computer

१८००साली केचप 'टोमॅटो पिल्स कॅन क्युअर ऑल युअर इल्स' या घोषवाक्यासह विकले जायचे!!

टोमॅटो आणि टोमॅटो केचप हा आता आपल्याला काही नवं राहिलं नाहीय. पण कधीकाळी टोमॅटो हा खाण्यायोग्य पदार्थ आहे यावरही कुणाचा विश्वास नव्हता. त्यावेळी केचपसाठी फक्त मश्रूम आणि माशांचाच वापर केला जात असे. टोमॅटो हा पदार्थ त्याकाळी फारसा ओळखीचा नव्हता. त्यामुळे टोमॅटो हे विषारी फळ असल्याचाही समज होता. १८३४ पर्यंत तरी हीच परिस्थिती होती. या काळात डॉ. जॉन कुक बेनेट यांनी आपल्या संशोधनातून टोमॅटोचे फायदे लोकांसमोर मांडले आणि तेव्हापासून केचपसाठी टोमॅटोचा वापर सुरू झाला. डॉ. जॉन यांच्या या संशोधनामुळे टोमॅटोला नंतर इतके अच्छे दिन आले की, टोमॅटो केचपचा वापर औषधाप्रमाणे केला जाऊ लागला. नव्हे, आजच्या काळात फायझर लसीचे जे महत्व आहे, ते त्याकाळात टोमॅटो केचपला होते. एखाद्या आजारावर औषध म्हणून टोमॅटो केचप खाणे ही कल्पना आज हास्यास्पद वाटत असली तरी एकेकाळी या टोमॅटो केचप आणि टोमॅटो पिल्सनी भरपूर हवा केली होती.
अर्थात, काही काळाने टोमॅटो केचपची ही क्रेझ कमी झाली आणि तो एक दैनंदिन पदार्थ म्हणून रुळला ती गोष्ट वेगळी. पण लोकांना औषध म्हणून टोमॅटो केचप खाऊ घालण्यामागे नेमका कोणता हेतू होता हे तरी जाणून घेऊया.

डॉ. बेनेट यांनी सांगितले की टोमॅटोवर त्यांनी केलेल्या संशोधनानुसार हा एक औषधी गुणांनी युक्त पदार्थ आहे. हगवण, कॉलरा, कावीळ, अपचन, संधिवात अशा अनेक आजारांवर गुणकारी आहे. या फळांच्या औषधी गुणधर्माचा फायदा करून घेण्यासाठी याचा वापर वाढवावा म्हणून ते लोकांना प्रेरित करू लागले. विशेषत: याचा रस काढून तो शिजवून पिल्यास चांगला फायदा होईल असा प्रचार त्यांनी सुरू केला. अमेरिकेतल्या अनेक वर्तमानपत्रांतून त्यांनी आपल्या संशोधनावर आधारित लेख लिहिले आणि ते प्रसिद्ध केले. त्यामुळे टोमॅटोच्या औषधीय गुणधर्माबद्दल लोकांना खात्री पटू लागली.

याच वेळी डॉ. बेनेट यांची भेट अमेरिकेत औषध क्षेत्रात काम करणाऱ्या अलेक्झांडर माइल्स या उद्योगपतीशी झाली. माइल्सने आपल्या उद्योगासाठी या संधोधानाचा पुरेपूर फायदा करून घेण्याचे ठरवले आणि त्यांनी टोमॅटोचे फायदे पटवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात याची जाहिरातबाजी सुरू केली.
टोमॅटोचा अशा प्रकारे वापर करून लोकांना कसा फायदा होत आहे, याबद्दलच्या कहाण्या वर्तमानपत्रातून छापून येऊ लागल्या. टोमॅटोपासून त्यांनी केचप तर बनवलेच, पण टोमॅटो पिल्स देखील बनवल्या. "टोमॅटो पिल्स कॅन क्युअर ऑल युअर इल्स" अशा टॅग लाईनसह त्यांनी आपले हे उत्पादन लोकांसाठी किती फायद्याचे आहे, याचा मारा सुरू केला. लोकांचे अगदी जुनाट आजारही या पिल्समुळे आणि केचपमुळे कसे झटक्यात बरे झाले याच्या सुरस कथा वर्तमानपत्रातून छापून येऊ लागल्या. त्यामुळे टोमॅटो पिल्स आणि केचपवर लोकांच्या अक्षरश: उड्या पडू लागल्या.

मागणी तसा पुरवठा या बाजारपेठेच्या नियमानुसार मग अनेकांनी या उद्योगात प्रवेश केला आणि प्रत्येकाने आपापल्या टोमॅटो पिल्स बाजारात आणल्या. त्यामुळे या क्षेत्रात चांगलीच चुरस निर्माण झाली.

अनेक संशोधकांनी टोमॅटोचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांना असे आढळून आले की डॉ. बेनेट ज्या प्रकारचा दावा करत आहेत तो फोल आहे. टोमॅटो हा मानवी आरोग्यासाठी पोषक असला तरी त्यात कोणताही आजार बरे करण्याचा औषधीय गुणधर्म असल्याचा दावा हा धादांत खोटा असल्याचे अनेकांनी सिद्ध करून दाखवले. या नव्या संशोधनानंतर अनेकांचा टोमॅटो पिल्स आणि टोमॅटो केचप यांच्या औषधीय गुणावरील विश्वास उडाला.

टोमॅटो केचपने जितक्या वेगाने प्रसिद्धी मिळवली होती, तितक्याच वेगाने ती कोसळली. केचपबद्दलची लोकांची क्रेझ काही दिवसातच कमी झाली. पण टोमॅटो पूर्णत: हद्दपार झाला नाही. कारण टोमॅटो खाण्याने शरीराला काहीही अपाय होत नाही, उलट शरीरासाठी तो चांगलाच असल्याचे लोकांना एव्हाना कळून चुकले होते.

अर्थात डॉ. बेनेट यांनी टोमॅटोच्या गुणाबद्दल मारलेल्या फुशारक्या अगदीच फोल होत्या असे नाही. आजच्या काळातही अनेक संधोधानातून हे सिद्ध झाले आहे की टोमॅटोमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणांमुळे तो कॅन्सर रोखण्यास मदत करू शकतो. शिवाय टोमॅटोमध्ये क जीवनसत्व, पोटॅशियम, यांचे प्रमाण भरपूर असते. हृदयविकारासारख्या आजारातही टोमॅटो खाणे फायद्याचे ठरू शकते. अर्थात म्हणून काही ते औषधाची जागा घेऊ शकते असे अजिबात नाही.

डॉ. बेनेट यांची पद्धत काहीशी चुकीची ठरली असली ती संपूर्ण फसवणूक होती असे म्हणता येणार नाही. त्यांच्या या संशोधनामुळे किमान टोमॅटो आपल्या ताटात तरी आला. नाहीतर टोमॅटो शिवायच्या पदार्थांची आपण कल्पना तरी करू शकू का? टोमॅटो विषारी असल्याचा गैरसमज तरी यानिमित्ताने दूर झाला.
अपघाताने टोमॅटो आपल्या ताटात आला असला तरी आता तो आपल्या ताटातील एक अविभाज्य भाग बनला आहे. याचे श्रेय डॉ. बेनेट यांनाच जाते.

मेघश्री श्रेष्ठी