computer

जेव्हा ४०० लोक सलग ३ महिने चक्क मरेपर्यंत नाचतात...वाचा मध्ययुगातील 'डान्सिंग प्लेग'बद्दल !!

मंडळी, एखादं ढिंच्याक आणि झिंग झिंग झिंगाट गाणं लागलं की नाचायला न येणाऱ्याचे पायसुद्धा थिरकायला लागतात.  सॉलिड गाण्यावर सॉलिड डान्सपण हवा ना भाऊ!!! पण जर एखादा माणूस महिनोनमहिने नाचतच राहिला तर?? विश्वास बसण्यासारखी गोष्ट नसली तरी १००% खरी आहे! हे घडलं १५१८मध्ये म्हणजे तब्बल ५०० वर्षांपूर्वी!!  त्या वर्षी पवित्र रोमन साम्राज्यात(Holy Roman Empire) स्ट्रासबुर्ग ह्या शहरात ४०० लोक सलग तीन महिने नाचत होते!!! या प्रकाराला इतिहासात ‘डान्सिंग प्लेग’ ह्या नावाने ओळखलं जातं. नक्की काय आहे हा डान्सिंग प्लेग? काय झाले त्याचे परिणाम? काय होती त्यामागची कारणं? जाणून घेऊया आजच्या लेखात!!

काय घडलं??

सन १५१८ रोजी आत्ता फ्रान्समधे असलेल्या स्ट्रासबुर्ग शहरात ही घटना घडली. फ्राऊ ट्रॉफे ही महिला रस्त्यावर येऊन अचानक नाचायला लागली. खरं तर तिथे कोणतंही संगीत लावलेलं नव्हतं. तरीही ती बेफाम नृत्य करू लागली. आश्चर्याची बाब म्हणजे ती ४-६ दिवस न खातापिता आणि न झोपता अथक नाचत राहिली. परिणामी ह्याची मोठी साथच पसरली. आठवड्याअखेर ३४ लोक तिच्या नाचात सामील झाले आणि पुढे ही संख्या ४०० पर्यंत जाऊन पोहोचली!!!

परिणाम काय झाले??

ह्या अथक नाचाच्या वेडेपणापायी कित्येकजण आपापले जीव गमावून बसले!! पण वाईटातूनसुद्धा चांगलं निघतं असं म्हणतात. ह्या प्रकरणामुळे मानवी शरीराबाबतचं डॉक्टर्सचं कुतूहल वाढलं. त्यांच्या मते शरीरातलं रक्त गरम झाल्यापायी लोक असे वागू शकतात. अर्थातच ही थिअरी चुकीची होती, पण ह्यामुळे मानवी शरीराच्या अभ्यासावर भर देण्यात आला.

ह्यावर उपाय तरी काय नामी सुचवला होता!!! डॉक्टरांच्या मते अधिक नाचकाम केल्याने हा प्रॉब्लेम सुटू शकतो. म्हणून ह्या लोकांसाठी गाण्याबजावण्याची सोय करण्यात यावी असं डॉक्टरांनी सुचवलं. पण ह्यामुळे नाचाचं प्रमाण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढलं!! शेवटी हे वादळ जसं वेगाने आलं तसंच वेगाने निघूनही गेलं.

पण यासारखे अनेक प्रकार जगाच्या वेगवेगळ्या भागात घडत होते आणि अजूनही घडत आहेत. १९ व्या शतकात टॅरॅंटिसम ही संकल्पना इटलीमधे जोरात होती. टॅरॅंटुला नावाचा एक कोळी चावल्यावर लोक असेच नाचायला लागायचे. मग त्यांना शांत करायला वादक  बोलावले जायचे. त्यानंतर ती लोकं शांत व्हायची.

कारण काय??

(टॅरॅंटिसम) 

ह्याचं कारण आहे:  ‘कल्चर बेस्ड स्ट्रेस इंड्यूस्ड सायकॉसिस’. सहजसोप्या शब्दांत सांगायचं तर हा एक मानसिक आजार आहे. ह्या दोन्ही प्रकारांत असं आढळून आलं की पीडित लोकं ही दुष्काळ, साथीचे रोग, घरगुती हिंसा, अपमान ह्यांचे बळी होते. त्यामुळे स्वत:चं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी, लोकांचं लक्ष वेधण्यासाठी ती त्यांची धडपड होती. तसंच तो काळ अंधश्रद्धांचा होता. त्यामुळे त्यांच्या कृतींची कारणमीमांसा शोधण्याऐवजी त्यांचा उदोउदो झाला. त्यामुळे ह्या प्लेगचं कारण कोणताही जीवाणू विषाणू नसून एक मानसिक आजार आहे.

काय मग, कशी वाटली ही इतिहासातली अजब घटना? आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा!!

 

लेखक : प्रथमेश बिवलकर

सबस्क्राईब करा

* indicates required