निद्रा दिनानिमित्त वाचा चांगल्या झोपेसाठीच्या १० अंगी बाणवाव्या अशा युक्त्या!!

झोप प्रत्येक प्राण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीने रोज ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे हे तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेलाच असाल. झोप पुरेशी झाली नाही तर वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. या गोष्टीचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून मार्च महिन्यातला एक दिवस हा जागतिक निद्रा दिन म्हणून साजरा केला जातो.
चला तर निद्रा दिनानिमित्त या दिवसाबद्दल थोडी माहिती घेऊया.
‘चांगली झोप, चांगलं आयुष्य, चांगलं जग’ हे निद्रा दिनाचं ब्रीदवाक्य आहे. World Sleep Society संस्थेच्या अंतर्गत २००७ सालापासून दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक निद्रा दिन साजरा केला जातो. निद्रा दिनाची तारीख दरवर्षी बदलत राहते, पण बहुतेककरून शुक्रवारचा दिवसच निवडण्यात येतो.
आता तुम्ही म्हणाल की निद्रा दिन म्हणजे या दिवशी पूर्ण दिवस झोपा काढायच्या का? तर, तसं नाही. झोपेचं महत्त्व आणि त्याच्याशी निगडीत आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. २००७ सालच्या पहिल्या निद्रा दिनाचं कारणच जगभरातील आरोग्य तज्ञांना एकत्र आणून झोप या विषयावर चर्चा करण्याचं आणि त्याचं महत्त्व जगभर पोहोचवणं हे होतं. त्यानंतर पुढे हा प्रघातच पडला.
निद्रा दिनाच्या निमित्ताने World Sleep Society ने प्रत्येकासाठी १० टिप्स दिल्या आहेत, त्या आता पाहूया.
१. झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवून घ्या.
२. तुम्हाला जर दिवसभरात एका ठराविक वेळेत झोपायची सवय असेल, तर ती झोप ४५ मिनिट एवढीच मर्यादित असली पाहिजे.
३. झोपण्यापूर्वी ४ तास अगोदर मोठ्याप्रमाणात दारू किंवा तत्सम मादक पेय घेऊ नका.
४. झोपण्यापूर्वी ६ तास अगोदर कॅफेन हा घटक असलेले चहा किंवा कॉफी सारखे पेय घेऊ नये.
५. झोपण्यापूर्वी हलकंफुलकं खा. झोपायच्या ४ तास अगोदर पचनास जड, तिखट आणि अत्यंत गोड अन्न टाळा.
६. झोपण्यापूर्वी व्यायाम करू नका.
७. तुमचा बेड तुमच्यासाठी आरामदायी असायला हवा.
८. तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीचं तापमान तुमच्या झोपेसाठी अनुकूल असलं पाहिजे.
९. खोलीत प्रकाश कमी असेल आणि कोणत्याही आवाजाने तुम्हाला जाग येणार नाही याची काळजी घ्या.
१०. झोप आणि समागम (sex) यांच्यासाठी एक ठराविक वेळ निश्चित करा. झोपेच्यावेळेत काम करू नका आणि करमणुकीच्या साधनांपासून दूर राहा.
तर मंडळी, निद्रा दिनाच्या निमित्ताने आपल्या झोपेकडे खास लक्ष देऊया. या १० टिप्स पैकी तुम्हाला काय काय जमू शकतं?