computer

आपल्या तरुणांना व्यसनाच्या विळख्यात गुंतवणारे हे 'कुत्ता गोली' काय प्रकरण आहे ?

'दम मारो दम' या गाण्याने एकेकाळी चांगला धुरळा उडवून दिला होता.त्या जमान्यात गांजा -अफू-एलएसडी - ही व्यसनाची साधने होती. नंतरच्या काळात हेऱोइन-गर्द वगैरे आली.  गम मिटाने का अक्सीर इलाज... हा एकच कार्यक्रम या व्यसनामागे होता.त्यानंतरचा जमाना तर असा आला की समाजाच्या उच्चवर्गीयात नशेखोरीला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. संजय दत्तचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच.

गेल्या २५/३० वर्षात सरकारने उचललेल्या खंबीर पावलांमुळे थेट नशा देणार्‍या वस्तूंच्या व्यवहाराला आळा बसला. पण नशेबाज ते नशेबाजच ,त्यांनी मान्याताप्राप्त नशेचा मार्ग शोधून काढला. हा मार्ग म्हणजे psychotropic drug चा वापर !    ही औषधे म्हणजे औषध कंपन्यांची डोकेदुखी असते. त्यांनी उत्पादीत केलेली औषधे मानसिक रुग्णासांठी किंवा तत्सम आजारासाठी असतात पण वापरकर्ते मात्र औषधांचा उपयोग नशेसाठी करतात.दुर्दैवाने जगात दुःखाला, चिंतांना तुटवडा नाही. त्यामुळे त्यांचा बाजारही कायम तेजीत असतो. आपल्याला थेट 'सातवे आसमान में' घेऊन जाणाऱ्या या नशिल्या औषधांचा परिणाम थेट मेंदूच्या कार्यप्रणालीवर होतो हे मात्र या बाजारातल्या गिऱ्हाईकाला कळलं तरी वळत नाही. आपल्याकडे गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणारी कुत्ता गोली यापैकीच एक !

या ड्रगचा उपभोक्ता वर्ग आहे मुख्यतः शाळेतली आणि कॉलेजमधली पोरं पोरी. हो; या व्यसनाची चटक अगदी शाळकरी पोरापोरीनाही लागते. सांकेतिक भाषेत या गोळीला 'बटन' हे नाव आहे. या गोळीचा पाऊच आरामात खिशात मावू शकतो. त्यामुळे तिची विक्री करताना रंगेहाथ पकडणं कठीण होऊन बसतं. त्यातच काही महाभाग या गोळ्या योग्य तिथे 'पोहोचवण्यासाठी' लहान मुलांचाही वापर करतात.

कुत्ता गोली हे मुळात एक औषध आहे जे झोप येण्यासाठी घेतलं जातं. या औषधाचं शास्त्रीय नाव आहे अल्प्राझोलाम. पूर्वी आपल्या आई किंवा आजी यांच्या तोंडून आपण कॉम्पोज हे नाव ऐकलं असेल, तर हेच ते औषध. डोकं शांत ठेवण्यासाठी, रात्री शांत झोप लागण्यासाठी ही कॉम्पोजची गोळी घेतली जायची. आज मात्र ही गोळी नशेसाठी घेतली जाते. आता यात नवीन असं काही नाही. अनेक औषधांचा नशेसाठी म्हणून वापर केला जातो. यासाठी मुख्यतः खोकल्यावरची औषधं, वेदनाशामकं, झोपेची औषधं वापरली जातात. कुत्ता गोली मध्ये अनेक उत्तेजक रसायनांचं मिश्रण वापरलं जातं. ही गोळी घेतल्यानंतर शरीराला एक प्रकारची बधिरता येते. कुठल्याही वेदना जाणवत नाहीत. पुढे पुढे या गोळीची चटक लागते. या गोळीत असलेल्या अल्प्राझोलाममुळे व्यक्तीला झोप येते आणि ती मिळाली नाही तर जीव कासावीस होतो. अशी व्यक्ती मग बेभान होऊन अक्षरशः कुत्र्याप्रमाणे हिंसक बनते. त्यावरूनच हे औषध 'कुत्ता गोली' या नावाने प्रचलित आहे.

कुत्ता गोली हा नशेचा तसा अलीकडल्या काळातला प्रकार आहे. सुरुवातीला या गोळ्या मध्य प्रदेश मधून आपल्याकडे आल्या असं म्हणतात. नंतर त्यांचं गुजरात कनेक्शन देखील समोर आलं. या गोळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कमी किमती. स्वस्तात मिळत असल्याने तरुणांसाठी त्या सहजप्राप्य आहेत. शिवाय त्यांची झिंगही चटकन येते. केवळ एकदोन रुपयांमध्ये एक गोळी मिळत असल्याने खिशाला फार चाट पडत नाही हा या ड्रगचा मोठा प्लस पॉईंट ठरतो. 

वास्तविक हे ड्रग ओटीसी(ओव्हर द काऊंटर) प्रकारातलं नाही. मेडिकल स्टोअर मध्ये देखील ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय मिळत नाही. मेंदूच्या विकारांसाठी घ्यायची सर्वच औषधं स्वतःच्या मनाने घेणं धोकादायक असतं. शरीराला गरज नसताना, स्वतःच्या मनाने किंवा नशा म्हणून ही औषधं घेतली जातात तेव्हा शरीराला त्याची सवय लागते. त्यामुळे औषधाची मात्रा वाढवावी लागते. ते मिळालं नाही तर त्याचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम दिसायला लागतात. मात्र असं असूनही या औषधाचा सर्रास काळाबाजार होतो. मागणी तसा पुरवठा हा साधा न्याय आहे.

 

आपल्याकडे स्वस्त गोष्टींची नेहमीच चलती असते. त्याचे दुष्परिणाम काय किंवा दुरगामी परिणाम काय, चरचरीत कटके देईपर्यंत कुणीही त्याबद्दल विचार करत नाही. आपली मुलं या जाळ्यात सापडू द्यायची नसतील तर खरंतर खूप आघाड्यांवर पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने काम करायला हवं. ते कधी करणार हाच मोठा प्रश्न आहे.
आता शेवटी आमच्या बोभाटाच्या वाचकांना एक आवाहन :
जवळच्या मेडीकलच्या दुकानात Alprax/Trika/Anxit/Alzolam/Restyl/Texidep/Alprocontin/Zolent यापैकी एखादी गोळी मागून बघा. बिनबोभाट मिळाली तर पुढे काय करायचे ते तुम्हाला माहिती आहेच !

सबस्क्राईब करा

* indicates required