computer

अमेरिकन सिव्हिल युद्धातील जखमी सैनिक अंधारात चमकत होते! १३९ वर्षांनी उलगडलं यामागील रहस्य

युद्धाशी निगडीत कितीतरी कथा आजपर्यंत तुम्ही वाचल्या असतील. अमेरिकन यादवी युद्धाच्यावेळीही युद्धभूमीवरील काही घडामोडींशी अशाच कथा जोडल्या गेल्या होत्या. याच यादवी युद्धाच्या वेळी १८६२ साली शिलॉह युद्ध घडले. या युद्धाच्या वेळी एका घटनेमागचे रहस्य कित्येक वर्षे उलगडलेच गेले नव्हते. आता सुमारे १३९ वर्षानंतर शालेय प्रोजेक्टवर अभ्यास करणाऱ्या एका मुलाने या कथेमागचे रहस्य उलगडून दाखवले आहे. आता पाहूया हे रहस्य काय होते आणि त्यामागचा उलगडा कसा झाला.

अमेरिकेत १८६१ ते १८६५या दरम्यान यादवी युद्ध घडले. युद्धाचे मुख्य कारण गुलामगिरीचे समर्थन करणारी राज्ये आणि विरोधातल्या राज्यांत मधले मतभेद होते. जनरल युलीसेसच्या नेतृत्वाखालील युनियनच्या सैन्याने मिसिसिपीवर हल्ला केला. तो हल्ला थोपवण्यासाठी जनरल अल्बर्ट सिडनी जॉन्स्टन मैदानात उतरला. या युद्धात दोन्ही कडील सुमारे २०,००० सैनिकांचा बळी गेला. ७ एप्रिल १८६२ रोजी या युद्धाला पूर्णविराम मिळाला. या शिहॉल युद्धात जखमी झालेल्या काही सैनिकांच्या बाबतीत एक चमत्कार घडला होता. या युद्धात जखमी झालेल्या काही सैनिकांच्या जखमा अचानक चमकू लागल्या होत्या. युद्ध संपल्यानंतर या सैनिकांना उपचार मिळण्यास दोन दिवसांचा अवधी जावा लागला होता. या दोन दिवसांत काही सैनिकांच्या जखमा अचानक चमकू लागल्या आणि ज्या सैनिकांच्या जखमा चमकत होत्या त्या आश्चर्यकारक पद्धतीने भरून आल्या होत्या. याउलट ज्या सैनिकांच्या जखमा अशा चमकत नव्हत्या त्यांच्या जखमा भरून येण्यास थोडी वाट पहावी लागली होती. ज्या सैनिकांच्या जखमा चमकत होत्या ते लवकर बरे झाले आणि त्यांचा असा समज झाला की आपल्याला देवदूताचे आशीर्वाद लाभले म्हणूनच आपण लवकर ठणठणीत बरे झालो. नेहमीप्रमाणे ज्या गोष्टीचे शास्त्रीय स्पष्टीकरण सापडत नाही त्या गोष्टीभोवती काही तरी दंतकथा रचल्या जातातच, तशाच अँजल्स ग्लोभोवतीही अशा अनेक दंतकथा रचण्यात आल्याचे दिसून येते.

जखमा चमकवण्याच्या या प्रक्रियेलाच तेव्हा ‘एंजेल्स ग्लो’ म्हटले गेले. त्यावेळी कुणी याच्या मुळाशी जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यानंतर एका २००१ मध्ये एका १७ वर्षाच्या मुलाने आपला हायस्कूल प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी शिहॉल युद्धातील या अँजल्स ग्लो वर अभ्यास करण्याचे ठरवले. या मुलाचे नाव होते बिल मार्टिन. बिलची आई फिलीस ही एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहे. बिल, त्याची आई, फिलीस आणि त्याचा मित्र जोनाथन कर्टीस यांनी याच विषयावर प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांनी अंधारात चमकतील अशा जीवाणूंची एक यादी बनवायला सुरुवात केली. त्यानंतर या यादीतील एखादा सूक्ष्म जीव १८६२चे शिलॉह युद्ध ज्या परिसरात लढले गेले तिथे सापडतात का? याची चाचपणी केली.

