computer

अन्नात शिसे आढळल्यावर घबराट का पसरते ? शिसे आपल्या शरीरासाठी घातक का आहे ??

मे २०१५ साली उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील ‘मॅगी’च्या नमुन्यांमध्ये अजिनोमोटो आणि शिसं आढळलं होतं. या नमुन्यांमध्ये दोन्ही घटकांचं प्रमाण FSSAI ने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा जास्त होतं. यापैकी शिसं हे प्रमाणापेक्षा १७ टक्क्यांनी जास्त होतं.

या एका घटनेने मॅगीवर मोठं संकट आलं होतं. नेस्ले कंपनीने देशभरातून मॅगी परत मागवली होती. शासनाने मॅगीवर बंदी पण आणली. नेस्ले कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला होता.

हे झालं मोठं उदाहरण. अधूनमधून अन्नात शिसं आढळल्याच्या लहानसहान बातम्या येतच असतात. २०१७ साली कलकत्याच्या रस्त्यांवर मिळणाऱ्या भाजीपाल्यात शिसं आढळलं होतं. एवढंच नाही तर मासे, मटण, बिस्कीट यातसुद्धा शिसं मिळालं होतं.

अन्नात शिसं मिळाल्यास का गहजब होतो हे तज्ञांना माहित असतंच, पण सामान्य माणसाला याबद्दल काहीच माहित नसतं. त्यामुळेच तर मॅगीत शिसं आढळल्यावर भारतातल्या सामान्य माणसावर त्याचा फारसा फरक जाणवला नाही. उलट लोकांनी मॅगी चांगली असल्याचं म्हटलं.

तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत ह्या शिसे प्रकरणाबद्दल. शिसं आपल्या शरीरासाठी घातक का आहे? ते आपल्या शरीरात कसं जातं आणि शिसं अन्नात येतं तरी कुठून? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत.

सुरुवात करुया शिसं अन्नात येतं कुठून या प्रश्नापासून.

शिसं हे पाण्यातून आणि अन्नातून अशा दोन्ही मार्गाने आपल्या पोटात जातं. दूषित पाण्यात शिसं असण्याची दाट शक्यता असते. पाण्यात आढळणारं शिसं हे बऱ्याचदा पाणी वाहून नेणाऱ्या पाईपमधून आलेलं असतं. पाईपला लावलेल्या फिटिंग्ज अनेकदा शिशापासून बनलेल्या असतात. अन्नाचं म्हणाल तर अन्नात शिसं मातीतून येतं.

शिसं हे खनिज आहे त्यामुळे ते मातीत सहज आढळतं. ज्या मातीत शिसं आहे त्या मातीत झाड असेल तर त्या झाडाकडून शिसं शोषलं जातं. आपल्या रोजच्या जेवणातल्या भाज्या, फळे, मसाल्याचे पदार्थ यांच्यात अशा प्रकारे शिसं येतं.

अन्नपदार्थात शोषलं गेलेलं शिसं पूर्णपणे काढून टाकता येत नाही. पण एका ठराविक प्रमाणात शिशाचं प्रमाण अन्नपदार्थात चालतं. मित्रांनो, ही समस्या फक्त शाकाहारी लोकांची आहे असं समजू नका. बकऱ्या, कोंबड्या जे अन्न खातात त्यांच्यात जर शिसं असेल तर ते त्यांच्या शरीरात जमा होतं. आणि जेव्हा आपण त्यांना खातो तेव्हा तेच शिसं आपल्या शरीरात दाखल होतं.

आता समजून घेऊया शिशाची एवढी दहशत का आहे ते...

आपल्या विशिष्ट शरीररचनेमुळे कोणताही विषारी घटक आपल्या शरीरात फार काळ टिकून राहत नाही. मलमूत्राद्वारे किंवा चयापचय क्रियेद्वारे हे विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात. पण शिशाच्या बाबतीत आपलं शरीर काहीच करू शकत नाही. शिसं बाहेर फेकण्याची कोणतीच व्यवस्था माणसाच्या शरीरात नसते. त्यामुळे शिसं आपल्या शरीरातच राहतं आणि जीवघेण्या समस्या उभ्या होतात.

शिसं शरीरात गेल्यानंतर सुरुवातीला रक्तप्रवाहात मिसळतं. रक्ताद्वारे ते वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचतं. स्नायूंपासून ते आपल्या मेंदूपर्यंत त्याचा प्रवास होतो. यापैकी काही भाग हा हाडांमध्ये जमा होतो. हाडामध्ये जमा झालेलं शिसं हे जन्मभर आपल्यासोबत राहतं.

शिसं घातक असल्याचं मोठं कारण म्हणजे ते शरीरातील उत्प्रेरकांच्या कामात अडथळा आणतं. या कारणाने मान, कंबर, गुढगे यांचं दुखणं सुरु होतं. शरीरातील महत्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊन उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष दोघांमधली प्रजननक्षमता कमी होत जाते. रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीवर प्रतिबंध लागतो. मेंदूच्या कार्यात अडथळे येऊन कधीही न भरून निघणारं नुकसान होतं.

मेंदूचं एकूण कार्य हे मेंदूच्या पेशींचा एकमेकांशी होणाऱ्या संपर्कातून होत असतं. शिसं जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचतं तेव्हा दोन पेशींच्या संपर्कात अडथळा यायला सुरुवात होते.

तसं बघायला गेलं तर शिसं सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी घातक आहे, पण तरुणांसाठी ते सर्वात जास्त घातक आहे, कारण तरुण वयात मेंदूची वाढ होत असते. या वयात होणारे बदल हे जन्मभर राहतात. मेंदूच्या कार्यातील अडचणींमुळे मेंदूची योग्य वाढ होत नाही. अपुऱ्या वाढीमुळे मुलांचा बुध्यांक कमी होतो, तसेच शैक्षणिक प्रगतीवर त्याचा परिणाम दिसून येतो.

उपाय काय आहेत ?

रक्तातील शिशाचं प्रमाण वाढलं असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी ‘किलीशन’ उपचार पद्धती वापरली जाते. ही वेळ येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो ते आता पाहूया.

१. घराला लावण्यात येणाऱ्या रंगात शिसं आढळतं. घराला नवीन रंग लावताना त्यात शिसं आहे का हे तपासून घेतलेलं कधीही सोयीचं. घरात जर लहान मूल असेल तर ही काळजी घ्यायलाच पाहिजे. रंग बनवण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा वापर करण्यात आला आहे याच्या यादीत तुम्हाला Lead म्हणजे शिसं लिहिलेलं आढळेल.

२. लहान मुलांचा आणि जमिनीचा संपर्क येत असतो. त्यामुळे घरातली फरशी स्वच्छ आहे ना याची काळजी घ्यावी. मुलं मातीत खेळताना माती तोंडात टाकतात, त्याकडेही लक्ष द्यावे.

३. पाण्याचा पाईप फुटला असेल तर तो वेळच्यावेळी दुरुस्त करून घ्यावा. बऱ्याचदा पाण्याच्या पाईपला जोडणारं फिटिंग हे शिशाचं बनलेलं असतं. अशा पाईपमधून येणारं पाणी गाळून प्यावं.

तर मंडळी, अन्नपदार्थात शिसं आढळणे म्हणजे अन्नात विष असल्यासारखंच असतं. म्हणून यापुढे जर कोणत्याही पदार्थात शिसं आहे असं वाचलंत तर सावध राहा.

सबस्क्राईब करा

* indicates required