computer

भलतेसलते प्रश्न: पुरुषांनी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तर काय होईल??

पुरुषाने गर्भ-निरोधक गोळ्या घेतल्या तर काय होईल? ते गोळ्या घेऊन काय व्हायचं ते होईल, पण त्याआधी हा प्रश्न उभा करणारा हा बोभाटाचा लेख वाचायचं बंद करून मनातल्या मनात किंवा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला चार शिव्या हासडाल हे नक्कीच!! पण वाचकहो, थांबा!

हा असला वरकरणी खुळचट वाटणारा प्रश्न बरेच पुरुष वैद्यकीय सल्लागारांना विचारतात. त्यासाठी त्यांच्याकडे काही खास कारणंही असतात. त्याची चर्चा आपण लेखाच्या शेवटी करूच, पण त्याआधी या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर काय आहे ते तपासूया!  

गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टीन (estrogen and progestin) या दोन हार्मोनचे मिश्रण असते. या हार्मोन्समुळे महिलांची मासिक पाळी नियंत्रित होते. या हार्मोन्समुळे बीजकोषात ओव्हमची म्हणजेच स्त्री बीजांडाची निर्मिती होत नाही. साहजिकच पुरुषांच्या शुक्रजंतूंनी शरीरात प्रवेश केला तरी महिलेला दिवस जात नाहीत. हे दोन्ही हार्मोन्स पुरुषांच्या शरीरातही थोड्याफार प्रमाणात असतात. त्यापैकी एस्ट्रोजेन शुक्राणूंच्या निर्मितीसाठी, तर प्रोजेस्टीन टेस्टोस्टेरॉन (testosterone) निर्मितीसाठी वापरले जाते.

आता हे समजले असेल तर मूळ प्रश्नाकडे वळूया. पुरुषाने गर्भ-निरोधक गोळ्या घेतल्या तर काय होईल?

१. एक-दोन गोळ्या घेतल्या तर काहीच होणार नाही.

२. पण एखाद्याने या गोळ्या नियमित घेतल्या तर मात्र काही गंभीर लक्षणं दिसायला लागतील. त्यापैकी महत्वाचे शारिरीक बदल असे असतील:

अ) पुरुषाचे स्तन मोठे व्हायला सुरुवात होईल.

ब) अंडकोश (ग्राम्य भाषेत 'गोट्या') आक्रसायला सुरुवात होईल.

क) कामेच्छा नाहीशी होईल.

ड) चेहेर्‍यावरचे केस म्हणजे दाढी-मिशांचे प्रमाण कमी होईल. त्या केसांची वाढ होणार नाही.

इ) प्रोस्टेट ग्रंथीची वाढ व्हायलाप्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग होण्याची शक्यता वाढेल.

(हो, एक फायदा असा आहे हृदयविकाराची शक्यता कमी होईल, पण हे काही गोळ्या घेण्याचे कारण होऊ शकणार नाही.)

तर आता या लेखाच्या शेवटच्या आणि महत्वाच्या भागाकडे वळूया!

हा प्रश्न पुरुष वैद्यकीय सल्लागारांना किंवा ओळखीच्या इतर पुरुषांना का विचारतात. बहुतेकजण केवळ औत्सुक्य म्हणून विचारतात. अशा उत्सुक पुरुषांना पुरेसे असे उत्तर आम्ही वर दिलेच आहे.

पण काही पुरुषांच्या समस्या वेगळ्या असतात. त्यांना मनापासून स्त्री रुप हवे असते. त्यांच्या मनाची घडण जडण स्त्रीसारखी असते, पण निसर्गाने त्यांना पुरुषांचा देह दिलेला असतो. अशा पुरुषांकडून या गोळ्या स्त्री होण्यासाठी सोपा मार्ग समजला जातो. पण हा तो मार्ग नव्हे. त्यासाठी आधी त्यानी मनोचिकित्सकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यांची खरी लैंगिक-ओळख म्हणजे जेंडर आयडेंटीटी निश्चित करण्यास तेच मार्गदर्शन करू शकतात. अशा पुरुषांचे अनेक समूह आता अस्तित्वात आलेले आहेत. त्या समूहातील व्यक्तींशी त्यांनी संपर्क करावा. LGBTQ या चळवळीनंतर हा बाऊ करण्यासारखा विषय राहिलेला नाही.

वैद्यकीय सल्ल्याशिवाय केलेली अशी कोणतीही गोष्ट चांगली नव्हेच. वैद्यक शास्त्रात एकच नियम सर्वांना लागू पडतो असे तर मुळीच होत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता अशा शंका असतील आणि त्यावर उपचार हवे असतील तर एखादा चांगला डॉक्टर गाठावा हे उत्तम. थोडक्यात, गर्भ-निरोधक गोळ्या घेण्याचा अविचार करू नये.

सबस्क्राईब करा

* indicates required