computer

भारतातील सर्वाधिक फी घेणारे वकील राम जेठमलानी यांनी हाताळलेल्या १० महत्वाच्या केसेस !!

कायदेक्षेत्रातील ७० हून अधिक वर्षाची कारकीर्द संपवून काल जेठमलानी देवाघरी गेले आहेत. पापपुण्याचा हिशोब ठेवणाऱ्या चित्रगुप्तासमोर जेव्हा जेठमलानी उभे राहतील तेव्हा आम्हाला खात्री आहे की चित्रगुप्ताला सुद्धा त्याची कलमं बराच विचार करून जेठमलानींसमोर मांडावी लागतील. कारण सुनवाई पूर्ण होईपर्यंत जेठमलानींनी बहुतेक आरोप आरोपच नाहीत हे सिद्ध केले असतील. असा दरारा होता जेठमलानी यांचा.

चला तर आज जाणून घेऊया राम जेठमलानी यांनी हाताळलेल्या १० महत्वाच्या केसेस.

१. नानावटी खून खटला.

या खून खटल्यावर आधारित रुस्तम सिनेमा तुम्ही बघितला असेलच. या सिनेमात सचिन खेडेकर यांनी साकारलेलं लक्ष्मण खंगानी हे पात्र राम जेठमलानी यांच्यावर आधारित होतं. 

राम जेठमलानी यांनी फाळणीनंतर कराची येथून आपली वकिली मुंबईत हलवली होती. त्यावेळी हा खून खटला घडला. ही त्यांची पहिली केस. याच केसने त्यांना प्रसिद्धी झोतात आणलं.

नौदलात असलेल्या के एम नानावटीने प्रेम आहुजा या आपल्या पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची ही घटना होती. त्यावेळी या केसने देशभर वादळ उठवलं होतं. दोन्ही बाजू लोकांसमोर होत्या, पण प्रेम  अहुजाचा खून झाला असला तरी सगळी जनता नानावटीच्या बाजूने होती.

प्रेम आहुजाच्या बहिणीने जेठमलानी यांच्या हातात खटल्याची सूत्र दिली होती. जेठमलानींनी प्रेम आहुजाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांच्या फौजेचं नेतृत्व केलं आणि केस जिंकली. या केसने त्यावेळी महत्वाच्या असलेल्या ज्युरी पद्धतीच्या न्यायव्यवस्थेला रद्द काढण्यात आलं. याचं कारण म्हणजे ज्युरीवर जनमताचा प्रभाव पडत आहे असं दिसून आलं होतं.

२. आणीबाणीला विरोध

राम जेठमलानी हे सुरुवातीपासून आणीबाणीच्या (१९७५) विरोधात होते. केरळच्या पालघाट जिल्ह्यातील वकिलांच्या एका सभेत त्यांनी सर्वांसमोर आपला विरोध बोलून दाखवला होता. यानंतर त्यांच्यासाठी अटक वॉरंट निघालं, पण नानी पालखीवाला यांच्या नेतृत्वाखाली ३०० वकील जेठमलानी यांच्या बाजूने उतरले आणि जेठमलानी यांची अटक स्थगित झाली. हे काही काळापुरतंच. गाजलेल्या ए.डी.एम जबलपूर केसमध्ये कोर्टाने आणीबाणीच्या काळात कोणीही कोर्टात आपल्या स्वातंत्र्यासाठी न्याय मागू शकत नाही असा फैसला सुनावल्यानंतर जेठमलानी यांना देश सोडून जावं लागलं होतं. ते कॅनडात गेले आणि तिथून त्यांनी आपला विरोध सुरूच ठेवला.

३. इंदिरा गांधी खून खटला.

इंदिरा गांधी खुनाचा कट रचणारे बलबीर सिंग आणि केहर सिंग यांच्या बाजूने राम जेठमलानी लढले होते. ही केस हातात घेतल्याबद्दल लोकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. यावर उत्तर देताना ते म्हणाले की “मी वकीलाचं कर्तव्य निभावत होतो.”

या खटल्याच्या शेवटी बलबीर सिंगला निर्दोष सोडण्यात आलं, तर केहर सिंगला फाशी देण्यात आली.

३. राजीव गांधी खून खटला.

