आपल्या प्रजातीला एकट्याच्या दमावर वाचवल्यानंतर हा पठ्या घरी जातोय !!

यावर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही दियागो नावाच्या शंभरी गाठलेल्या कासवाची गोष्ट सांगितली होती. हे कासव ८०० पिल्लांचा बाप आहे. त्याने एकट्याने आपल्या संपूर्ण प्रजातीला लुप्त होण्यापासून वाचवलं आहे. आज पुन्हा त्याची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे ज्या कामासाठी त्याला आणलं होतं ते काम यशस्वी झाल्याने तो आता आपल्या घरी परतणार आहे.
दियागो हा ‘चेलोनोइडिस हूडेन्सिस’ प्रजातीतले कासव आहे. या कासवांची मोठ्या प्रमाणात शिकार झाल्याने ती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. त्यांना वाचवण्यासाठी आणि संवर्धनासाठी गॅलापागोस नॅशनल पार्कने १९६० च्या दशकात एक प्रजनन कार्यक्रम राबवला होता. यात शेवटचे २ नर आणि १२ मादी कासवांचा समावेश होता. एकदा का या कासवांची संख्या वाढली की त्यांना त्यांच्या मूळ निवासस्थानी सोडण्यात येणार होतं.
तर आज जवळजवळ ६० वर्षांनी ती वेळ आली आहे. दियागोसोबत एकूण २५ कासवांना न्यू मेक्सिको जवळच्या एस्पानोला येथे सोडण्यात येणार आहे. पण त्यापूर्वी या २५ कासवांना क्वारंटाइन केलं जाणार आहे. नाही. नाही.. कोरोनाव्हायरसमुळे नाही. हे कासव आपल्या सोबत एस्पानोला भागात न आढळणारी एखादी वनस्पती घेऊन जाऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी या कासवांना क्वारंटाइन केलं जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कासव स्वतः सोबत वनस्पती कसे नेतील? कासव जे खातात त्यातून या बिया त्यांच्या पोटात जाण्याची शक्यता असते आणि मलावाटे त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात.
तर मंडळी, ६० वर्षानंतर एक मोठी कामगिरी करून दियागो आपल्या मित्रांसोबत आपल्या मूळ गावी जात आहे. हे कोणत्याही पराक्रमापेक्षा कमी नाही. दियागोबद्दल पूर्ण बातमी वाचण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
या शंभरीपार कासवाने जन्माला घातली आहेत ८०० पिल्लं....अख्ख्या प्रजातीला वाचवणारा खरा हिरो!!