computer

१००व्या वाढदिवशी धावणारे आजोबा!! अंदाज बांधा, १०० मीटर अंतर पार करायला त्यांना किती वेळ लागला असेल?

दीर्घायुष्याचे रहस्य काय असे जर कुणी विचारले तर नियमित व्यायाम हेच उत्तर मिळेल. व्यायाम किंवा रनिंग यांचे महत्व ज्यांना समजते ते शेवटच्या श्वासापर्यंत या गोष्टी सोडत नाहीत. भारताचे प्रसिद्ध रनर मिल्खासिंग ही अगदी शेवटच्या काळापर्यंत धावत होते.

मात्र युकेमधल्या या आजोबांनी कमाल केली आहे. त्यांचं नाव आहे लेस्टर राईट. या आजोबांनी आपल्या १०० व्या वाढदिवशी धावण्यात विश्वविक्रम केला आहे. एकतर धडधाकट शंभरी गाठणे हेच महाकठीण. त्यात म्हाताऱ्याने धावून विक्रम केला. हे म्हातारं किती खमके असेल याचा अंदाज येऊ शकतो. १०० मीटर अंतर अवघ्या २६.३४ सेकंदात पूर्ण करत स्पर्धा जिंकली.

आता असा विक्रम काय हे लेस्टर आजोबा पहिल्यांदा करत आहेत असेही नाही. याआधी त्यांनी आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला तेव्हा २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विक्रम केला होता. आता आपल्या विजयाच्या सिक्रेटबद्दल आजोबा काय सांगतात पहा, "कुठल्याही स्पर्धेत उतरले तर विजयाच्या निर्धारानेच उतरले पाहिजे. कुणीही दुसरा-तिसरा क्रमांक येईल या आशेने का उतरतो हे मला कळत नाही."

आजोबांची जिद्द किती मोठी आहे हे तर यातून समजलेच असेल. सुरुवातीला आपण थोडे नर्व्हस होतो. पण ग्राऊंडवर पब्लिक पाह्यलं आणि मग आपल्याला हुरूप आला असेही आजोबा सांगतात. लेस्टर यांनी मात्र याही वयात मोप हवा केली आहे. सर्वच ठिकाणी आजोबांची चर्चा होत आहे.

लेस्टर २० वर्षांचे असल्यापासून धावण्याच्या स्पर्धा ते जिंकत आले आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांना रनिंग थांबवून युद्धात उतरावे लागले. युद्धातून परतल्यावर मात्र त्यांनी परत धावणे सुरू केले. गेले ४० वर्षं ते आपल्या बायकोसोबत मिळून डेंटल बिजनेस बघत आहेत. या कामात त्यांना बायकोने पण मजबूत साथ दिली आहे.

आता इथेच थांबणे आजोबांना पटणार नाही हे आता तुम्हालापण समजले असेल. येत्या काळात त्यांनी अजून विक्रम केले तर आश्चर्य वाटायला नको. एकच पॅशन घेऊन १०० वर्ष जगणे सोपे नसते. याबद्दल आजोबांचे कौतुक असायला हवे.

सबस्क्राईब करा

* indicates required