computer

फ्रॅक्चरचे प्रकार, लक्षणे, निदानपद्धती आणि टाळण्याचे उपाय!! यातलं तुम्ही काय काय करता?

आपल्यापैकी प्रत्येकाचं हाड कधी ना कधी फ्रॅक्चर झालेलं असतंच. सायकल शिकताना कधी वर्मी इजा होते, कधी कुठे पायच घसरतो, कधी बाईकवरूनच पडतो, कधी माळ्यावरची सफाई करताना काहीतरी अपघात होतो. थोडक्यात, कारण काहीही असो, आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाला या फ्रॅक्चरचा अनुभव मिळतोच मिळतो!!

तसं पाहायचं तर फ्रॅक्चर म्हणजे हाड मोडणे हा बऱ्यापैकी सामान्य असलेला प्रकार आहे. सर्वसाधारण मनुष्याला आयुष्यात सरासरी दोन वेळा फ्रॅक्चरला सामोरे जावे लागते. जेव्हा हाडाला त्या हाडापेक्षा जास्त शक्तिशाली वस्तूमुळे इजा होते तेव्हा हाड मोडते. फ्रॅक्चर होण्याचा धोका वयाबरोबर वाढत जातो. खरेतर लहान मुलांमध्ये खेळताना पडल्यामुळे अनेक वेळा फ्रॅक्चर होत असते. परंतु लहान मुलांमध्ये होणारी फ्रॅक्चर्स कमी गुंतागुंतीची असतात. जसजसे वय वाढत जाते तसतशी हाडे ठिसूळ होत जातात आणि त्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यताही वाढते.

फ्रॅक्चरचे बरेच प्रकार आहेत, पण त्यामध्ये ओपन फ्रॅक्चर आणि क्लोज्ड फ्रॅक्चर हे दोन प्रकार मुख्य आहेत. जेव्हा हाड मोडते परंतु त्वचेवर कुठेही जखमेची खूण नसते तेव्हा त्याला क्लोज्ड फ्रॅक्चर म्हणतात. ज्यावेळी हाड मोडून त्वचेतून बाहेर येते त्यावेळी त्याला ओपन फ्रॅक्चर म्हणतात. ओपन फ्रॅक्चरमध्ये हाडांमध्ये खोलवर जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. हाडे मोडून मोडून त्यांचे लहान लहान तुकडे होणे, हाडांवर विशिष्ट कोनात छेद दिला जाणे, हाडे कमकुवत झाल्यामुळे फ्रॅक्चर होणे, तसेच हेअरलाईन क्रॅक असे फ्रॅक्चरचे अनेक प्रकार आढळून येतात. फ्रॅक्चर कोणत्या ठिकाणी आणि प्रकारचे आहे यानुसार ते किती गंभीर आहे ते ठरते. जर फ्रॅक्चर गंभीर असेल तर त्यावर त्वरित योग्य उपचार करावे लागतात. नाहीतर गुंतागुंत अजून वाढू शकते. यामुळे रक्तवाहिन्या, चेतातंतू यांना इजा पोहोचण्याचा धोका असतो. तसेच हाडांमध्ये व आजूबाजूच्या टिश्यूजमध्ये जंतुसंसर्ग होऊ शकतो. फ्रॅक्चर झाल्यानंतर बरे होण्यासाठी लागणारा काळ हा रुग्णाचे वय, त्याची एकंदर शारीरिक स्थिती, आणि फ्रॅक्चरचा प्रकार यांच्यावर अवलंबून असतो. हा काळ काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंत असू शकतो.

फ्रॅक्चरची लक्षणे:

- हाड मोडल्याच्या जागी सूज येणे
- हाताचा किंवा पायाचा आकार वेडावाकडा होणे
- इजा झालेल्या ठिकाणी वेदना होणे आणि त्या भागाची हालचाल केल्यावर किंवा त्या भागावर दाब दिल्यानंतर वेदनांची तीव्रता वाढणे
- हाड मोडलेल्या पायाला घोट्याला किंवा पावलाला कोणतेही वजन सहन न होणे
- त्वचेमधून बाहेर डोकावणारे हाड

फ्रॅक्चरचे निदान:
डॉक्टर बहुधा फ्रॅक्चर आहे की नाही हे जखमेची तपासणी करून आणि एक्स-रेच्या मदतीने सांगतात. पण कधीकधी एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर असल्याचे दिसत नाही. यात मुख्यतः काही प्रकारचे मनगटाचे फ्रॅक्चर, खुब्याचे फ्रॅक्चर, आणि स्ट्रेस फ्रॅक्चर्स यांचा समावेश होतो. अशावेळी फ्रॅक्चरचे निदान करण्यासाठी डॉक्टर सिटी स्कॅन, एमआरआय किंवा बोन स्कॅन या तपासण्या करायला सांगतात.

