computer

लहान मुलं का चावतात? मारणं-रागावणं नव्हे, तर या उपायांनी ते चावणं कमी करता येऊ शकतं!!

मुले म्हणजे देवा घरची फुले असे साने गुरुजी म्हणतात. लहान मुले आपल्या निरागस हास्याने सर्वांची मने जिंकून घेतात. त्यांच्यासोबत बोललेले बोबडे बोल आपल्याला आपल्या बालपणात नेतात. आपला सारा शीण त्यांच्या हसण्याने, बोलण्याने बडबडण्याने कुठच्या कुठे पळून जातो. पण, हीच मुले जेव्हा कडकडून चावा घेतात ना तेव्हा अक्षरश: जीव नकोसा होतो. कितीही लाडकं मूल असलं तरी दोन सणसणीत रट्टे ठेवून द्यावेसे वाटतात. ज्यांना नुकतेच दात यायला सुरुवात झालेली असते अशा सहा सात महिन्याच्या मुलांपासून ते साधारण तीन वर्षाच्या मुलापर्यंत ही सवय सर्रास आढळते. कधीकधी यामागची कारणे अतिशय साधी असतात, तर कधीकधी ती चिंता वाढवणारीही असतात. आजच्या या लेखातून आपण याच कारणांचा धांडोळा घेणार आहोत.

सहा महिन्यापासून मुलांचे दात यायला सुरुवात होते. यावेळी त्यांच्या हिरड्या सळसळत असतात त्यामुळे ते हातात येईल त्या वस्तूला चावण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तर या वयातील मुलांना चोखणी दिली जाते. पूर्वी लाकडाच्या चोखण्या दिल्या जात. आता नॉन-टॉक्झिक रबरपासून बनवलेल्या चोखण्या दिल्या जातात.

लहान मुले आपल्या भोवतालचा परिसर स्पर्श, चव, या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या खेळण्याला चावले तरी त्याची काही प्रतिक्रिया उमटत नाही, मात्र आई-बाबा किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना चावल्याने त्यांची प्रतिक्रिया लगेच उमटते. मात्र यातील फरक त्यांना कळत नाही. म्हणूनही ते चावण्याची कृती वारंवार करतात. त्यामुळे कुणाला तरी मुद्दाम इजा करावी म्हणून दुखवावे म्हणून ते मुद्दाम असे वागतात असे अजिबात नसते. त्यांच्या शिकण्याचाच तो एक भाग असतो. चोखणी किंवा रबरची खेळणी किंवा इतर कुठल्याही खेळण्याला चावल्याने त्याला इजा होत नाही, पण व्यक्तींचा चावा घेतल्याने त्यांना काहीतरी होते हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते हा प्रयोग सोडून देतात.

आज आपण कुणाचा तरी चावा घ्यायचाच असे काही तरी नियोजन करून ही मुले चावा घेत नसतात. कधी कधी त्यांच्याबाबतीत काही तरी अनपेक्षित घडलेले असते ज्यामुळे ते घाबरलेले किंवा चिडलेले किंवा दुखावलेले असतात. आपल्याकडे कोणी तरी लक्ष दिले पाहिजे ही भावना तीव्रतेने त्यांच्यात उमटते आणि अशावेळी ते जवळ असणाऱ्या व्यक्तीचा चावा घेतात. अगदी शिंक किंवा खोकला येणे ही जितकी प्रतिक्षिप्त क्रिया असते, तशीच ही देखील एक प्रतिक्षिप्त क्रिया असते, जी त्यांच्या मानसिक किंवा शारीरिक बदलामुळे घडून आलेली असते.

आपण चावल्याने समोरच्या व्यक्तीला वेदना होते हे लक्षात आल्यानंतरही कधीकधी काही मुले चावण्याची सवय सोडून देत नाहीत. मघाशीच आपण पहिले की सहा महिन्यापासून ते किमान तीन वर्षापर्यंतच्या मुलामध्ये ही सवय सर्रास आढळून येते. मग ज्या मुलाला चावल्याने व्यक्तीला इजा किंवा दुखापत होते हे कळते तरीही ती चावतात असे का? तर कधी कधी यामागे मानसिक तणाव, भीती, नैराश्य हे कारण असू शकते. खूप वेळ कुणीच लक्ष दिले नाही किंवा एखाद्या असुरक्षित वातावरणात सापडल्याची भावना निर्माण झाल्यास त्या भावनेतूनही ते चावा घेतात. त्यांना योग्य प्रकारे आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत, आपल्याला नेमके काय वाटते हे सांगता येत नाही तेव्हा ते आक्रमक होऊ शकतात.

