'ओ' नाही, तर जगात १० लाख लोकांमध्ये फक्त चारच लोकांचा असणारा हा रक्तगट आहे युनिव्हर्सल डोनर !!

तुम्हांला कोणकोणते रक्तगट असतात हे तर माहिती असेलच. ए, बी, एबी आणि ओ!. यातले 'एबी' रक्तगट असणाऱ्यांना युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणतात कारण त्यांना कुणाचंही रक्त चालू शकतं. तर 'ओ' रक्तगट असणाऱ्यांना युनिव्हर्सल डोनर म्हणतात, कारण त्यांचं रक्त कुणालाही चालू शकतं. पण गंमत माहित आहे का, हा 'ओ' रक्तगट युनिव्हर्सल डोनर नाही. हा मान आहे बाँबे ब्लडग्रुपचा!!
हो, या नावाचा एक रक्तगट आहे आणि जगात तो १० लाख लोकांमध्ये फक्त चारच लोकांचा असतो. 


कसे ठरवतात हे रक्तगट??

१९००साली ऑस्ट्रियन संशोधक कार्ल लँडस्टाईनरने रक्तगटांचा शोध लावला. साधारणपणे आपल्या लाल रक्तपेशींत आढळणाऱ्या अँटीजेन्सच्या गुणधर्मांवरून हे ब्लड ग्रुप बनवले जातात. या अँटीजेन्सचे ढोबळमानाने दोन प्रकार मानले गेले आहेत. ए  अँटीजेन्स आणि बी अँटीजेन्स. ज्यांच्या शरीरात ए अँटीजेन्स असतात, त्यांचा रक्तगट असतो 'ए', ज्यांच्या शरीरातल्या लाल रक्तपेशींत बी अँटीजेन्स सापडतात, त्यांचा रक्तगट 'बी' असतो. दोन्ही अँटीजेन्स असतील तर 'एबी' तर हे दोन्ही अँटीजेन्स नसतील तर तो असतो 'ओ'!!

कार्ल लँडस्टाईनर स्रोत


मग हा बाँबे रक्तगट आला कुठून?

१९५२साली मुंबईतल्या राजा एडवर्ड हॉस्पीटल म्हणजेच के. ई. एम. मध्ये डॉ. वाय. एम. भेंडेंना असं आढळून आलं की एका पेशंटचा रक्तगट या चारही गटांशी जुळत नाहीय. मग त्यांनी वेगवेगळ्या लोकांचं रक्त त्या रूग्णाच्या गटाशी जुळतं की नाही ते पाहायला सुरूवात केली. असं म्हणतात की १६० लोकांचे नमुने तपासल्यानंतर शेवटी कुठे तो गट जुळला. ज्या रक्तदात्याच्या रक्तगट जुळला, तो होता मुंबईचा.. म्हणजेच तेव्हाच्या बाँबेचा. म्हणून या वेगळ्या रक्तगटाला नांव पडलं बाँबे ब्लडग्रुप!! पण याचं खरं शास्त्रीय नांव "एच/एच" किंवा 'ओएच' रक्तगट आहे..

बाँबे रक्तगटात वेगळं काय असतं?

संशोधनाअंती डॉक्टरांच्या  असं  लक्षात आलं की 'एच' प्रकाराचे पण अँटीजेन्स असतात आणि ते ए, बी आणि ओ रक्तगटाच्या लोकांच्या रक्तपेशींत असतात. जर हे 'एच' प्रकारचे अँटीजेन्स नसतील, तर ते वेगळे गुणधर्म दाखवतात. ज्या लोकांच्या शरीरात हे ए, बी आणि  'एच' अँटीजेन्स नसतात, ते बाँबे ब्लडग्रुपचे असतात.

हा रक्तगट इतका दुर्मिळ असतो की त्यामुळं रक्ताअभावी लोकांचे प्राणही जाऊ शकतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एक बाँबे रक्तगटाचा दाता सोलापूरहून रक्तदान करण्यासाठी पुण्याला गेला. तिथून ते रक्त मुंबईला आणि मुंबईहून विमानाने विशाखापट्टणमला पाठवण्यात आलं. हे सगळं एका दिवसात घडून आलं. तातडीची निकड पण कमी उपलब्धतता या दोन गोष्टींमुळं हे करावंच लागतं.

(बंगळुरूमध्ये या रक्तगटाच्या दात्यांच्या सभेत घेतलेला फोटो- स्रोत)

दुर्मिळ रक्तगटाच्या दात्यांनी काय करावं?

सतत रक्तदान करू नये. साधारणपणे रक्तदान शिबिरांचं आयोजन रक्तपेढ्यांकडून केलं जातं. त्या रक्तपेढ्यांकडून ते रक्त वापरलं गेलं असण्याची किंवा रूग्णास नक्की कोणत्या रक्तपेढीत ते उपलब्ध आहे याची माहिती असेलच हे ही प्रत्येकवेळेस शक्य नसते. त्यामुळं नोंदणीकृत रक्तदात्याला संपर्क साधल्यास असं रक्त पटकन मिळू शकतं. तसंच या ब्लडग्रुपचं रक्त फार काळ साठवून ठेवता येत नाही.

आजच्या घडीला भारतात फक्त ४०० नोंदणीकृत बाँबे ब्लडग्रुपचे दाते आहेत!! भारतात संकल्प फाऊंडेशन आणि थिंक इंडिया फाऊंडेशनकडे या रक्तगटाचे दाते आपलं नांव नोंदवतात. 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required