये पेशींनी कशाप्रकारे वागावं याबद्दलच्या सूचना लिहून ठेवलेल्या असतात. डीएनएमध्ये झालेल्या बदलामुळे पेशी अनियंत्रितरित्या वाढायला लागतात. या पेशींपासून ट्युमर तयार होतो, आणि तो आजूबाजूच्या पेशींच्या कामांमध्ये अडथळे आणायला सुरुवात करतो.

प्रोस्टेट कॅन्सर हा मुख्यत्वेकरून पन्नाशीच्या पुढच्या पुरुषांमध्ये आढळतो. या कॅन्सरचं वैशिष्ट्य म्हणजे याची लक्षणं बहुधा फार लवकर दिसत नाहीत. शिवाय प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणं हा सामान्यतः आढळून येणारा विकार आणि प्रोस्टेट कॅन्सर या दोन्हींची लक्षणं जवळपास सारखी आहेत. त्यामुळे अनेकदा विकाराने ॲडव्हान्स्ड स्टेज गाठल्यानंतरच त्याचं निदान होतं.आपल्या देशात नवी दिल्ली, कोलकाता, तिरुवनंतपुरम, आणि पुणे या चार मोठ्या शहरांत प्रोस्टेट कॅन्सरचे बहुसंख्य रुग्ण आहेत. मुंबई, बंगलोर मध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. तेथेही हा झपाट्याने पसरत आहे.

प्रोस्टेट कॅन्सर हा बरा होण्यासारखा आजार आहे. फक्त निदान वेळेत होणं महत्त्वाचं. यामध्ये एक मुख्य अडथळा आहे तो म्हणजे कॅन्सर ॲडव्हान्स्ड स्टेजला पोहोचेपर्यंत याची कोणतीही लक्षणं खास करून जाणवत नाहीत. कॅन्सर फारच पसरला आणि प्रोस्टेट ग्रंथीचा आकार मूत्रनलिकेवर दाब पडण्याइतपत वाढला, की याची लक्षणं दिसायला सुरुवात होते.

अनेकदा पुरुषांना प्रोस्टेट ग्रंथी वाढणं या विकाराचा सामना करावा लागतो. पण दरवेळी प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणं म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर असं नाही. सामान्यतः वय वाढत जातं तसतसं कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीचा आकारही वाढत जातो. हे सामान्य आहे. या प्रकाराला बिनाइन प्रोस्टेट एनलार्जमेंट असं नाव आहे.

प्रोस्टेट कॅन्सर ची लक्षणं व्यक्तिपरत्वे थोडीफार बदलतात, परंतु सामान्यतः खालील लक्षणं आढळून आल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेणं चांगलं.

- लघवी करताना वेदना आणि जळजळ होणं
- समागमाच्या वेळी वेदना होणं.
- लघवीमध्ये रक्ताचा अंश आढळणं.
- लघवी करताना अडथळा (थांबून थांबून लघवी) आणि तिच्या प्रवाहाचा जोर कमी असणं.
- वीर्यामध्ये रक्ताचा अंश आढळणं.
- लघवीला जाऊन आल्यानंतरही ब्लॅडर पूर्ण रिकामा न झाल्याची भावना होत राहणं.
- पाठ, कंबर आणि पार्श्वभागामध्ये सातत्याने वेदना होणं
- (विशेषतः रात्रीच्या वेळी) वारंवार लघवीला जावं लागणं

प्रोस्टेट कॅन्सरचं लवकर निदान करणं अवघड असतं. याची कोणतीही सुरुवातीची लक्षणं आढळून येत नाहीत. ज्या प्रकारे हा कॅन्सर पसरतो, तोही यामागचा एक मुख्य घटक आहे. जेव्हा आकाराने वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथीचा दाब मूत्रनलिकेवर पडल्याने लघवीच्या प्रवाहात बदल होतो तेव्हा कुठेतरी गडबड आहे हे जाणवतं. परंतु हा कॅन्सर मुख्यतः प्रोस्टेट ग्रंथीच्या बाहेरच्या भागात जास्त प्रमाणात पसरत असल्याने जोपर्यंत तो ॲडव्हान्स्ड स्टेज गाठत नाही, तोपर्यंत त्याचा मूत्रनलिकेला अडथळा होत नाही. त्यामुळे लवकर निदान अवघड होऊन बसतं.

ॲडव्हान्स्ड स्टेजला कॅन्सर प्रोस्टेट ग्रंथीच्या बाहेर शरीरात इतरत्र पसरतो. त्यावेळी खालील लक्षणं आढळून येतात.
- अकारण वजनात घट होणं
- कंबर आणि पार्श्वभागानजीक वेदना होणं
- लघवी आणि वीर्यामध्ये रक्ताचा अंश आढळणं
- समागमाच्या वेळी शिश्न ताठ होण्यात अडचणी येणं

प्रोस्टेट कॅन्सरचा धोका खालील गटातल्या पुरुषांना जास्त असतो
- कौटुंबिक इतिहास म्हणजे तुमचे वडील, आजोबा, काका यांच्यापैकी कोणाला हा विकार असेल तर तो तुम्हालाही असण्याची शक्यता असते.
- पन्नाशीच्या नंतर हा विकार होण्याची शक्यता वाढते
- एका संशोधनानुसार कृष्णवर्णीय लोकांमध्ये हा विकार जास्त प्रमाणात आढळून येतो
- स्थूलत्वामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते

सुरुवातीच्या अवस्थेत शरीरात कोणतेही नुकसान न करता निष्क्रियपणे पडून राहणारा हा आजार उपचार न केल्याने बळावला तर जिवावरही बेतू शकतो, यावरून त्याचं गांभीर्य लक्षात यावं.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required