राजीव गांधी हत्येतील आरोपी संथन, मुरुगन आणि पेरारीवलन यांच्या बाजूने जेठमलानी लढले होते. तिघांनाही फाशीची शिक्षा होणार होती, पण जेठमलानी यांनी प्रतिवाद करताना म्हटलं की “फाशीची शिक्षा देण्यास उशीर झाला आहे, त्यामुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी”. २०१४ साली त्यांच्या मागणीला यश आलं. कोर्टाने तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा दिली. शिक्षा सुनावताना हेही नमूद करण्यात आलं की जन्मठेप म्हणजे त्यांना आजन्म कैदेत राहावं लागेल.

४. शेअर बाजार घोटाळा.

हर्षद मेहताने १९९० साली जो शेअर मार्केटमध्ये घोटाळा करून ठेवला होता त्या खटल्यात जेठमलानी हर्षद मेहताच्या बाजूने लढले होते. खटल्याच्या निकाली मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने हर्षद मेहताला दोषी ठरवलं. त्याने एकूण ४९९९ कोटी रुपयांचां घोटाळा केला होता.

६. संसदेवरील हल्ल्याचा खटला.

२००१ साली भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात एस. ए. आर. गिलानी याला दोषी ठरवण्यात आलं होतं. या हल्ल्याच्यापाठी त्याचाच मेंदू असल्याचा त्याच्यावर आरोप होता. जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात गिलानीची बाजू लढवली होती. गिलानीला ट्रायल कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा दिली, पण वरच्या कोर्टातील सुनावणीत त्याला निर्दोष सोडण्यात आलं. याचं श्रेय अर्थातच जेठमलानी यांना जातं.

७. जयललिता आणि बेकायदा मालमता प्रकरण

जेठमलानी यांनी जयललिता यांची बाजू सुद्धा लढवली होती. जयललितांना बेकायदा मालमत्तेसाठी दोषी  धरण्यात आलं होतं. जयललिता आणि त्यांच्या मदतनीस शशिकला यांच्यावर खटला चालला. २०१६ साली जयललिता यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावरचा खटला संपुष्टात आला, पण शशिकला यांना या प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलं.

८. जेसिका लाल केस

१९९ साली मॉडेल जेसिका लाल खून खटल्यातील आरोपी मनु शर्मा याच्याबाजुने जेठमलानी खटला लढले होते. यावेळी पण त्यांना लोकांचा रोष पत्करावा लागला होता. माध्यमं आणि लोकांचा एकत्र राग ओढवून त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात आरोपीची बाजू धरून ठेवली होती. ट्रायल कोर्टाने शर्माला २००६ साली दोषी ठरवलं होतं. एका गुप्त तपासात असं समजलं की साक्षीदारांवर दबाव आणला जात आहे. त्यानंतर  हायकोर्टाने खटला पुन्हा चालवण्याचे आदेश दिले.

९. टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी.एम करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी हिला टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक झाली होती. जेठमलानी यांनी तिची बाजू घेताना कोर्टात दावा केला की तिचा या प्रकरणाशी संबंध नाही, त्यामुळे तिला बेल देण्यात यावी. पुढे खटल्यात कनिमोळीच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने तिला दोषमुक्त करण्यात आलं.

१०. काळ्या पैशांचं प्रकरण

भारताबाहेर जाणाऱ्या काळ्या पैशाच्या विरोधात जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी म्हटलं होतं की भारताबाहेर जाणाऱ्या काळ्या पैशांवर नजर ठेवण्यात यावी. त्यांनी हेही नमूद केलं की सरकारने काळा पैसा भारतात आणण्याचं दिलेलं आश्वासन फक्त ‘भ्रम’ आहे. याचिका दाखल करण्यापूर्वी त्यांनी त्यावेळची अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून ते काळा पैसा भारतात आणण्यात सक्षम नसल्याचं सांगितलं होतं.

 

मंडळी, या सर्व केसेसनां बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जेठमलानी यांनी दोषीच्या बाजूने खटले लढले आहेत त्यामुळे त्यांना डेव्हिल्स अॅडव्होकेट म्हटलं जायचं. या दहा केसेस शिवाय त्यांनी बऱ्याच मोठ्या खटले लढले होते आणि खटल्यांचा चेहरामोहरा बदलला होता.

बोभाटाकडून राम जेठमलानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सबस्क्राईब करा

* indicates required