computer

दिनविशेष : नोकरशहांनी गांधीजींच्या स्टॅम्पचा घोळ घालून लाखो रुपये असे वाया घालवले!!

मंडळी, घोळ आणि त्यातही सरकारी घोळ आपल्याला काही नवे नाहीत. पण आज ज्या घोळाची माहिती आम्ही तुम्हांला सांगणार आहोत, तो भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा कदाचित सगळ्यात मोठा घोळ असेल. त्यात नियोजन आणि स्वदेशीची वाट तर लागलीच, पण पैसा प्रचंड प्रमाणात वाया गेला. आणि हे सगळं ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केलं गेलं, त्यांच्या विचारसरणीच्या पूर्ण विरोधी होतं. आम्ही सांगत आहोत गांधीजींच्या स्मरणार्थ छापल्या गेलेल्या स्टॅम्प्स म्हणजे टपाल तिकिटांबद्दल. बोभाटाच्या वाचकांसाठी आजचं दिनविशेष म्हणून खास हा लेख..

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जानेवारी १९४८ च्या महिन्यात पंतप्रधान नेहरू आणि तेव्हाच्या पोस्ट अँड टेलिग्राफ विभागाचे मंत्री रफी अहमद किडवाई यांनी महात्मा गांधीच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त ४ पोस्टाचे स्टॅम्प प्रसारित करण्याचे नक्की केले. तसा आदेशही नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला देण्यात आला. आठवड्याभराच्या आतच नाशिक प्रेसच्या मास्टरने ४ वेगवेगळ्या किमतीचे स्टॅम्प डिझाईन केले. दीड आणा, साडे-टीन आणा, आठ व १ रुपया, अशा वेगवेगळ्या किमतीचे स्टॅम्प बनवण्याचा प्रस्ताव पाठवला. यापैकी फक्त १ रुपयाचा स्टॅम्प २ रंगात छापला जाणार होता. बाकी तिन्ही एकाच रंगात छापले जाणार होते.

ही घटना २१ जानेवारी १९४८ ची. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ३० जानेवारी रोजी गांधीची हत्या झाली आणि ही योजना बारगळली. त्यानंतर गांधीजींना श्रद्धांजली म्हणून शक्य तितक्या लवकर ४ स्टॅम्प बनवण्याची योजना आखली गेली. सी बिस्वास या भारतीय कलाकाराने गांधीजींची रेखाटने बनवली होती. राखाडी आणि ऑलिव्ह ग्रीन या २ रंगात अडीच आण्याचा एक देशांतर्गत एअरमेल लेटरसाठी आणि परदेशी एअरमेलसाठी १२ आण्याचा स्टॅम्प तयार करायचं ठरलं.

(रफी अहमद किडवाई)

जवाहरलाल नेहरूंनी या स्टॅम्पवरती बापू हा शब्द हिंदी आणि उर्दूमध्ये छापला जावा असा आग्रह केला. बापूंच्या धार्मिक सलोख्याला मानवंदना द्यावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता. १२ मार्चला या स्टॅम्पमध्ये १० रुपयाचा एक वेगळा स्टॅम्प बनवावा अशीही सूचना देण्यात आली. नाशिक प्रेस ही सर्व तयारी करत असताना भारतीय लोकरशहा मात्र पडद्याआड भलत्याच उद्योगाला लागले होते. नाशिक प्रेसचे डिझाईन तयार होईपर्यंत त्यांनी ऑस्ट्रियन स्टेट प्रिंटींग प्रेस व्हियेना आणि स्विस प्रिंटर्स हेलिओ कोरव्हाईझर या दोन विदेशी छापखान्यांसोबत छापण्याची बोलणी सुरु केली. सरतेशेवटी नाशिक सिक्युरिटी प्रेसला छापाईची ऑर्डर न देता स्विस प्रिंटर्स हेलिओ यांना छापाईची ऑर्डर देण्यात आली. एका अर्थाने नाशिक प्रिंटींग प्रेसचा अवमान झाला असेच म्हणता येईल. रागावलेल्या नाशिक प्रेसच्या मास्टरने ताबडतोब राजीनामा देण्याची तयारी केली. रफी अहमद किडवाई यांनी मध्यस्थी करून नामुष्की टाळली.

