computer

या कुटुंबातील पुरुषांना ३ पिढ्यांपासून हातांच्या बोटांवर ठसे नाहीत...कसं शक्य आहे हे? हा कोणता आजार आहे ?

तुमच्या मोबाईलवर टच स्क्रिन लॉक हे फिचर असेल ना? म्हणजे फोन अनलॉक करताना एका ठराविक बोटाने स्क्रिनवर ठसा घेतला जातो आणि मगच फोन अनलॉक होतो. स्मार्टफोनच्या जगात हे फिचर सगळेच वापरत असतील. सुरक्षेसाठी हे चांगलेही आहे. प्रत्येकाचे बोटांचे ठसे हे वेगवेगळे असतात हेही तुम्ही ऐकलेच असेल. अगदी एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या बोटाचे ठसेही एकसारखे नसतात. पण कोणाच्या हाताला ठसेच नसतील तर?  कसं शक्य आहे? अशक्य वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात शक्य झाली आहे.

चला तर आज एका अशा कुटुंबाची माहिती घेऊया जिथे मागच्या ३ पिढ्यांपासून पुरुषांच्या हातांवर ठसेच नाहीत.

बांगलादेशच्या उत्तरेकडील राजशाही जिल्ह्यात अप्पू सरकार आणि त्याचं कुटुंब राहतं. या कुटुंबातील कुठल्याच पुरुषाच्या हाताचे ठसे म्हणजेच फिंगर प्रिंट्सच उपलब्ध नाहीत. तीन पिढीत कुठल्याही पुरुषाचा ठसा उपलब्धच नाही. या मुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आहे ना हा अजब प्रकार?

आजच्या आधुनिक काळात जवळपास सगळ्याच महत्वाच्या सरकारी कागदपत्रांवर हाताचे ठसे महत्वाचे असतात. सहीपेक्षाही या फिंगरप्रिंटसला जास्त महत्व आहे. म्हणूनच पासपोर्ट, आधार कार्ड अश्या भारतीय राष्ट्रीय ओळखपत्रावरही ती अनिवार्य आहेत. बांग्लादेशमध्येही तीच पद्धत आहे.

बांगलादेशमध्ये सन २००८ साली सर्व वयस्कर व्यक्तींसाठी राष्ट्रीय ओळखपत्र देण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती. या ओळखपत्रासाठी डेटा बेस म्हणून नागरिकांच्या आंगठ्याचे ठसे घेण्यात आले. पण ज्यावेळी सरकार कुटुंबाचा नंबर आला तेव्हा अप्पूच्या अंगठ्याचा ठसा घेताच आला नाही. त्याच्या वडीलांबरोबर म्हणजेच अमल सरकार यांच्यासोबतही हीच अडचण येत होती. त्यामुळे केंद्रावरील कर्मचाऱ्यांना अप्पू आणि त्याच्या वडीलांना ओळखपत्र कसं द्यायचं हा प्रश्न प़डला. अखेर अप्पू आणि त्याच्या वडीलांना नो फिंगप्रिंटचा स्टॅम्प मारुन ओळखपत्र बनवून देण्यात आलं. त्या कुटुंबातील कुठल्याही महिलेला मात्र असा त्रास नाही. म्हणजे आनुवंशिक म्हणलं तरी फक्त पुरुषांकडे हा आजार कसा? हेही प्रश्न आहेतच.

काय आहे हा प्रकार?

अ‍ॅडर्माटोलायफिया असं या आजाराचं नाव आहे. हा त्वचेचा अतिदुर्मिळ आजार आहे. या आजारामध्ये त्वचा कोरडी पडणं आणि हाता-पायाच्या तळव्यांवर कमी घाम येणं, अशीही लक्षणं दिसून येतात. सरकार कुटुंबियांच्या पुरुषांमध्ये ही लक्षणं दिसतात. हा आजार पहिल्यांदा २००७ साली जागतिक स्तरावर उजेडात आला. त्या वर्षी स्विझर्लंडमधील त्वचावैज्ञानिक पीटर इटिन यांना विशीतल्या एका महिलेने संपर्क साधला. तिला अमेरिकेत प्रवेश करणे शक्य होत नव्हते. कारण तिचा चेहरा पासपोर्टवरच्या छायाचित्राशी जुळत होता, पण तिच्या बोटांचे ठसे नोंदवणं मात्र कस्टम अधिकाऱ्यांना जमत नव्हते. खरं तर तिला बोटांचे ठसे नव्हतेच. हे जेव्हा कळलं तेव्हा सगळे गोंधळले. नंतर तिच्या कुटुंबाचाही अभ्यास करण्यात आला, तेव्हा कुटुंबातल्या १६ पैकी ९ जणांच्या हातांवर  ठसे नव्हते.

अप्पूच्या आजोबांनाही हा आजार होता पण त्या काळात ठश्यांशिवाय फारसं काही अडत नव्हतं. अप्पूचे काका गोपेश यांच्या कार्यालयामध्ये फिंगर प्रिंटवर आधारित हजेरीची व्यवस्था करण्यात आली तेव्हा त्यांना खरी अडचण आली. मग त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आजाराबद्दल सांगून जुन्या पद्धतीनेच हजेरी लावण्याची विनंती करावी लागली. तसंच त्यांना फिंगर प्रिंट येत नसल्याने, पासपोर्टसाठीही तब्बल दोन वर्ष वाट पहावी लागली.

बायोमेट्रीक गोष्टी आता व्यक्तींची ओळख झाली आहे. अगदी विमानतळापासून ते ओळखपत्रांपर्यंत आणि सर्वच डिजीटल कामांमध्ये सध्या फिंगर प्रिंट वापरले जातात पण त्याच्या कुटुंबाला ते मिळणं अवघड झालंय. अप्पू सांगतो,  फोनचं सिमकार्डही त्याला मिळत नव्हतं. कारण ज्यावेळी तो मशीनवर हात ठेवायचा ते मशीन अडकून(हँग) व्हायचं. शेवटी अनेक अर्ज आणि विनंती करून त्याला ते मिळालं. त्यासाठी खर्चही खूप करावा लागला.

अप्पू आणि त्याचे कुटुंब यांच्या आजाराबद्दल माहिती समोर आल्यानंतर बंगलादेश सरकारच्या वतीने त्यांना  विशेष वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. त्या आधारावरच त्यांना नवीन राष्ट्रीय ओळखपत्र देण्यात आलं आहे. या कार्डमध्ये रेटिना स्कॅन आणि चेहऱ्याशी संबंधित ओळख आहे. आता या प्रमाणपत्राद्वारे तरी त्यांच्या अडीचणी कमी होतील अशी आशा करूया.

कसा वाटला हा लेख? आवडला असेल तर नक्की शेयर करा.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required