computer

हे ११ पदार्थ तुम्ही पण चुकीच्या पद्धतीने साठवता का? योग्य पद्धत समजावून घ्या.

स्वयंपाकघर म्हणजे घराचा केंद्रबिंदू. ते नीटनेटकं, स्वच्छ ठेवण्यासाठी आणि घरातल्या सगळ्यांसाठी रुचकर, पोषणमूल्यांनी परिपूर्ण असं अन्न रांधण्यासाठी गृहिणी झटत असते. रोजच्या स्वयंपाकात जास्तीत जास्त वैविध्य ठेवणं आणि महिन्याच्या ठरावीक उत्पन्नात किराणा, भाज्या यांचा खर्च बसवणं हे प्रत्येकीपुढचं खरं आव्हान. बऱ्याचदा होतं असं की किराणामाल, भाज्या, फळं हे सगळं आणलं तर जातं, पण नीट साठवलं जात नाही. त्यामुळे हे पदार्थ लवकर खराब होतात. यातून अन्नाची नासाडी तर होतेच, पण घरातल्या लोकांचं आरोग्यपण बिघडू शकतं. त्यासाठी पदार्थ साठवण्याच्या योग्य पद्धती माहिती असायला हव्यात.

१. टोमॅटो:

बहुतेकींना टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवायची सवय असते. पण टोमॅटो शक्यतो बाहेर रूम टेम्परेचरला ठेवावेत. फ्रीजबाहेर ठेवलेल्या टोमॅटोचा स्वाद जास्त चांगल्या प्रकारे पदार्थात उतरतो. टोमॅटोमध्ये स्वाद उत्पन्न करणारी एन्झाइम्स कमी तपमानाला नष्ट होतात. अर्थात हवेत उष्मा जास्त असेल, तुम्ही मुंबईसारख्या दमट हवेच्या ठिकाणी राहात असाल, तर टोमॅटो फ्रीजमध्येच, पण कापडी पिशवीत ठेवून आणि ती व्यवस्थित बंद करूनच ठेवावेत. टोमॅटो घेतानाही कडक आणि छोटे असे पाहून घ्यावेत, म्हणजे ते जास्त टिकतात.
 

२ व ३. कांदे आणि लसूण:

कांदे आणि लसूण कुणी फ्रिजमध्ये ठेवत नाहीत. पण बऱ्याच गृहिणी कांदे, बटाटे, लसूण हे ठेवण्याची जी जाळी किंवा टोपली असते ती लख्ख उजेड आणि ऊन असेल अशा जागी ठेवतात. कांदे आणि लसूण यांना टिकण्यासाठी उब आवश्यक असली तरी उजेड हा त्यांचा शत्रू आहे. त्यामुळे कांदे आणि लसूण उजेडात न ठेवता अंधाऱ्या जागी साठवावेत. मात्र त्या जागी हवा पुरेशी खेळती असावी. त्यासाठी ते सच्छिद्र टोपलीत आणि जमिनीपासून काही उंचीवर साठवावेत. कांदा चिरून तो लगेच वापरायचा नसेल तर फ्रीजमध्ये ठेवायची पण बऱ्याच जणींना सवय असते. हे टाळावं. कांदा चिरल्यावर लगेचच त्याचं ऑक्सिडेशन सुरू होतं. तो कच्चा तसाच दीर्घकाळ ठेवल्यास त्यात अनेक हानिकारक रसायनं निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी कांदा चिरल्यावर लगेच वापरावा.

४. बटाटे:

बटाटेही फ्रिजमध्ये न ठेवता अंधाऱ्या पण कोरड्या, हवा खेळती राहील अशा जागी कोरड्या पेपरबॅगमध्ये किंवा सच्छिद्र टोपलीत ठेवावेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदे आणि बटाटे एकाच रॅकमध्ये ठेवू नयेत. कांद्यातून सिनप्रोप्नाथियल एस ऑक्साईड नावाचा वायू बाहेर पडत असतो. त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. केळी, सफरचंदं अशा फळांजवळ पण बटाटे ठेवू नयेत, कारण या फळांमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे बटाटे कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.

