computer

व्हॅसलीनमध्ये नेमकं काय असतं? त्याचे फायदे आणि दुष्परिणाम काय आहेत?

नोव्हेंबर महिना सुरू झालाय. हिवाळ्याची चाहूल लागली की टीव्हीवर बॉडी लोशन्स, मॉइश्जरायझर क्रीम, बॉडी मिल्क अशा जाहिरातींचा भडिमार सुरू होतो. त्यात एक सुंदर आघाडीची नटी दाखवली जाते. ती तोकड्या कपडयात कपाळापासून पायाच्या नखापर्यंत मॉइश्जरायझींग जेल किंवा लोशन लावताना दिसते. मग ते निवियाचे लोशन असो की युनिलिव्हरचे व्हॅसलीन, संदेश एकच असतो- "हिवाळ्यामुळे त्वचेवर होणार्‍या दुष्परिणामापासून वाचायचे असेल तर आमचे(च) उत्पादन वापरा." सध्याचा ऋतू आणि दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींच्या अनुषंगाने बोभाटाच्या आजच्या लेखात व्हॅसलीन आणि त्यासारख्याच इतर उत्पादनात काय असते आणि जाहिरातीत केलेला दावा किती खरा आहे ते आपण वाचूया!

सर्वसामान्यपणे आपले आरशामागचे कपाट उघडून बघा. व्हॅसलीनची बाटली असतेच असते. तसेही हिवाळा आणि व्हॅसलीनची जाहिरात हे गणित पक्के आहे. पूर्ण हिवाळा संपेपर्यंत व्हॅसलीनची जाहिरात येत राहते आणि आपण न विसरता मेडिकलमधून एखादीतरी बाटली घेऊन येतो. पिवळी, हिरवी आणि निळी, तपकिरी.. विविध रंगांच्या बाटल्या. प्रत्येकीचे वेगळे वैशिष्ट्य, त्यातले घटक वेगवेगळे असतात. त्वचेच्या प्रकारानुसार ते बदलतात. जास्त कोरडी त्वचा, तेलकट त्वचा, सामान्य त्वचा असे अनेक विविध प्रकार!

पण व्हॅसलीन म्हणजे काय असा प्रश्न विचाराल. तर उत्तर एकच आहे ते म्हणजे पेट्रोलियम जेली! १८७२ साली रॉबर्ट चेसब्रो नावाच्या एका रसायनतज्ञाने कच्च्या पेट्रोलियमच्या गाळसाळात मिळणार्‍या मेणचट पदार्थापासून, म्हणजे रॉड वॅक्सपासून त्याची निर्मिती केली आणि त्याचे पेटंट पण घेतले. आता व्हॅसलीन हे नाव कसे आले हे समजून घेणे पण मनोरंजक आहे.

जर्मन भाषेत व्हॅसेर म्हणजे पाणी आणि ग्रीक भाषेत 'एलेशन' म्हणजे तेल. या दोन शब्दांना जोडून रॉबर्ट चेसब्रोने आपल्या उत्पादनाला व्हॅसलीन हे नाव दिले. आता नाव दिले. पण उत्पादनाचा प्रचार पण करायला हवा ना? रॉबर्ट चेसब्रो या व्हॅसलीनची जाहिरात करण्यासाठी अमेरिकेतल्या अती थंड शहरांत फिरायचा. लोकांना गोळा करून त्यांच्यासमोर स्वतःला मेणबत्तीने किंवा अ‍ॅसिडने डागून घ्यायचा आणि झालेल्या जखमेवर व्हॅसलीन चोळून त्याचे औषधी गुणधर्म समजावून सांगायचा. आधीच्या सुकत आलेल्या जखमा दाखवून व्हॅसलीनची उपयुक्तता समजावून सांगायचा.

हळूहळू त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि व्हॅसलीनने बाजारपेठेत स्वतःचे स्थान बनवले. आजही कडाक्याच्या थंडीत आठवण होते व्हॅसलीनचीच! आपल्या उत्पादनावर रॉबर्ट चेसब्रोचे इतके प्रेम होते की तो रोज एक चमचा व्हॅसलीन खायचा म्हणे! अर्थात हा वेडगळपणा तुम्ही करू नका.