गांधीजी असते तर त्यांनी ही टपाल तिकिटं देशाबाहेर छापण्यास नक्कीच विरोध केला असता, पण भारतीय नोकरशहांनी आपल्याकडे अत्याधुनिक फोटोग्रॅव्हिअर मशीन असे कारण सांगत त्यांच्या निर्णयाचे समर्थनच केले. छपाईची ऑर्डर देण्याचे निश्चित झाले, पण फोटो कोणता वापरावा याबद्दल शंका होती. अनेक फोटो तपासल्यावर लाईफ मासिकातला बापूंचा वर्ध्यातल्या आश्रमात काढलेला फोटो ठरवण्यात आला.

या फोटोतही एक वेगळीच समस्या होती. बापूचे शरीर त्यामध्ये उघडे होते आणि तो फोटो जसाच्या तसा छापणे अयोग्य ठरलं असतं. म्हणून त्या फोटोवर बापूंनी पंचा अंगावर पांघरला आहे असा बदल करण्यात आला. हे सगळे बदल केल्यानंतर एकूण ३.५ कोटी स्टॅम्प छापण्याची ऑर्डर स्विस कंपनीला देण्यात आली.

दीड आणे, ३.५ आणे, १२ आणे आणि दहा रुपयाचा असे स्टॅम्प छापण्याचे निश्चित करण्यात आले. १० रुपयांच्या स्टॅम्पवरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला. वाचकहो, लक्षात घ्या त्याकाळी १० रुपये म्हणजे सरकारी अधिकाऱ्याचे मासिक वेतन होते. हा १० रुपयांचा स्टॅम्प देशातल्या किती जणांना परवडला असता. याचा विचारही न करता हा स्टॅम्प छापण्याची ऑर्डर देण्यात आली. फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही १० रुपयांचा स्टॅम्प छापण्याबद्दल तीव्र निषेध नोंदवण्यात आला. टाईम लाईफ मासिकाच्या एका लेखिकेने वॉशिंग्टनमधल्या भारतीय दुतावासात जाऊन खडेबोल सुनावले. “जन्मभर पत्र लिहिण्यासाठी केवळ पोस्ट कार्डाचा वापर करणाऱ्या महात्म्याचा १० रुपयाचा स्टॅम्प बनवणं हा त्यांचा अनादर आहे.” अशा शब्दात निषेध नोंदवण्यात आला. या छापाईमध्ये आणखी काही घोटाळे झाले. तेही आता आपण वाचू.

सरकारच्या आदेशानुसार या स्टॅम्पची विक्री केवळ ३ महिन्यापुरती मर्यादित होती. याचा अर्थ असा की ३ महिन्यानंतर उरलेले सर्व स्टॅम्प नष्ट करावे लागले. सोबतच परकीय चलनही वाया गेले. ज्या स्विस कंपनीला ही तिकिटे छापण्याची ऑर्डर दिली होती. त्या स्विस कंपनीला भारतातल्या हवामानाची काडीमात्र माहिती नव्हती. त्यांनी उच्च दर्जाचा कागद छपाईसाठी वापरला, पण तिकिटाच्या मागे लावलेला गोंद भारतीय हवामानाला योग्य नाही हे त्यांच्या लक्षात आले नाही. परिणामी, जेव्हा स्टॅम्पच्या थप्प्या भारतात आल्या तेव्हा हवेतल्या आद्रतेने बरेचसे स्टॅम्प एकमेकांना चिकटून वाया गेले होते.

ज्या बापूंनी जन्मभर साधेपणात आयुष्य व्यतीत केले त्यांनी ही उधळपट्टी बघितली असती तर त्यांनी “नाठाळाचे माथी हाणू काठी” असं म्हणत हातातली काठी या नोकरशहांच्या डोक्यावर नक्कीच हाणली असती. पण करणार काय नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे नोकरशहांवर अवलंबून राहण्याखेरीज गत्यंतरच नव्हते.

