computer

थायरॉईडबद्दल माहित नसलेले वेलूमणी जगातल्या सर्वात मोठ्या थायरॉईड टेस्टिंग कंपनीचे मालक कसे झाले?

१९८२ साली भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारलं होते, "माणसाच्या शरीरात थायरॉईड कुठे असते?" त्यावेळी त्यांना याचे उत्तर आले नव्हते.  पण २० वर्षानंतर ते जगातली सर्वात मोठी थायरॉईड टेस्टिंग कंपनी चालवत होते.  ही प्रेरणादायक कथा आहे ए. वेलूमणी आणि त्यांच्या thyrocare या कंपनीची!!

वेलूमणींचा जन्म १९५९ साली तामिळनाडूमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब कुटुंबात झाला. कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम होते. सरकारच्या मध्यान्ह भोजन (मिड-डे मील) योजनेमुळे त्यांना सरकारी शाळेत शिकता आले. हालाखीच्या परिस्थितीच त्यांनी १९७८ साली आपले बी. एस. सी.चे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीचा शोध सुरू केला. त्यांचा पदरी सगळी कडून निराशाच पडत होती, पण १९७९ मध्ये त्यांना एका औषाधाच्या कॅप्सूल बनविणाऱ्या कारखान्यात नोकरी मिळाली. पण पगार होता महिना १५०!!

साधारण चार वर्षे तिथे काढल्यानंतर १९८२ साली त्या कंपनीने गाशा गुंडाळला. याकाळात वेलूमणीनी भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. Lab assistant पदासाठी असलेल्या मुलाखतीसाठी वेलूमणी मुंबईत आले. त्यांच्याकडच्या तुटपुंज्या रकमेमुळे मुंबईत तीन रात्री त्यांनी स्टेशनवर घालवाव्या लागल्या. शरीरात थायरॉईड कुठे असतो या प्रश्नाचे उत्तर सांगता आले नाही, तरीही त्यांची या पदावर निवड झाली. शेवटी इतकी वर्षे केलेल्या मेहनतीचे चीज होणार होते, कारण आता वेलूमणींचा पगार असणार होता दरमहा ८०० रुपये. 

वेलूमणी एवढ्यावर थांबणारे नव्हतेच, त्यांनी नोकरी करत असताना आपले एम.एस.स्सी.चे शिक्षण पूर्ण केलं. पुढे १९९५ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठात थायरॉईड बायोकेमेस्ट्री या विषयात पीएचडी मिळवली. याच आधारावर त्यांना बढती मिळाली आणि ते BARCच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल शाखेत सायंटिस्ट म्हणून काम करू लागले. पण वेलूमणी हे शांत बसणाऱ्यातले नव्हतेच. इथे काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की थायरॉईडची चाचणी करण्यासाठी लागणारी किंमत खूप जास्त होती आणि यातून dignostic कंपन्या पैसे कमावत होत्या. त्यांचा असा कयास होता की आपण ह्या चाचण्या स्वस्तात देऊ आणि या चाचण्यांसाठी मागणी खूप असेल. 

१९९६ साली घरच्यांना कुणालाही कल्पना न देता वेलूमणी यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. या सगळ्याची कल्पना आल्यानंतर SBI बँकेतली आपली नोकरी सोडून वेलूमणी यांची पत्नी त्यांना सामील झाली. आपली सेव्हिंग्ज आणि प्रॉव्हिडंट फंडातले २ लाख रुपये जमा करून स्वस्तात थायरॉईड चाचण्या करण्यासाठी त्यांनी thyrocare technologies नावाची कंपनी सुरू केली. भायखळ्यात एक छोटा गाळा भाड्याने घेऊन तिथे या दोघांनी आपली लॅब उभारली. वेलूमणी दिवसा हॉस्पिटल, डॉक्टर यांच्याकडे भेटी देऊन कंपनीचे मार्केटिंग करत असत, आणि रात्री जमा झालेल्या सँपलच्या चाचण्या करत असत. 

