computer

गळवे कशामुळे होतात,त्यांची लक्षणं काय आणि ते टाळावे कसे??

आपण कधीकधी 'अस्मितांची गळवं' हा उपहासात्मक वाक्यप्रचार वापरतो. यातली गळवं म्हणजे काय हा कधी विचार केलाय?

गळू हा एक त्वचाविकार आहे. तो होतो स्टॅफिलोकॉकस (staphylococcus) नावाच्या जीवाणूमुळे. याच जीवाणूंचे अपभ्रंशित नाव म्हणजे स्टॅफ. सामान्यपणे २५% लोकांच्या नाक, तोंड, जननेंद्रिये इ. ठिकाणी हा जीवाणू आढळतो. पण तो सगळ्यांच्या बाबतीत उपद्रवी नसतो. अनेकदा जमिनीच्या संपर्कात असल्याने पायाला याचा संसर्ग जास्त होतो. त्वचेवर कुठे लहानसा छेद असेल तर त्यातून हा जिवाणू सहज शरीरात शिरू शकतो.

गळूचे प्रकार कोणते?

- बॉईल्स
स्टॅफ इन्फेक्शनचा सगळ्यात सामान्य प्रकार म्हणजे बॉईल्स नावाच्या विशिष्ट पुटकुळ्या. या पुटकुळ्यांमध्ये सहसा पू भरलेला असतो. इन्फेक्शन झालेल्या भागातील त्वचा अनेकदा लाल, सुजल्यासारखी दिसते. ही गळवे फुटली, तर त्यातून पू बाहेर येतो. बॉईल्स बहुतेक वेळा काखांमध्ये, जननेंद्रियांच्या आजूबाजूला आढळून येतात.

इम्पेटीगो

या प्रकारातही शरीरावर वेदनादायक पुरळ उठते. यात मोठमोठे फोड येऊन त्यावर मधाच्या रंगाच्या खपल्या दिसतात.

 सेल्यूलाईटीस

या प्रकारात इन्फेक्शन हे त्वचेच्या सगळ्यात खोलवरच्या थरात होते. यामध्येही बाहेर पडणाऱ्या स्रावांमुळे त्या जागेवर लाली आणि सूज दिसते.

स्टॅफिलोकोकल स्केल्ड स्किन सिंड्रोम

स्टॅफ इन्फेक्शनमुळे निर्माण होणारी विषद्रव्ये पुढे जाऊन स्टॅफिलोकॉकल स्केल्ड स्किन सिंड्रोम निर्माण करतात. याचा परिणाम जास्त करून लहान मुलांवर होतो. यात ताप, बारीक पुरळ ही लक्षणे आढळतात.

स्टॅफ इन्फेक्शनमुळे अनेकदा अन्न विषबाधा होते. याची लक्षणेही लगेच दिसतात, म्हणजे अगदी अन्नसेवन झाल्यापासून अवघ्या काही तासांतच लक्षात येतात. लक्षणे जशी लवकर दिसतात तशीच लवकर नाहीशीपण होतात. ह्या लक्षणांमध्ये मळमळ आणि उलटी,हगवण्, डीहायड्रेशन, लो बीपी यासारख्या गोष्टींचा समावेश होतो.

स्टॅफ जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करतो तेव्हा बॅक्टेरेमिया हा विकार होतो. ताप आणि लो बीपी ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत. हा शरीरातील खोलवर पसरल्यास मेंदू, हृदय, फुफ्फुसे, हाडे, स्नायू हे अवयव आणि शस्त्रक्रियेद्वारे बसवली गेलेली पेसमेकरसारखी उपकरणे यांच्यावर परिणाम होतो.

स्टॅफ बॅक्टेरियाच्या काही नवीन स्ट्रेनमुळे निर्माण होणारी विषद्रव्ये मात्र अनेकदा आणीबाणीची, गंभीर परिस्थिती निर्माण करतात. यामुळे अचानक उच्च ताप, मळमळ आणि उलट्या, हातावर येणारे उन्हात रापल्यासारखे दिसणारे पुरळ, स्नायूंच्या वेदना, डायरिया, पोटदुखी ही लक्षणे विकसित होतात.

गळू होण्यामागे कारणे कोणती?

अनेक व्यक्ती गळूला कारणीभूत असणारा स्टॅफ जीवाणूची जणू वाहक बनतात. हे जीवाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतात. टॉवेल, अंथरूण-पांघरुणं यांमधून हा जीवाणू सहज संक्रमित होतो. हा जीवाणू अतिशय चिवट असतो आणि कोरडे हवामान, अतिउष्ण व अतिथंड तापमान अशा वातावरणात किंवा पोटातील आम्लातही तो जिवंत राहू शकतो.

कोणाला हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो?

प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्ती, इन्शुलीन घ्यावे लागते अशा मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या व्यक्ती, एचआयव्हीबाधित, डायलिसिसवर असणाऱ्या व्यक्ती, केमोथेरपी किंवा रेडिएशन उपचार घेतलेले कॅन्सरबाधित, कोणताही ताण असणाऱ्या व्यक्ती हे सर्वजण बॅक्टेरिया संक्रमणाच्या रडारवर असतात. याशिवाय डायलिसिससाठी वापरण्यात येणाऱ्या ट्यूब, कॅथेटर, फिडिंग ट्यूब, यांमुळेदेखील हा जीवाणू संक्रमित होऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

- किमान वीस सेकंदांपर्यंत तरी हात साबणाने स्वच्छ धुणे, त्यानंतर डिस्पोजेबल टॉवेलने ते कोरडे करून नंतर परत एकदा दुसऱ्या कोरड्या टॉवेलने पुसून घेणे.
- जखमा व्यवस्थित झाकणे. त्या व्यवस्थित स्वच्छ करून कोरड्या बँडेजच्या साहाय्याने जखम भरेपर्यंत झाकून ठेवणे.
- कंगवा, रुमाल, टॉवेल अशा वैयक्तिक गोष्टींची दुसऱ्या व्यक्तीबरोबर अदलाबदल टाळणे.
- कपडे, अंथरूण-पांघरूण नियमितपणे स्वच्छ धुणे.
- अन्नाचे तपमान ६० डिग्रीपेक्षा जास्त किंवा ४ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी ठेवणे. उर्वरित अन्न शक्य तितक्या लवकर फ्रिजमध्ये ठेवणे.
या उपायांनी आपण निश्चितपणे इन्फेक्शनला आपल्यापासून लांब ठेवू शकतो.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required