computer

सर्वात मोठा कॅमेरा ट्रॅप.. भारतातल्या वाघांवरच्या सर्वेक्षणाची गिनिज बुकमध्ये नोंद!! वाचा नेमकं काय घडलंय...

जगभरातल्या वाघांच्या घटत्या संख्येच्या समस्येवर २०१० मध्ये रशियामध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. या परिषदेत २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी 'ग्लोबल टायगर रिकव्हरी प्रोग्रॅम' आखला गेला. पण आपल्या देशानं हे उद्दिष्ट चार वर्षे आधीच गाठलंय. २०१८ मध्ये झालेल्या वाघांच्या गणतीतून ही बाब समोर‌ आलीये. फेब्रुवारी २०१० च्या गणतीनुसार त्यावेळची भारतातील वाघांची संख्या ही १४११ होती. २०१८ मध्ये झालेल्या नव्या गणतीनुसार आता ती २९६७ इतकी वाढलीये. अभिमानास्पद गोष्ट म्हणजे जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ हे भारतात आहेत!

एकंदरीत भारत सरकारनं‌ हाती घेतलेला व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणाचा कार्यक्रम यशस्वी होताना‌ दिसतोय. पण हे सर्वेक्षण आणखी एका बातमीमुळं चर्चेत आलंय. गिनीज बुकनं या सर्वेक्षणाची दखल घेतलीय ती आतापर्यंत झालेला जगातला सर्वात मोठा सर्व्हे म्हणून!

द ऑल‌ इंडिया टायगर एस्टिमेशनतर्फे १ लाख २१ हजार ३३७ वर्ग किलोमीटर्स क्षेत्रात हा सर्व्हे केला गेलाय. या सर्वेक्षणात तब्बल २६ हजार ८३८ जागांवर‌‌ कॅमेरा ट्रॅप बसवलेले होते. हे कॅमेरे मोशन सेन्सरयुक्त असल्यानं कोणत्याही जनावराची हालचाल झाल्यास ते रेकॉर्डिंग सुरू करत असत. या कॅमेऱ्यांमधून वन्यजीवांची ३ कोटी ४८ लाख ५८ हजार ६२३ छायाचित्रं टिपली गेली आहेत. यापैकी ७६ हजार ६५१ फोटो हे वाघांचे, तर ५१ हजार ७७७ फोटो बिबट्यांचे‌ होते. यात २४६१ वाघांची (बछड्यांना सोडून) ओळख स्ट्राईप पॅटर्न रिकॉग्निशन सॉफ्टवेअर वापरून करण्यात आलीय. ‌"

गिनीज बुकनं वेबसाईटवरती प्रकाशित केलेल्या प्रशस्तीपत्रात या आकडेवारीचा उल्लेख करत वापरलेली संसाधनं आणि आणि सर्व्हेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतचा हा सर्वात व्यापक सर्व्हे असल्याचं सांगितलंय. भारतासाठी हा एक महान क्षण असल्याचं सांगत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required