त्यांना असे आढळून आले की शिलॉहच्या त्या परिसरात आढळणाऱ्या एका अळीमध्ये बायोल्युमिसेंट नावाचा जंतू आढळतो. शिलोह परिसरातील मातीत या ज्या प्रकारच्या आळ्या सापडतात त्या आळ्यामध्ये नेमाटोड नावाचे जंत शिरकाव करतात. या जंतामध्ये फोटोरॅब्जस ल्युमिनेसन्स प्रकारचे जीवाणू आढळतात.
नेमोटोड एकदा का अळीमध्ये शिरले की तिथे त्यांच्या उलटीद्वारे हे जीवाणू त्या अळीच्या शरीरात प्रवेश करतात आणि ती अळी मरून जाते. मग हे जीवाणू तिथल्या मातीत प्रवेश करतात. या जीवाणूच्या शरीरातून एक चिकट आणि फिकट हिरव्या रंगाचा द्रव स्रवतो. हा स्राव चमकदार असतो. जेव्हा हे नेमाटोड एका अळीला संपवतात तेव्हा ते आजूबाजूला असेच काही दुसरे सावज मिळते का त्याच्या शोधात असतात.

हा जीवाणू चमकदार हिरवा द्राव तर स्त्रवतोच. पण जिथे हा जीवाणू असेल तिथे तो दुसऱ्या कुठल्याही जीवाणूला तो तग धरू देत नाही. ज्याप्रकारे तो आपला सावज संपवतो त्याचप्रकारे आजूबाजूला असणारे इतर सूक्ष्मजीवही संपवून टाकतो. म्हणूनच ज्या सैनिकांच्या जखमेवर अँजल्स ग्लो दिसून आला त्या सैनिकांच्या जखमा लगेच भरून आल्या. कारण त्या जखमेत इतर हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीची शक्यताच नव्हती.

शिहॉलच्या त्या परिसरात अशाप्रकारचा सूक्ष्म जीव आढळत असला तरी त्याच्या वाढीसाठी लागणारे तापमान हे मानवी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा खूपच कमी असावे लागते. ज्या काळात हे युद्ध लढले गेले ते थंडीचे दिवस होते. युद्ध संपल्यानंतर पुढील वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तशा कडाक्याच्या थंडीतच हे सैनिक कुडकुडत होते. नदीच्या परिसरात तर तापमान तर अजूनच कमी होते.

हवेतील गारवा आणि जमिनीतील ओलावा यामुळे सैनिकांच्या शरीराचे तापमान खालावले होते. त्यातच त्याच्या जखमांना ओली माती लागल्यानंतर या सूक्ष्मजंतूनी त्यांच्या शरीरात प्रवेश केला. सैनिकांच्या शरीराचे तापमान खालावले असल्याने त्या जखमांत या सूक्ष्मजंतूची वाढ होण्यास मदत झाली. रात्रभर या जंतूनी आपल्या शरीरातील द्राव त्या जखमेत स्त्रावल्यानेच जखमा फिकट हिरव्या रंगाने चमकत होत्या. शिवाय आपल्या नैसर्गिक गुणधर्मानुसार यांनी आजूबाजूचे सूक्ष्मजीवही संपवून टाकले ज्यामुळे त्या सैनिकांच्या जखमांतील हानिकारक सूक्ष्मजंतूंची वाढ अपोआपच रोखली गेली. म्हणूनच त्या सैनिकांच्या जखमा लवकर भरून आल्या.

मार्टीस आणि कर्टीस यांनी पी. ल्युमीनिसन्स आणि अँजल्स ग्लो यांच्यातील हा सहसंबंध आपल्या अभ्यासातून उलगडून दाखवला. २००१ सालच्या इंटेल इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनियरिंग फेअर मध्ये त्यांच्या या शोधनिबंधाला प्रथम क्रमांक मिळाला होता.

आपल्याला देवदूतांनी वाचवले असा जरी त्यावेळी त्या सैनिकांचा समज झाला होता देवदूत म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून मातीत लपलेले हे सूक्ष्मजीवच नाही का?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required