कधीकधी मनगटाचे हाड फ्रॅक्चर होते, त्यावेळी सुरुवातीला एक्स-रे नॉर्मल दिसतो. अशावेळी डॉक्टर तो भाग स्प्लिंट वापरून एका जागी स्थिर बांधून ठेवतात आणि दोन आठवड्यांनी त्या भागाचा दुसरा एक्स-रे घेतात. यामध्ये फ्रॅक्चर दिसू शकते. फ्रॅक्चरचे निदान झाल्यानंतरही सिटीस्कॅन, एमआरआय, आणि रक्तवाहिन्यांचा विशिष्ट प्रकारे घेतलेला एक्स-रे म्हणजेच अँजिओग्राम या तपासण्या कराव्या लागू शकतात. हाडाच्या आजूबाजूला असलेल्या टिश्यूजना धक्का पोहोचला असल्यास त्याचे निदान या तपासण्या करून करता येते. याशिवाय डॉक्टरांना कवटी फ्रॅक्चर झाल्याचा संशय असल्यास ते थेट सिटीस्कॅन करायला सांगतात, ज्यामध्ये फ्रॅक्चरव्यतिरिक्त इतर गंभीर स्वरूपाच्या जखमांचे आणि मेंदूच्या आजुबाजूला रक्तस्राव झाला असल्यास त्याचे निदान करता येते.

फ्रॅक्चर किंवा हाड मोडणे ही मेडिकल इमर्जन्सी मानली जाते. रुग्णाने फ्रॅक्चर झालेल्या भागाची जास्त हालचाल न करता शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार सुरू करणे गरजेचे असते. फ्रॅक्चरमुळे धक्का पोहोचलेले हाड योग्य जागी बरोबर पोझिशनमध्ये बसवणे गरजेचे असते. या प्रक्रियेला रिडक्शन असे नाव आहे. शस्त्रक्रिया न करता हाड योग्य जागी बसवणे याला क्लोज रिडक्शन म्हणतात. लहान मुलांच्या फ्रॅक्चरवर बहुतेकदा क्लोज रिडक्शन वापरून उपचार केले जातात. काहीवेळा तुटलेली हाडे सांधण्यासाठी प्लेट्स, स्क्रू, रॉड वापरले जातात. मात्र फ्रॅक्चर गंभीर स्वरूपाचे असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते. याशिवाय, ओपन फ्रॅक्चर्स जंतुसंसर्ग टाळण्यासाठी वारंवार स्वच्छ करावी लागतात. मोडलेली हाडे योग्य पोझिशनमध्ये बसवल्यानंतर ती जुळून येण्यासाठी त्या भागाला प्लास्टर घातले जाते आणि कधीकधी वेदना कमी करण्यासाठी ट्रॅक्शनचा वापर केला जातो. फ्रॅक्चर झाल्यास दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये बहुतेक औषधे पेनकिलर्स असतात.

थोडी सावधगिरी बाळगली तर पडणे, हाडांना मार लागणे, आणि फ्रॅक्चर होणे यासारख्या गोष्टींपासून बचाव होऊ शकतो. त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा-

१. गाडीत बसताना नेहमी सीट बेल्ट लावा.

२. बाईक चालवणे, स्केटिंग किंवा ज्या ठिकाणी घसरण्याची शक्यता असते अशा कोणत्याही मनोरंजनात्मक ऍक्टिव्हिटीज करत असताना नेहमी हेल्मेट आणि इतर संरक्षक साधनांचा वापर करा.

३. जिने किंवा ज्या ठिकाणी जास्त वर्दळ असते अशा ठिकाणी शक्यतो इतर गोष्टींचा पसारा होऊ देऊ नका. घरात वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुले असतील तर त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गात या वस्तूंमुळे अडथळा येऊन ते पडण्याची व हाडे मोडण्याची शक्यता असते.

४. ऑस्टिओपोरॉसिस किंवा हाडे ठिसूळ होणे हा विकार असल्यास नियमितपणे व्यायाम करा. यामुळे स्नायूंची ताकद आणि बॅलन्स सुधारून पडण्याची शक्यता कमी होते.

५. गरज वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने हाडांच्या तंदुरुस्तीसाठीची औषधे आणि सप्लीमेंट्स (कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी) घ्या.

६. जिन्याचा किंवा शिडीचा वापर करताना आधारासाठी रेलिंगचा वापर करा.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required