computer

डेंगव्हॅक्सिया हे काय आहे? ते डेंग्यूविरुद्ध कितपत प्रभावी आहे?

दुष्ट आत्म्यांनी पछाडल्यामुळे जे रोग होतात (असा समज आहे) त्या यादीतलं एक नाव म्हणजे डेंग्यू. डेंग्यू हा शब्दच मुळात स्वाहिली भाषेतील 'डिंगा' या शब्दावरून आलेला आहे. 'का डिंगा पेपो' हा त्यांच्याकडे एक वाक्प्रयोग आहे. त्याचा अर्थ आहे दुष्ट आत्म्यांनी पछाडल्यामुळे होणारा रोग.

त्यक्षात डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्ती जातीच्या डासाच्या मादीमुळे होतो. डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, उलट्या, त्वचेवरील लालसर रंगाचं पुरळ ही लक्षणं आढळून येतात. डेंग्यू चार प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. आज डेंग्यूवर प्रभावी व्हॅक्सिन शोधणं ही काळाची गरज आहे. हे व्हॅक्सिन विषाणूच्या चारीही प्रकारांविरुद्ध प्रभावी असेल तरच डेंग्यूमुळे होणारे मृत्यू कमी करता येतील. सध्या डेंग्यूवर एकच परवानाप्राप्त व्हॅक्सिन आहे - फ्रान्सच्या सनोफी पाश्चरचं डेंगव्हॅक्सिया. याव्यतिरिक्त ५ व्हॅक्सिन्स निर्मिती अवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.

२०१५ मध्ये मेक्सिकोमध्ये डेंगव्हॅक्सियाच्या वापराला परवानगी मिळाली. मेक्सिकोच्या रोगप्रसार झालेल्या प्रदेशांमध्ये ९ ते ४५ वयोगटातील, यापूर्वी डेंग्यू होऊन गेलेल्या व्यक्तींना हे व्हॅक्सिन देण्यासाठी परवानगी देण्यात आली. आता या व्हॅक्सिनला वीस देशांमध्ये परवानगी आहे. याचे एकूण तीन डोस आहेत. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस सहा महिन्यांनी आणि तिसरा १२ महिन्यांनी देण्यात येतो.

डेंग्यूवर व्हॅक्सिन विकसित करायला १९२० मध्ये सुरुवात झाली होती. परंतु या विषाणूचे चार स्ट्रेन्स असल्यामुळे सर्व चारही प्रकारांविरुद्ध प्रतिकार शक्ती विकसित करेल असं व्हॅक्सिन शोधायला बराच वेळ लागला. डेंगव्हॅक्सियामुळे आधी डेंग्यू न झालेल्या लोकांना जास्त गंभीर स्वरूपाचा डेंग्यू होण्याची शक्यता निर्माण होते असंही आढळून आलं. त्यात २०१७ मध्ये सात लाखापेक्षा जास्त मुलं आणि पन्नास हजार पेक्षा जास्त प्रौढ स्वयंसेवक यांच्यावर सिरोस्टेटस (रोगाविरुद्धच्या अँटीबॉडीज आहेत की नाहीत हे सांगणाऱ्या चाचण्या) न तपासताच व्हॅक्सिनचा प्रयोग करण्यात आला. यातून एक नवीन वाद उद्भवला. डेंगव्हॅक्सियामध्ये जिवंत परंतु कमी प्रभावी विषाणू वापरलेला आहे. व्हॅक्सिन तयार करताना रिकॉम्बिनंट डीएनए (एका पेशीतला डीएनए रेणूचा भाग कृत्रिमरित्या दुसऱ्या पेशीतल्या डीएनएबरोबर जोडून कृत्रिमरित्या तयार केलेला डीएनए. हा प्राणीपेशींच्या जैविक क्रियांमध्ये बदल घडवून आणतो.) तंत्रज्ञान वापरलं आहे.

मात्र हे व्हॅक्सिन पूर्णतः प्रभावी असल्याचं अजूनही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे सध्यातरी नैसर्गिकरित्या आजाराला प्रतिबंध करणं एवढंच आपल्या हातात आहे. त्यासाठी खालील उपायांचा अवलंब करा -

1.साठलेल्या पाण्यात डासांची अंडी व अळ्या असतात त्यामुळे घरामध्ये कुंड्या किंवा इतर ठिकाणी पाणी साठलेले असेल तर ते वेळीच बदलणं

2. घनकचऱ्याची विल्हेवाट लावणं

3.पाण्याच्या टाक्या वेळच्यावेळी रिकाम्या करून त्यांची साफसफाई

4. पाणी साठवण्याच्या मोठमोठ्या टाक्यांवर झाकण घालणं

5.या टाक्या डासाची उत्पत्तीस्थळं होऊ नयेत म्हणून त्यावर आठवड्यातून एकदा कीटकनाशक फवारणं

6.शक्यतो लांब बाह्यांचे कपडे वापरणं

7.रात्री झोपताना मच्छरदाणी, डास पळवून लावणारी अगरबत्ती यांचा वापर

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required