परंतु आपली विश्वासू पेट्रोलियम जेली व्हॅसलीनच्या स्वरुपात वापरतो ती खरोखरच इतकी सुरक्षित आणि प्रभावी आहे का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण विचार करतो तितकी ती निरुपद्रवी आहे का? बहुतांश त्वचारोग तज्ञांचे याबाबत काय मत आहे याचा अभ्यास केला तर काय दिसते?

पेट्रोलीयम जेली सामान्यत: सुरक्षित मानली जाते. पेट्रोलियम जेलीच्या प्रक्रियेदरम्यान तेलामधून काढून टाकले जाणारे घटक काही प्रमाणात कार्सिनोजेनिक म्हणजेच अपायकारक असतात. व्हॅसलीनमध्ये हे सर्व घटक बहुधा काढून टाकले जातात. पेट्रोलियम जेली सारखेच इतर बरेच घटक त्यात टाकले जातात. आणि हे आपल्याला माहीत नसते. पेट्रोलियम जेली "शुद्धतेच्या वेगवेगळ्या ग्रेड" मध्ये आढळू शकते. म्हणूनच, आपल्या पेट्रोलियम जेलीवर आधारित असलेली सौंदर्य उत्पादने खरोखर किती विषारी असतात हे आपल्याला नेहमीच ठाऊक नसते.

आपल्या त्वचेसाठी म्हणून पेट्रोलियम जेली मॉरीश्चराइझ्ड आणि हायड्रेटेड त्वचेचा भास निर्माण करू शकते. खरंतर हे आपल्या त्वचेच्या रंध्रांना बुजवल्यासारखे असते. पेट्रोलियम जेली हे वॉटर-रीपेलेंट म्हणजेच पाणीरोधक आहे. ते पाण्यात न विरघळणारे आहे याचा अर्थ ते केवळ अडथळा बंद करते जेणेकरून त्वचा आतील ओलावा सोडत नाही. त्यामुळे आपली त्वचा मऊ आणि नरम राहते, कोरडेपणा  नाहीसा होतो.  सॉफ्ट अँड फ्रेश त्वचेचा फील येतो. परंतु नेमकं काय होतं माहित्येय का?

आपण हवा आणि आर्द्रता बाहेर ठेवून आपले त्वचाछिद्र वाळवून टाकतो. त्याहूनही वाईट म्हणजे ही जर जेली चेहरा न धुता लावली तर त्वचेवरील धूलिकण त्यात मिसळून अजून खोलवर जाऊन त्वचेचा पोत बिघडवू शकतात.

व्हॅसलीनचा पुरताच विचार केला तर त्यांच्या वेबसाइटवर असा दावा केला गेला आहे, की त्यांचे उत्पादन नॉन-कॉमेडोजेनिक आहे, ज्याचा अर्थ असा आहे की त्यांचे उत्पादन त्वचेवरची सूक्ष्म रंध्रे रोखत नाही.

मुरुम आणि रोजाशियासारख्या त्वचेच्या स्थितीत पीडित असलेल्या लोकांनी पेट्रोलियम जेलीपासून पूर्णपणे दूर रहावे. कारण असे  जाड लेप त्वचेला  त्रास देऊ शकतात. काहीजण सर्दी झाल्यावर कोरड्या, थंडीने उललेल्या नाकावर व्हॅसलीन लावतात. त्यांनाही पुन्हा एकदा विचार करावा लागेल. केवळ बाह्य वापरासाठी या उत्पादनाची शिफारस केली जाते, ज्यात नाकपुडीचा समावेश नाही. इतकेच काय, पेट्रोलियम जेली श्वासोच्छवासाच्या मार्गे नाकपुड्यांमधून सरकल्यास, एक दुर्मिळ पण भयानक संभाव्य समस्या उद्भवते. एक अमेरिकन डॉक्टर डट्टनर यांच्या म्हणण्यानुसार, 'जर पेट्रोलियम जेली फुफ्फुसांमध्ये गेली तर ते लिपिड न्यूमोनियास कारणीभूत ठरू शकते.' त्यांचं म्हणणं आहे की, 'चुकून एखाद्या वेळेस पेट्रोलियम जेली लावले गेले तर काही दुष्परिणाम होणार नाहीत. परंतु ज्यांनी रोजची सवय लावून घेतली आहे त्यांनी मात्र सावध व्हायला हवे.'

