computer

सुरस आणि चमत्कारिक किस्से - भाग १ : नात्यांतल्या नात्यात लग्न केल्याने बुडालेली ५ बलाढ्य साम्राज्ये!

पूर्वी रेसच्या घोड्यांच्या बाबतीत एक समज रूढ होता. एकाच रक्तातील दोन जोडप्यांपासून जन्मलेला घोडा ‘लंबी रेस’चा घोडा असतो. या कारणाने रक्ताच्या नात्याने जोडलेल्या जोडप्यांमध्ये प्रजनन घडवून आणलं जायचं. याला इंग्रजीत inbreeding म्हणतात. म्हणजे नात्यातल्याच मुलगा/मुलीशी संग करणे.

inbreeding हा प्रकार प्राण्यांच्या बाबतीत जसा पाहायला मिळतो तसा माणसांमध्येही आहे. आपल्या वंशात इतर वंशाची सरमिसळ होऊ नये आणि वंश ‘स्वच्छ’ राहावा म्हणून जगभरात नात्यातल्या नात्यात मुलामुलींची लग्न लावून द्यायची प्रथा आहे. ही पद्धती भारतीय पारसी समाजात मोठ्याप्रमाणात पाहायला मिळते.

प्राण्यांचं ठीक आहे ओ पण माणसांमध्ये ही प्रथा बरोबर आहे का? या प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं देता येतील, पण जर विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिलं तर ती साफ चुकीची आहे. अनुवंशशास्त्राच्या अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की एकाच रक्तातील व्यक्तींच्या प्रजननातून जन्मणाऱ्या मुलांमध्ये अपंगत्व, विकृती तसेच एकूण वंशाचा जन्मदर कमी होणे, प्रजनन क्षमता कमी होणे, मृत्युदर वाढणे इत्यादी परिणाम दिसून येतात. उदाहरणासाठी भारतीय  पारसी समाजाचा इतिहास पाहिला तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.

आजच्या लेखाचा विषय थोडा वेगळा आहे. आज आपण inbreeding च्या इतिहासात डोकावणार आहोत. एकाच वंशात लग्न करण्याच्या प्रथेतून इतिहासात मोठमोठी राजघराणी तख्तावरून खाली उतरली आहेत. एवढंच नाही, तर काही इतिहासकारांच्या मते पहिल्या महायुद्धाला आणि रशियन क्रांतीला देखील inbreeding कारणीभूत ठरलं होतं. 

तर, हा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही राजघराण्यांतील काही निवडक व्यक्तींची माहिती तुमच्यासाठी आणली आहे. ही माहिती आम्ही दोन भागात प्रकाशित करणार आहोत. आजच्या लेखात आपण ५ व्यक्तींची ओळख करून घेऊया. चला तर सुरुवात करूया. 

१. स्पेनचा राजा दुसरा चार्ल्स

हा राजा युरोपच्या बड्या आणि ताकदवान कुटुंबांपैकी एक असलेल्या हॅब्सबर्ग्स कुटुंबातला होता. या एकट्या कुटुंबाने स्पेन, ऑस्ट्रिया आणि रोमन साम्राजावर सत्ता गाजवली. अशा या बलाढ्य कुटुंबाला त्याच कुटुंबाने संपवलं. 

कुटुंबातील व्यक्तींची आपापसांत लग्न झाल्यामुळे त्यांच्या पुढील पिढीत अनुवांशिक बदल झाले. या अनुवांशिक बदलाचं सगळ्यात ठळक उदाहरण म्हणजे या कुटुंबातल्या व्यक्तींचा जबडा. सामान्य माणसांच्या सामान्य जबड्यापेक्षा हॅब्सबर्ग्स कुटुंबातील व्यक्तींचा जबडा मोठा असायचा. त्यांची जीभही जाड असायची. या कारणाने त्यांना बोलताना आणि खाताना अडचणी यायच्या. दुसरा चार्ल्स हा या कुटुंबातील स्पेनचा शेवटचा राजा. या राजाच्या जन्मापर्यंत कुटुंबातील विकृती टोकाला पोचली होती. 

