computer

कंपवात म्हणजे काय? कंपवाताला पार्किन्‍सन हे नाव कसं मिळालं?

आपण सगळेच आपल्या तब्येतीबद्दल जास्त जागरूक झालो आहोत. निरनिराळ्या आजारांपासून बचावासाठी तुम्ही नियमित व्यायाम, योग, चालणे, जिम वैगेरे करतच असाल. खाण्यापिण्याबद्दल पण सकस-पौष्टिक आहाराकडे आपला कल असतोच. पण असे बरेच आजार आहेत जे वयोमानानुसार होत असतात. अर्थात घाबरून जायचं कारण नाही, कारणा आपण जागरुक असू तर बऱ्याच गोष्टी आधीच कळून पुढचे धोके टाळता येतात. आज जाणून घेऊयात पार्किन्‍सन म्हणजे कंपवाताबद्दल.

पार्किन्‍सन असे नाव का पडले असावे? याबद्दल जिज्ञासा असेलच ना?

१८१७ साली ब्रिटिश वैद्यक (डॉक्टर) जेम्स पार्किन्सन यांनी प्रथम या आजाराबद्दलची माहिती लोकांच्या नजरेस आणून दिली, म्हणून या आजाराला 'पार्किन्सन रोग' असे म्हणतात. डॉ. जेम्स पार्किन्सन यांचा जन्म १७५५ साली लंडन येथे झाला. वडिलांप्रमाणेच मेडिकल क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या संशोधनातून हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा विकार आहे हे लक्षात आले.

सन १८१७ मध्ये त्यांनी ६६ पानी शोधनिबंध प्रसिद्ध केला. या निबंधात त्यांनी पार्किसन्सच्या लक्षणांबद्दल लिहिले होते. पार्किन्सन यांनी केलेल्या सखोल अभ्यासात या आजारबद्दल विस्तृत लिहिले गेले आहे. असे मानले जाते की हा आजार बराचसा गूढ स्वरूपात आहे. त्यामुले यावर अजूनही संशोधन चालूच आहे. असेही दिसून आले आहे की जेव्हा देशात मोठ्या प्रमाणात फ्लूची साथ येते तेव्हा संक्रमित लोकांना नंतर पार्किन्सन हा आजार होतो. न्यूयार्कचे प्रसिद्ध न्यूरालाजिस्ट लेखक डॉ. ऑलिव्हर सेक्स यांनी यावर पुस्तक ही लिहिले आहे. यावर संशोधन अजूनही चालू आहे.

कंपवात म्हणजे काय?

शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश होणे हे कंपवाताचे मुख्य कारण. त्यामुळे काय होते? हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे हे सगळे घडून येते. अर्थात ही या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. कंपवात झालेली व्यक्ती स्थिर बसलेली असताना नंतर उभी राहिल्यास तिचे शरीर पुढे कललेले दिसते.

जसजशा या मेंदूतल्या चेतापेशी अधिक प्रमाणात मृत पावतात, तसतसे ठराविक हालाचालींवर नियंत्रण करणे अशक्य होते. कंपवात झालेल्या व्यक्ती बऱ्याचदा अडखळत चालताना दिसतात. तसेच या व्यक्तींना खाणे, पिणे किंवा लिहिणेही कठिण जाते. त्यांच्या चेहऱ्यावरचे स्नायू ताठरल्यामुळे चेहरा मुखवट्याप्रमाणे भासतो. खुर्चीतून एकदम उठताना तोल जाण्याची शक्यता असते. काही वेळा यामुळे रुग्णाला नैराश्य (डिप्रेशन) किंवा विस्मृती असे मानसिक आजार होऊ शकतात व त्यांतून गंभीर परिस्थिती उदभवू शकत.

कंपवात हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा( central nervous system) विकार आहे. चेतापेशी म्हणजे nerve cell. वैद्यकीय भाषेत "डोपामाइन" हे चेतापारेषक(Neurotransmitter) रसायन असते आणि ते एका चेतापेशीपासून दुस-या चेतापेशीकडे संदेश वाहून नेण्याचे काम करते. डोपामाइनमध्ये घट झाल्याने ज्या चेता शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करण्यास मदत करतात, त्या चेतांच्या संदेशमार्गात बिघाड होतो. या रोगावर उपचार करताना मेंदूमधील कमी झालेले डोपामाइनचे प्रमाण पूर्ववत करणे, हाच मुख्य इलाज मानला जातो.

कंपवात हा विकार बहुधा ५० ते ७० वयादरम्यान व्यक्तींना होण्याची शक्यता असते. मात्र यामागील निश्चित कारणे अजून माहीत नाहीत. परंतु कीटकनाशकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि ग्रामीण भागातल्या व्यक्तींमध्ये कंपवात अधिक प्रमाणात आढळतो. ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये कंपवात दिसून आल्यास त्याचे कारण जनुकांमधील दोष असल्याचे आढळून आले आहे. परंतु बहुतांशी रुग्णांना होणारा कंपवात हा आनुवंशिक विकार नाही हे संशोधनातून दिसून आले आहे. अजून एक महत्वाचे म्हणजे जसजसा हा विकार जुना होतो तसतसा अनेक रुग्णांमध्ये या औषधाचा कोणतीही परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर बरे व्हायची शक्यता जास्त असते.

अभ्यासानुसार भारतात सात अब्ज रुग्ण या आजाराने ग्रासले आहेत. यात मुख्यत्वे साठीच्या वरचे वृद्ध आहेत. आज या आजाराबद्दल बरीच जनजागृती होत आहे आणि लवकर निदान झाल्यास बरे व्हायचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. कुठलाही आजार असो, precaution is better than cure. या आजाराचे संशोधक डॉ. जेम्स पार्किन्सन यांची २१ डिसेंबर ही पुण्यतिथी असते. या महान संशोधकास बोभाटाकडून अभिवादन.

लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required