पेट्रोलियम जेली तरीही मोठ्या प्रमाणात का वापरली जाते?

बहुदा अतिवापराचे दुष्परिणाम बहुतेक लोकांना माहीतच नसतात. किंवा असा विचार केला जातो की फक्त दोनच महिने वापरले तर असं काय आभाळ कोसळणार आहे? पण याची सवय लागली की आपण वर्षभर वापरतो. कित्येकदा पेट्रोलियम जेली वापरून बनवलेली अनेक लोशन्स गोरे होण्यासाठी मदत करतात, अशीही जाहिरात केली जाते. मेकअपमध्ये बरीच रंग उजळवणारी जशी फाऊंडशन सारखी क्रीम ही यातच मिक्स करून लावली जातात. त्वरित अनुभूती आणि त्वचेचा ओलावा राखण्याची क्षमता आपल्या जेलमध्ये आहे हे दाखवून देणे ही फॉर्म्युलेशन बनवणाऱ्याची गरज असते. यासाठी पेट्रोलियम जेली हा एक स्वस्त मार्ग आहे.

जेव्हा आपण साबणाने आपली त्वचा धुतो तेव्हा त्वचेवरील नैसर्गिक तेले आपण धावून टाकतो. त्यामुळे पेट्रोलियम जेली योग्य प्रकारे वापरल्यास ती पोकळी भरून आणण्यास नक्कीच मदत करू शकते. परंतु हा प्रकार म्हणजे आपल्या त्वचेवर प्लास्टिकचा तुकडा ठेवण्यासारखे आहे. ते बाष्पीभवन रोखते. परंतु प्रत्येकजण वेगळा असतो, म्हणूनच आपली त्वचा कुठल्या प्रकारची आहे हे अभ्यासणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष वापरण्यापूर्वी व्हॅसलीन किंवा इतर पेट्रोलियम जेली-आधारित उत्पादनांवर आपली त्वचा कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे आहे. केवळ अनुष्का, दीपिका किंवा शाहरुख , शाहिद वापरतो म्हणून कोणतेही पेट्रोलीयम जेली असलेली उत्पादने वापरण्यात ,लगेच तिचा उपयोग करून तसेच दिसायचा प्रयत्न करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

पण आता तुम्ही म्हणाल, पेट्रोलियम जेलीबद्दल सगळं वाईट सांगून झालं पण काहीतरी उपाय तरी सांगा. मग नक्की वापरायचे काय? असा प्रश्न पडलाय ना..सांगते हो....

जरी आपण पेट्रोलियम जेली काढून टाकण्याचे ठरविले तर आपल्याला व्हॅसलीनची सुखदायक भावना गमावावी लागेल असे समजू नका. आपण एखाद्या नवीन आणि चांगल्या मॉइश्चरायझरचा शोध घेत असल्यास, फक्त अधिक नैसर्गिक पर्याय निवडा आणि घटकांची तपासणी करा. बीवॅक्स, खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, शिया बटर आणि कोका  बटर सीलमध्ये ओलावा असणारी उत्पादने पेट्रोलियम जेलीच्या इतकी धोकादायक ठरत नाहीत. लक्षात ठेवा की यापैकी सगळी उत्पादने त्वचेत शोषली जातात, म्हणून आपल्या शरीरात जात असतात. जसे आपण काही खाताना नीट पाहतो तसेच त्वचेला लावताना ही त्याचा अभ्यास करणेही तितकेच महत्वाचे आहे.

आता मॉल मध्ये किंवा मेडिकल मध्ये गेल्यावर, व्हासलीन दिसल्यावर तुम्हाला जाहिरातीतील नट्या ऐवजी बोभाटाचा लेख आठवेल.. हो ना?

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required