दुसरा चार्ल्सला कुटुंबातील इतर कोणाहीपेक्षा मोठा जबडा होता. त्याला कधीही नीट बोलता आलं नाही. त्याच्या तोंडातून सतत लाळ गळत असायची. आठ वर्षांचा होईपर्यंत त्याला चालता येत नव्हतं. त्यानंतरही तो फार कष्टाने चालायचा. १७०० साली त्याचा ३९ वर्षीच मृत्यू झाला. तो नपुंसकही होता. त्यामुळे त्याला वारस जन्माला घालता आला नाही. त्याच्यानंतर हॅब्सबर्ग्स कुटुंबाची नाळ तिथेच संपली. परिणामी स्पेनमधून हॅब्सबर्ग्स कुटुंब संपुष्टात आलं. 

२. ऑस्ट्रियाचा फर्डिनांड (पहिला)

फर्डिनांड पहिला हा देखील हॅब्सबर्ग्स कुटुंबाच्या शाखेतला होता. त्यालाही हॅब्सबर्ग्स कुटुंबाची ओळख असलेला जबडा मिळाला होता. सोबत जन्मजात आजारही होते. त्याला जन्मजात हायड्रोसेफली हा आजार होता. हायड्रोसेफली आजारात रुग्णाच्या मेंदूत पाणी भरलेलं असतं. या कारणाने मेंदूतील संवेदनशील पेशींवर ताण पडतो. परिणामी मेंदूला दुखापत होण्याची शक्यता असते. 

फर्डिनांड पहिला हा जन्माने अशक्त आणि आजारी होता पण असं असूनही त्याला वारसाहक्काने राजेपद मिळालं. त्याच्या आजारपणामुळे त्याला राजकारभारात प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही. खास मंत्री आणि सल्लागारांच्या मार्फत तो राज्य चालवत राहिला. या राजाचा एक आवडता खेळही होता. तो केराच्या टोपलीवर बसून गोलगोल फिरायचा. या परिस्थितीतही त्याने १८ वर्षं राज्य केलं हे आश्चर्यच म्हणायला हवं. वयाच्या ८२ व्या वर्षी तो मरण पावला.

३. व्हिक्टोरिया राणी

हो, तीच ती जिने भारतावर राज्य केलं. या व्हिक्टोरिया राणीच्या पोटी जन्मलेली मुलं पूर्ण युरोपभर पसरली होती. रशियासारख्या बलाढ्य देशावर राज्य करणाऱ्या त्झारची बायको व्हिक्टोरिया राणीच्याच पोटी जन्मली होती.

तर, राणी व्हिक्टोरियाची वंशावळ अशी दूरवर पसरलेली असताना तिच्या कुटुंबात चुलतभावंडांशी लग्न करण्याची सर्रास परंपरा होती. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रिन्स अल्बर्ट हा तिचा चुलतभाऊच होता. असं म्हणतात की Inbreeding मुळे राणी व्हिक्टोरियाला जन्मजात हिमोफिलियाचा आजार मिळाला होता. हिमोफिलिया म्हणजे रक्त गोठवणाऱ्या प्रथिनांचा अभाव असणे. म्हणजे जर हिमोफिलिया असलेल्या व्यक्तीला जखम झाली तर त्या जागी रक्त गोठायला सामान्य माणसापेक्षा जास्त वेळ लागेल. या कारणाने रक्त वाहातच राहतं. लहान जखमा धोकादायक नसतात, पण जर जखम मोठी असेल तर रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं.

राणी व्हिक्टोरियाने तिला मिळालेला वारसा पुढच्या पिढ्यांना रक्तातूनच दिला. तिचं स्वतःचं एक मूल आणि ५ नातवंडं हिमोफिलियामुळे मृत्युमुखी पडली.

४. अलेक्सी रोमानोव्ह

वर राणी व्हिक्टोरियाच्या ज्या ५ नातवंडांचा उल्लेख केला आहे, त्यातला एक म्हणजे रशियाचा राजा त्झार निकोलस निकोलस दुसरा याच्या पोटी जन्मलेला अलेक्सी रोमानोव्ह. या लहानग्याबद्दल बोलायचं कारण म्हणजे काही इतिहासकरांच्या मते अलेक्सीला असलेल्या हिमोफिलियामुळे रशिया क्रांतीकडे ओढला गेला. परिणामी झार राजवट संपली.

