computer

काही पुरुषांचे आवाज बायकी का असतात? जाणून घ्या शास्त्र त्याबद्दल काय म्हणतं?

फोनवर अनोळखी व्यक्तीशी बोलताना आवाजावरून ती बाई आहे असं वाटलं आणि पुढच्या संभाषणात तो खरंतर पुरुष होता हे लक्षात आलंय असं कधी झालंय तुमच्या बाबतीत?

असं बरेचदा होतं आणि त्यामुळं बरेच घोळही होतात. तुम्ही आजूबाजूच्या लोकांचे बोलणे नीट लक्ष देऊन ऐकले तर तर तुम्हाला लक्षात येईल की काही पुरुषांचा आवाज हा स्त्रियांसारखा म्हणजेच बायकी आहे. ऐकायला विचित्र वाटेल परंतु हे सत्य आहे. काही पुरुषांमध्ये पौगंडावस्थेतील हाय पिच आवाजात योग्य ते बदल न झाल्यामुळे त्यांचा आवाज स्त्रियांसारखा येतो. याला शास्त्रीय भाषेत प्युबरफोनिया असं म्हणतात.

प्युबरफोनिया कोणाला होतो?

प्युबरफोनिया शक्यतो पुरुषांना होतो. काही स्त्रियांमध्येदेखील हाय पिच आवाजाची समस्या असते परंतु शक्यतो ती जाणवत नाही. पुरुषांमध्ये मात्र ती जाणवते.

प्युबरफोनियाची लक्षणे

प्युबरफोनिया असलेल्या व्यक्तीचा आवाज हा किनरा म्हणजेच हाय पिचमध्ये असतो. जेव्हा पुरुषांमध्ये आवाजाची वारंवारता (frequency) 120 Hertz आणि स्त्रियांमध्ये 210 Hertz पेक्षा जास्त असते तेव्हा त्या व्यक्तीला प्युबरफोनिया झाला असं समजण्यात येतं. या किनरेपणामुळे फोनवर बोलताना पुरुषाचा आवाज हमखास स्त्रीचा वाटतो.
मोठ्या आवाजात बोलताना त्रास होणे तसेच दीर्घकाळ बोलताना थकवा जाणवणे हीसुद्धा प्युबरफोनियाची लक्षणे आहेत.

प्युबरफोनिया कसा होतो?

प्युबरफोनिया कसा होतो हे समजण्यासाठी आधी आपल्याला आवाज कसा तयार होतो हे समजून घ्यावं लागेल.

आपल्या गळयामध्ये स्वरतंतू म्हणजेच व्होकल कॉर्ड नावाचा एक अवयव असतो. स्वरतंतूंच्या कंपनांतून (व्हायब्रेशन) आवाज उत्पन्न होतो. या स्वरतंतूंच्या लांबी आणि रुंदीचा आवाजावर परिणाम होत असतो. स्वरतंतूंची लांबी रुंदी जेवढी कमी, तेवढी आवाजाची वारंवारता जास्त आणि स्वरतंतूंची लांबी रुंदी जेवढी जास्त, तेवढी आवाजाची वारंवारता कमी असते.

लहान मुलामुलींमध्ये या स्वरतंतूंची लांबी जवळपास २ मिमी असते. त्यामुळे लहान मुलांचा आवाज हा हाय पिचचा म्हणून गणला जातो. त्याची वारंवारता 300 Hertz असते. पौगंडावस्थेत मुलामुलींच्या शारीरिक बदलानुसार त्यांच्या स्वरतंतूंची लांबी बदलत जाते. त्या वयोगटात वर्षभरात स्त्रियांची व्होकल कॉर्ड ०.४ मिलीमीटरने, तर पुरुषांचे स्वरतंतू ०.७ मिलिमीटरने वाढतात. स्त्रियांच्या आवाजाची मूलभूत वारंवारता ही जवळपास २१० Hertz असते तर पुरुषांची जवळपास १२० Hertz.

पौगंडावस्थेत व्यक्तीच्या स्वरतंतूंमध्ये काही बदल होतात. त्यानुसार व्यक्तीच्या आवाजात बदल होतो. परंतु हा बदल जर झालाच नाही तर त्या व्यक्तीला प्युबरफोनिया होतो.

प्युबरफोनिया होण्याची कारणे

शारीरिक कारणे- ऐकण्याचा त्रास असेल तर किंवा स्वरतंतूं पॅरालिसिस. व्होकल कॉर्ड नॉड्यूल हे ही प्युबरफोनिया होण्याचं एक कारण असू शकतं. नोड्यूल किंवा पॉलीप ही स्वरतंतूवर झालेली वाढ असते. ही कॅन्सर नसते. पण त्यामुळे आवाजाचा पिच (पट्टी) बदलते. परिणामी आवाज मध्येच घोगरा येणे, बोलताना दम लागणे असे होऊ शकते.

मानसिक कारणे - पौगंडावस्थेत आवाजात बदल झाल्यामुळे काही मुलांना नैराश्य येते. याचाच परिणाम पुन्हा त्यांच्या आवाजावर होऊन त्यांचा आवाज हाय पिचमध्येच राहतो.

उपचार

सुरुवातीला तज्ज्ञांकडून रुग्णाच्या स्वरतंतूंची पाहणी केली जाते. रुग्णाला प्युबरफोनिया झाला आहे याची खात्री झाल्यानंतर त्याला स्पीच लँग्वेज थेरपीस्ट(SLP)कडे पाठवण्यात येते.
स्पीच लँग्वेज थेरपीस्ट हा आपल्या फिजीओ थेरपीस्टसारखे काम करतो. आवाजाचा पोत, पट्टी, अनुनाद यावर कसा ताबा ठेवायचा याचे ट्रेनिंग देणे हे त्याचे काम असते.

व्हॉईस थेरपी/ स्वर उपचार

SLP म्हणजेच स्पीच लँग्वेज थेरपीस्टद्वारे रुग्णाला स्वरतंतूंचे कार्य समजावून देणे, स्वतःची पिच(आवाजाची पट्टी) क्वालिटी विकसित करण्यास मदत करणे, तसेच रुग्णाला हवा असलेला व्हॉईस पिच विकसित करण्यास मदत करणे इत्यादी उपचार केले जातात. रुग्णाची व्हॉईस पिच कमी करणे हे SLP चे अंतिम उद्दिष्ट्य असते.

मेडिकल उपचार

बोटॉक्स इंजेक्शन - हे इंजेक्शन गळ्यातील आवाज निर्माण करणाऱ्या विशिष्ट स्नायूंना दिले जाते. यामुळे स्नायू शिथिल होण्यास मदत होते.

शस्त्रक्रिया -

वरील सर्व उपचार करून देखील जर अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत तर रुग्णावर शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया इशिकी टाईप 3 रिलॅक्शेशन थायरोप्लास्टी म्हणून ओळखली जाते. नोबोहिची इशिकी हा फोनोसर्जरीचा तज्ञ आहे. म्हणून अशा सर्जरींना इशिकी हे नाव देण्यात आले आहे.

वाचकहो, आवाज पुरुषी असणं किंवा बायकी असणं हा काही गुन्हा नाही. कधी तो उपचाराने बदलता येतो आणि कधी उपचारांचा उपयोग होत नाही. पण त्यामागे शास्त्रीय कारण काय असू शकेल, किंबहुना प्रत्येक गोष्टीमागचं शास्त्रीय कारण काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता मात्र हवी. खरं ना?

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required