हा गोंधळ संपतोय न संपतोय तोच थोड्याच दिवसात नोकरशहांनी एक नवीनच टूम काढली. भारताचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी यांच्या कार्यालयीन टपालासाठी बापुजींचे हेच स्टॅम्प ‘सर्व्हिस’ असे ओव्हर प्रिंटींग करून ही तिकिटे वापरायचे ठरवले. पोस्ट अँड टेलिग्राफ विभागाने ‘ही स्टॅम्प छपाईच्या नियमांची पायमल्ली आहे, कारण बापूंचे हे स्टॅम्प कोमोमोरेटिव्ह स्टॅम्प यामध्ये येतात. अशा ओव्हरप्रिंट करू नये’ अशी सूचना केली. पण त्याकडे लक्ष न देता सर्व्हिसच्या ओव्हरप्रिंटने ही तिकिटे छापण्यात आली. जगभरातल्या पोस्टाचे स्टॅम्प जमावणाऱ्या लोकांना (फिलाटेलिस्ट) हा अवमान सहन झाला नाही आणि त्यांनी त्यांचे निषेध नोंदवले.

बापू असते तर त्यांनीही त्यांचा निषेध नोंदवला असता, कारण ते स्वतःच फिलाटेलिस्ट होते. १० रुपयाच्या स्टॅम्पचा हा गोंधळ कदाचित इथेच थांबला असता. पण स्विस कंपनीने त्यामध्ये आणखी एक गोंधळ निर्माण केला. हा स्टॅम्प प्रसारित होण्यापूर्वी या स्टॅम्पवर स्पेसिमेन (नमुना) असा शब्द छापून बऱ्याच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हे नमुने पाठवले. दुर्दैवाने या नमुन्यातही एक घोडचूक होती. इंडिया आणि पोस्टेज या दोन शब्दांच्यामध्ये एक अनावश्यक पूर्णविराम टाकण्यात आला होता. भारतीय टपालखात्याने असे स्टॅम्प आपल्याकडे नसल्याचे जाहीर करून टाकले. त्यामुळे हा गोंधळ खरोखर झाला होता किंवा नाही याचा पुरावा भारतात तरी उपलब्ध नाही.

१९५१ साली महात्माजींच्या स्मृतीप्रित्यर्थ ४ पोस्टकार्ड प्रसारित केली. तेव्हा पोस्टकार्ड ९ पैशात मिळायचे. पण हे पोस्टकार्ड दीड आण्यात विकले गेले. या पोस्टकार्डामुळे एक नवा कायदेशीर वाद निर्माण झाला. यात छापलेल्या गांधीजींच्या फोटोचे सर्व हक्क कनू गांधी (गांधीजींचे नातू) यांच्याकडे होते. त्यांना न विचारताच हे फोटो वापरल्याने त्यांनी १२.५ टक्याची रॉयल्टी मागितली. शेवटी टपाल खात्याच्या मंत्री राजकुमारी अमृत कौर यांनी कनू गांधींची समजूत काढली आणि ५०० रुपयाची रॉयल्टी देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

(कनू गांधी)

यानंतर बापूंचे अनेक स्टॅम्प वेगवेगळ्या देशात प्रसारित करण्यात आले पण त्यामध्ये इंग्लंडमध्ये प्रसारित झालेला बिमान मलिक या कलाकाराने तयार केलेला गांधीजींचा स्टॅम्प हा जगात उत्कृष्ट दर्जाचा समजला जातो.

पाह्यलंत मंडळी? गांधीजींना श्रद्धांजली आणि आदर दाखवण्यासाठी छापल्या गेलेल्या तिकिटांचा उद्देश सफल झाला की नाही माहित नाही, पण सावळागोंधळ मात्र भरपूर झाला. यावरून सरकारने धडा घ्यायला हवा होता, पण ते झालं की नाही हे नंतरच्या सत्तरेक वर्षांच्या कामकाजावरून आपल्याला कळलंच आहे. तुमच्या घरच्या संग्रहात यातलं एखादं तिकीट असेल तर आमच्यासोबत त्याचा फोटो नक्की शेअर करा!!

सबस्क्राईब करा

* indicates required