हे कसं घडलं? अलेक्सीला मिळालेला हिमोफिलियाचा आजार भयंकर होता. हिमोफिलियामुळे त्याच्या प्राणांवर बेतलं होतं. यावर इलाज काय करायचा याच्या विचारात असताना त्याचवेळी अलेक्सीची आई म्हणजे त्झरिना अलेक्झांड्रा फिओडरोव्हना ही रास्पुतिन या ठगाच्या संपर्कात आली. या रास्पुतिनवर आपण केव्हातरी सविस्तर वाचूच, पण या लेखापुरतं थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

रास्पुतिन हा स्वतःला दैवी पुरुष म्हणवून घ्यायचा. पण तो खरंतर दारू आणि बाईत बुडालेला होता. या रास्पुतिनने रशियाचा राजा त्झार आणि राणी त्झरिना यांच्यावर अशी काही जादू केली होती की ते अंधपणे त्याच्या मागे गेले. या कारणाने जनता रास्पुतिनला टरकूनच होती. रास्पुतिनचा राग म्हणजे त्झारचा राग असं समीकरण होतं. त्झारचा रास्पुतिनवर एवढा विश्वास होता की त्याने अलेक्सीच्या उपचाराची जबाबदारी रास्पुतिनवर सोपवली आणि त्झारचा असा ठाम विश्वास होता की या उपचारातून अलेक्सी बरा पण होतोय. मात्र हे खोटं होतं.

अलेक्सीच्या उपचारापाई त्झार आणि त्झरिना रास्पुतिनचं ऐकत राहिले आणि रशियन जनता समाजातल्या असंतोषामुळे क्रांतीने पेटून उठली. या कारणाने काही इतिहासकारांचा दावा आहे की अलेक्सीच्या आजारपणामुळे रास्पुतिनचा उदय झाला आणि रास्पुतिनमुळे मनमानी कारभारात झार राजवट बुडाली. १९१८ साली क्रांतीच्या लाटेत त्झार, त्झरिना आणि अलेक्सी यांना गोळ्या झाडून मारण्यात आलं. 

५. किंग जॉर्ज (तिसरा)

इंग्लंडने एकेकाळी अख्ख्या जगावर राज्य केलेलं. यात अमेरिकाही आली. ज्या राजाच्या कारकिर्दीत अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं तो राजा म्हणजे जॉर्ज. हे इथे नमूद करण्याचं कारण असं की या राजाच्या कपाळावर अमेरिका घालवल्याचा बट्टा आयुष्यभर राहिला. पण तो तरी काय करणार? त्याला कधी नीट राज्य करताच आलं नाही. कारण तेच. inbreeding!!

हा राजा राणी व्हिक्टोरियाचाच वंशज. आधीच सांगितल्याप्रमाणे राणी व्हिक्टोरियाच्या वंशावळीत आपल्याच घराण्यात लग्न लावून देण्याची पद्धत होती. या कारणाने जॉर्ज तिसरा हा राजा जन्मजात पोर्फिरिया हा आजार घेऊन जन्मला. या आजारामुळे रुग्णात वेडेपणा येतो आणि लघवी चक्क निळ्या-जांभळ्या रंगाची असते. 

नंतरच्या काळात झालेल्या संशोधनात असं दिसून आलं की जॉर्ज तिसराला पोर्फिरिया नसून त्याला मानसिक आजार होता तसेच त्याला बायपोलर डिसऑर्डर असण्याचीही शक्यता आहे. बायपोलर डिसऑर्डर असलेल्या व्यक्तीच्या स्वभावात टोकाचे बदल होत असतात. 

या तिसऱ्या जॉर्जमध्ये असलेल्या आजाराची लक्षणे पाहिली तर या गोष्टींमध्ये तथ्य असण्याला थोडी जागा नक्कीच आहे. आजारपणाच्या टोकाच्या अवस्थेत जॉर्जचं लिहिणं इतरांपेक्षा वेगळं असायचं. त्याच्या एका वाक्यात ४०० शब्द असायचे. तो बोलत असताना एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर जोवर तोंडाला फेस येत नाही तोवर तो बोलत राहायचा. त्याच्यातल्या या गुणामुळे तो राज्यभर प्रसिद्ध होता. 

असा राजा अमेरिका गमावून बसला यात नवल ते काय.

वाचकहो, ही यादी बरीच मोठी आहे. हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

 

आणखी वाचा :

सुरस आणि चमत्कारिक किस्से - भाग २ : नात्यांतल्या नात्यात लग्न केल्याने बुडालेली बलाढ्य साम्राज्ये!

सबस्क्राईब करा

* indicates required