एक ते तीन वर्षाचे मूल आजूबाजूच्या सामाजिक पर्यावरणाशी नुकते कुठे जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असे. अशावेळी त्याला काय अनुभव आला, त्याला कुणाबद्दल काय वाटले, कुठल्या व्यक्तीची घटनेची, प्रसंगाची त्याला भीती वाटली, कुठल्या गोष्टीमुळे नैराश्य आले, हे स्पष्टपणे बोलता येत नाही किंवा आपल्याला नेमके काय होतेय हेही त्याला कळत नाही. आपल्या भावनांचा नेमका अंदाज न आल्यास त्यांचा उद्रेक होतो, लहान मुलांच्या बाबतीतही हेच घडते. म्हणून त्यांचे रोजचे अनुभव सांगण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, ते कुतूहलाने ऐकून घेतले पाहिजे. आपल्याला त्यांच्या भावनांची कदर आहे, हे दाखवून दिले पाहिजे.

चिडण्यासारखे किंवा रागावण्यासारखे काय एवढे घडले हे आपल्याला कळणार नाही, पण त्या बाळाला अचानक तसे वाटू शकते. म्हणून या वयात मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ती आपल्या प्रिय व्यक्तीची, अशी व्यक्ती कायम सोबत असली पाहिजे असे त्यांना वाटते. अशावेळी आपण त्यांना काही तरी खाऊ-पिऊ घालून जबरदस्ती झोपवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्यांची त्यावेळची भावना दडपली जाते आणि पुढे कधी तरी ती पुन्हा उसळी मारून बाहेर येते. सद्य परिस्थितीचा ताण किंवा मागे घडलेल्या गोष्टींमुळे देखील मुले चावा घेऊन आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करू शकतात.

मुलं अनुकरणातून शिकतात. मोठी माणसं जे काही करतात ते सगळं त्यांना करून पाहायचं असतं, पण त्यांना एकतर ते जमत नाही किंवा करू दिलं जात नाही. त्यामुळे ती निराश होतात आणि या नैराश्यामुळेही ते आक्रमक होऊ शकतात.

मुलांच्या चावण्यामागे अशी वेगवेगळी कारणे असतात, म्हणून दरवेळी तुम्ही ते कारण समजून घेऊन मगच त्याची समजून काढली पाहिजे असं काही नाही. मूल ज्यावेळी चावण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. त्याला आवडेल तो खेळ त्यांच्यासोबत खेळा. तुम्ही त्यांच्यासोबत आहात, ही भावना त्याच्यात रूजली पाहिजे. त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा. कारण हसल्याने नकारात्मक भावनांची तीव्रता कमी होते. यासाठी एक ठराविक वेळ त्यांना द्या. दिवसातून अर्धा तास किंवा तुमच्या सोयीनुसार त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. त्याला वेळ दिल्याने त्यांची भावनिक गरज भागवली जाते.

मुलांना जे काही सांगावे वाटते ते ऐकून घ्या. त्यांचे ऐकले जाते, ही भावना त्यांच्यात सुरक्षितता निर्माण करते. त्यांचे ऐकून घेण्यासही वेळ द्या. पुन्हा कधी तुमच्या मुलाने तुम्हाला चावण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला सांगा की मी आता चावून घेणार नाही. त्याच्या पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवून त्याला आश्वस्त करा.

मारून, ओरडून शिक्षा देऊन त्यांची ही सवय सुटेल अशी अपेक्षा ठेवू नका आणि तसे वर्तनही करू नका. वयासोबत त्यांना काही गोष्टी कळत जातात आणि मागच्या गोष्टी सुटून जातात. त्यामुळे तो किंवा ती असाच दुराग्रही, हेकेखोर बनेल असा गैरसमज बाळगू नका. त्यांच्यात स्वतःबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण होईल असे शब्दही ऐकवू नका.

म्हणतात ना, वेळ हे एक उत्तम औषध आहे. म्हणूनच संयम ठेवून वागल्यास सगळे काही सुरळीत होईल.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required