computer

ग्लुटेन ॲलर्जी काय असते? तिची लक्षणे काय आणि दुर्लक्ष केल्यास काय दुष्परिणाम होऊ शकतो?

व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार सगळ्यांना सगळ्याच प्रकारचे अन्न चालत किंवा पचत नाही. शरीराचे यंत्र नीट काम करत नसेल तर कधी पथ्ये मागे लागतात, कधी एखाद्या पदार्थाची ऍलर्जी हवे ते खाण्याच्या आड येते. अशीच एक ऍलर्जी म्हणजे ग्लूटेनची ऍलर्जी किंवा सेन्सिटिव्हीटी.

ग्लूटेन सेन्सिटिव्हीटी काय आहे?

गहू, बार्ली यासारख्या पदार्थांमध्ये ग्लूटेन असते. ग्लूटेन असलेल्या पदार्थांचे पीठ पाण्याने भिजवल्यावर त्यातील प्रोटिन्स एकमेकाला चिकटेल असे जाळे तयार करतात. त्याला ग्लूसारखा चिकटपणा येतो. या ग्लूसारख्या चिकटपणामुळेच या घटकाला ग्लूटेन हे नाव मिळाले आहे. ग्लुटेनमुळेच या पिठाला चिकटपणा प्राप्त होतो आणि त्याची लाटून पोळी करता येते.
ग्लूटेनमध्ये प्रोलेमीन नावाच्या प्रोटीन्सचे मिश्रण असते. हे प्रोटीन आतड्याच्या आतल्या कोशीकांमध्ये अपायकारक प्रक्रिया घडवून आणत असेल तर त्याला ग्लूटेन सेन्सिटिव्हीटी म्हणतात.

ही ऍलर्जी असणाऱ्यांना पचनाशी संबंधित तक्रारी जाणवतात. हगवण, पोट बिघडणे, पोटदुखी, पोटात गॅस धरणे अशी लक्षणे आढळून येतात. अशावेळी सिलीयॅक डिसीज हा विकार आहे का हे वैद्यकीय सल्ला घेऊन टेस्ट करता येते. जर हा विकार असतानाही न तपासता सतत ग्लूटेनयुक्त पदार्थ खाल्ले गेले तर लहान आतड्याच्या आवरणाचा दाह होऊन ते खराब होते. यामुळे शरीराला अन्नातील पोषक द्रव्ये शोषण्यात अडथळे येतात. यामुळे कुपोषण आणि वजन कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. तरुण वयात आणि स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.

एखाद्याला ग्लूटेन ॲलर्जी आहे का याचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. या तपासणीच्या निष्कर्षांवर आधारित गरजेनुसार आतड्याची बायोप्सी केली जाते. यात आतड्याच्या आवरणाचा छोटा तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो.

अनेकदा ग्लूटेनची ऍलर्जी आहे असे समजून रुग्ण टेस्ट करण्याच्या आधीच ग्लूटेन फ्री डाएट घ्यायला सुरुवात करतात. परंतु यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती पुरेशा अँटीबॉडीज तयार करत नाही आणि तपासणी करताना त्या न आढळल्याने टेस्टचे निष्कर्षही अचूक येत नाहीत. त्यामुळे हे टाळावे.

आता सिलीयॅक डिसीजसाठीची तुमची चाचणी निगेटिव्ह असेल, पण तरीही शरीर ग्लूटेनला वाईट प्रतिक्रिया देत असेल तर काय? सिलीयॅक डिसीजप्रमाणे ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी आतडे खराब करत नाही. ग्लूटेन सेन्सिटिव्हिटीसाठी कोणतीही मेडिकल टेस्ट नाही. त्यामुळे त्याचे निदान लक्षणांच्या आधारे केले जाते. ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी असणाऱ्या रुग्णांची लक्षणे सिलीयॅक डिसीजच्या लक्षणांसारखीच असतात. ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी आणि आणि सिलीयॅक डिसीज दोन्ही असणाऱ्या लोकांना थकवा आणि डोकेदुखी यासारख्या समस्याही आढळून येतात.

ग्लूटेनची तक्रार असणाऱ्या व्यक्तींंना ग्लूटेन फ्री डाएट घेण्याचा सल्ला दिला जातो. यात तांदूळ, ओट्स, ज्वारी, राजगिरा, मिलेट, अळशी, साबुदाणा यांचा समावेश होतो. बाजारातून ग्लूटेन फ्री उत्पादने विकत आणताना त्यात ग्लुटेनच्या ऐवजी दुसरे पोषण घटक वापरले आहेत का हे बघणेही आवश्यक असते. ग्लूटेनयुक्त आहाराकडून ग्लूटेनमुक्त आहाराकडे जाताना टप्प्याटप्प्याने गेल्यास फार त्रास होत नाही.

आज जगातील अनेक लोक या विकाराचा सामना करत आहेत. पण घाबरून जाऊ नका. आहारात थोडेफार बदल करून कुणीही या विकारासह जगू शकतो. तुमच्याआमच्याप्रमाणेच आयुष्य एन्जॉय करू शकतो. फक्त थोडे पथ्यपाणी सांभाळायला हवे. शेवटी, जान है तो जहान है, नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required