computer

काही कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह असूनही निगेटिव्ह का येत आहे ?

COVID-19 आजाराबद्द्ल अजूनही पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. हा आजार नवीन असलेल्याने रोज नवनवीन गोष्टी उलगडत आहेत. सध्या अशी बातमी येत आहे की COVID-19 च्या चाचणीत आधी निगेटिव्ह आलेले रुग्ण आता पॉझिटिव्ह असल्याचं आढळत आहे.
हे कसं शक्य झालं हे समजून घेण्यासाठी आधी आपण COVID-19 ची चाचणी कशी होते ते समजून घेऊया..

COVID-19 ची चाचणी

COVID-19 च्या चाचणीत नाकपुड्यांच्या आतील पेशींचा नमुना घेतला जातो. या पेशी COVID-19 आजाराने ग्रस्त आहेत का हे तपासलं जातं. तसेच कोरोना विषाणूचा RNA या पेशींवर आढळतो का हे तपासलं जातं. 
यासाठी रिव्हर्स-ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेझ चेन रिॲक्शन ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत RNA चं रुपांतर DNA मध्ये केलं जातं. यानंतर DNAच्या लाखो प्रती बनवल्या जातात. या मोठ्या प्रमाणातल्या DNAच्या संख्येमुळे कोरोना विषाणू त्यात आहे की नाही हे शोधणं सोप्पं जातं. चाचणीत जर कोरोना विषाणू आढळून आला तर ती चाचणी पॉझिटिव्ह म्हणून घोषित करण्यात येते.

COVID-19 ची चाचणी चुकीची ठरू शकते का ?

COVID-19 च्या चाचणीतून चुकीची माहिती मिळण्याची शक्यताही असते. जर चाचणीसाठी नमुने योग्यरीतीने गोळा केलेले नसतील तर चुकीचा निकाल मिळू शकतो. जर चाचणीच्यावेळी रुग्णात कोणतेही लक्षण दिसत नसतील तर अशावेळी निकाल निगेटिव्ह येऊ शकतो. बरेचदा कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर लगेचच तपासणी केल्यास निकाल निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. याचा अर्थ शरीरात विषाणू असतो पण तो चाचणीत दिसण्याएवढा पसरलेला नसतो. काहीवेळा फारच उशिरा चाचणी केल्यासही निकाल चुकीचा येऊ शकतो.

 

ही झाली चाचणी आणि त्यासंदर्भातील कारणे. पण याखेरीजही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कोरोना विषाणू वैद्यकीय क्षेत्रासाठी नवीन आहे. त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळालेली नाही. करोनाग्रस्त रुग्ण आणि करोना विषाणूवर होणाऱ्या अभ्यासातून नवनवीन माहिती येत आहे. या आधारावर आजाराशी लढण्यासाठी आणि चाचणीत सुधारणा करण्यासाठी नवनवे प्रयत्न होत आहेत. 
तर मंडळी, एकंदरीत कोरोनाशी लढा आणि त्याचा अभ्यास अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी युद्धपातळीवर सुरु आहेत. लवकरच आपण कोरोनावर पूर्ण विजय मिळवलेला असेल. तोवर घरीच राहा आणि सुरक्षित राहा.

सबस्क्राईब करा

* indicates required