५ मश्रूम:

लगेच वापरायचे नसतील तर मश्रूम स्वच्छ धुवून, कोरडे करून पेपर बॅगमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवावेत. फ्रिजमध्येदेखील मश्रूम्स शक्यतो दोन दिवसांपेक्षा जास्त साठवू नयेत. मश्रूममध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने ते लवकर खराब होण्याची शक्यता असते.

६. हिरव्या पालेभाज्या:

बहुतेक घरांमध्ये पालेभाज्या निवडून, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून मग फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. पण फ्रिजमधल्या गारव्यामुळे आणि पालेभाजीच्या पानांमधून बाहेर पडणाऱ्या बाष्पामुळे या पिशवीची आतली बाजू ओलसर होते. त्यामुळे भाजी सडायला लागते. हे टाळण्यासाठी त्या कापडी पिशव्यांमध्ये किंवा पेपर बॅगमध्ये घालून मग फ्रिजमध्ये ठेवाव्यात.
 

७. मिरच्या:

मिरच्या नेहमी स्वच्छ कोरड्या पुसून आणि देठं/डेखं काढून फ्रिजमध्ये ठेवाव्यात. देठ तसेच ठेवल्यास त्या लवकर खराब होतात.
 

८. मांस:

चिकन, मटण शक्यतो ताजंच वापरावं. फ्रिजमध्ये ठेवावं लागलंच तरी दोन दिवसांत वापरावं. मांसामध्ये जंतूंची वाढ खूप जलदगतीने होते. त्यामुळे दोन तीन दिवसांपेक्षा जास्त काळासाठी मांस टिकवायचं असेल तर मोठ्या भांड्यात व्हिनेगर आणि मीठ घालून त्यात मांस बुडवून ठेवावं.

९. अंडी:

अंडी साठवताना अनेकजणी चुकीच्या पद्धतीने साठवतात. अंडी नेहमी अरुंद टोक खाली येईल अशा प्रकारे फ्रिजमध्ये एग ट्रेमध्ये ठेवावीत. मात्र बहुतेकदा हा ट्रे फ्रिजच्या दारात असतो, आणि गंमत म्हणजे या भागाचं टेम्परेचर जास्त असतं. अंडी नेहमी थंड तापमानाला साठवली पाहिजेत. त्यामुळे फ्रिजचं दार ही त्यासाठी योग्य जागा नाही. फ्रिजमध्ये डेअरी सेक्शनमध्ये (जो वरच्या भागात असतो) कार्टनमध्ये घालून अंडी साठवणं हा उत्तम पर्याय.

१०. केळी, अननस इ. उष्ण कटिबंधीय फळं:

केळी आणि अननस ही दोन्ही फळं उष्ण कटिबंधातली आहेत. त्यामुळे ती फ्रिजमध्ये ठेवण्याचा काहीही फायदा होत नाही. उलट त्यातून बाहेर पडणाऱ्या इथिलीनसारख्या वायूमुळे इतर पदार्थांचा स्वाद बिघडतो किंवा त्यांच्या आजूबाजूचे पदार्थ लवकर खराब व्हायला लागतात. तसंच ही फळं बाहेर रूम टेम्परेचरलाही जास्त दिवस साठवता येत नाहीत. त्यामुळे त्यांचं अकाली पिकणं किंवा काळं पडणं टाळण्यासाठी ती प्लॅस्टिक फिल्ममध्ये गुंडाळून किंवा पेपर बॅगमध्ये घालून थंड व अंधाऱ्या जागी ठेवावीत.
 

११. चहा:

चहाची पावडर काचेच्या किंवा इतर पारदर्शक जारमध्ये साठवू नये. अंधाऱ्या आणि कोरड्या जागी, स्टीलच्या डब्यात साठवावी. सूर्यप्रकाश उष्णता निर्माण करतो. त्यामुळे चहाचा स्वाद बदलतो.

मंडळी, ही यादी अजून बरीच वाढवता येईल. तुम्हालाही अजून काही खास टिप्स माहिती असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required