स्वस्त असल्यामुळे त्यांच्या लॅबने लवकरच नावरुप मिळवलं. आता पुढे हा व्यवसाय कसा वाढवायचा हा विचार करत असताना त्यांनी आपल्या कंपनीच्या फ्रांचाईजी काढायचे ठरवले आणि काही वर्षात भारतभरात शेकडो thyrocare नावाच्या लॅब उभ्या राहिल्या.  स्वस्त असल्यामुळे टेस्टची आणि फ्रेंचाईजीची मागणी सतत होत राहिली आणि त्यामुळे कंपनीची प्रगती अधिक वेगाने होता राहिली. २००२ साली thyrocare ही जगातली सर्वाधिक थायरॉईड टेस्ट करणारी कंपनी बनली. 

२०००च्या दशकात कंपनीने आपल्याकडे असलेल्या टेस्टच्या सुविधा वाढवल्याय. यासाठी त्यांनी रिजनल हब मॉडेलचा वापर केला. प्रत्येक विभागात एक रिजनल लॅब आणि नवी मुंबईमध्ये मुख्य लॅब. जास्तीत जास्त टेस्ट या त्याच दिवशी रिजनल लॅबमध्ये केल्या जात, पण काही स्पेशल टेस्टसाठी सँपल विमानाने नवी मुंबई लॅबमध्ये आणले जात. 

२०१६ मध्ये thyrocare शेअर बाजारात लिस्ट झाली.  याचा IPO ला मागणीपेक्षा ७३ पट जास्त प्रतिसाद मिळाला होता. आज २००० गावात फ्रॅंचाईझी असलेल्या thyrocare चे बाजारी मूल्य हे ६००० करोडपेक्षा जास्त आहे आणि कंपनीची उत्तरोत्तर वाढ होत आहे.

काही कथांचा शेवट अनुत्तरीत प्रश्नांनी होत असतो. दोन दिवसांपूर्वीच्या एका खात्रीलायक बातमीनुसार 'थायरोकेअर' ४५४६ कोटी रुपयात 'फार्म इझी' ने विकत घेण्याचे नक्की झाले आहे. वेलूमणी यांनी हा निर्णय का घेतला हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यांच्या नंतर उत्तराधिकारी म्हणून कोण काम करेल याबद्दल शाश्वती नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा असा कयास आहे.

फार्मइझीने मात्र थायरोकेअर विकत घेऊन एक नवा इतिहास रचला आहे. फार्मइझी शेअर बाजारात नोंदणी नसलेली - नव्या युगातली ऑनलाइन कंपनी आहे. प्रस्थापित व्यवसायाला धक्का देऊन पुढे आलेली कंपनी आहे. अशा कंपनीला 'डिसरप्ट मॉडेल' असे म्हटले जाते. अशा कंपनीने 'थायरोकेअर' विकत घेणे हा कदाचित अनेक प्रस्थापितांना येणार्‍या काळाचा इशारा आहे असे समजायला हरकत नाही.

(फार्मइझीचे सिद्धार्थ शाह आणि वेलूमणी)

दरम्यान थायरोकेअरच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांचा ठोठो फायदा झाला आहे. गेल्या मार्च महिन्यात ४०० रुपयाच्या घरात असलेला थायरोकेअरचा समभाग या आठवड्यात १४०० पार करून गेला आहे. अगदी मार्च २०२१ म्हणजे ३ महिन्यांपूर्वी ज्यांनी गुंतवणूक केली असेल त्यांची गुंतवणूक दुप्पटीच्या आसपास आहे. येत्या काळात फार्मइझीचा (एपीआय होल्डींग्जचा) आयपीओ बाजारात येतोच आहे.

एका नोकरीच्या इंटरव्ह्यूपासून सुरु झालेली वेलूमणींची यशोगाथा इथे संपली असे वाटत असले तरी ती येणार्‍या अनेक पिढ्यांना प्रेरीत करणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required