१०५ वर्षांच्या आजीबाईंना ‘पद्मश्री’ घोषित झालाय...त्यांच्या कामाबद्दल प्रत्येक भारतीयाने जाणून घ्यायला हवं!!

माणसाचं निवृत्तीचं नेमकं वय किती असावं? तुमचा अंदाज काय आहे ५०, ६०, ६५? परंतु आपला हा अंदाज साफ चुकवत एका १०५ वयाच्या आजीने आपल्या कार्याने भारताचा सर्वोच्च सन्मान मिळवला आहे.
तामिळनाडूच्या कोईमतूर मधील या चिरतरुण आजींचे नाव आर. पप्पाम्मल आहे. आणि त्यांचं वय फक्त १०५ वर्षे आहे. या वर्षीच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तरुणांनाही लाजवणारी त्यांची ही कहाणी वाचून तुम्हालाही नक्कीच सुखद धक्का बसेल.
पन्नास वर्षांपूर्वी, आर. पप्पाम्मल यांची आजी वारल्यावर त्यांच्यावर किराणा मालाचं दुकान चालवायची जबाबदारी आली, पण त्यांना शेतीची खूप आवड होती. त्यातही मुखत्वे सेंद्रिय शेतीवर त्यांचा भर होता. दुकानातील उत्पन्नातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून त्यांनी दहा एकर शेती विकत घेतली व अनेक वर्षे एकटीनं राबून ती सांभाळली. त्यात त्यांनी निरनिराळे प्रयोग केले. खत न वापरता सेंद्रिय पद्धतीने त्यांनी यशस्वी शेती केली.परंतु नंतर काही कारणासाठी ८० व्या वर्षी त्यातील काही जमीन त्यांना विकावी लागली. राहिलेल्या २.५ एकर जमिनीमध्ये त्या सेंद्रीय शेती करतात. त्यात विविध प्रकारची धान्य जशी बाजरी, डाळी, भाज्या आणि कॉर्नची लागवड करतात.
दररोज पहाटे ३ वाजता त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. पहाटे पासून दुपारपर्यंत त्या शेतीत काम करतात. आईवडील लवकर गमावल्याने त्यांना फारसे शिक्षण घेता आले नाही पण शेतीत कष्ट करण्याची अगदी लहानपणापासूनची सवय आहे. या वयातही शेतात गेल्या शिवाय त्यांचा दिवस जात नाही. त्या सर्वांना सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला देतात.
काही वर्षांपूर्वी त्यांनी आपला पती गमावला. त्या आता त्यांची मुलं आणि नातवंडांसोबत राहतात. गेल्या वर्षी कोविडमुळे त्यांना घरातच राहावे लागले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या सल्ल्याने त्यांना शेतीत मदत करतात. त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार आजींची जीवनशैली आणि चांगल्या खाण्याच्या सवयीमुळे त्या निरोगी आहेत. त्यांच्या आवडता पदार्थ मटण बिर्याणी आहे. त्या शेतात पिकवलेल्या भाज्या खातात. कुठलीही प्लेट त्या वापरत नाही. एका हिरव्या पानावरच त्या गरम गरम पदार्थ खातात. चहा, कॉफी त्या पीत नाहीत. फक्त कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. दात घासायला कडुलिंबाची काडी वापरतात.
त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित झाल्यापासून त्या सेलिब्रिटी झाल्या आहेत. अनेक पत्रकार, मीडियावाले त्यांची मुलाखत घेण्यासाठी रांगा लावत आहेत. आतापर्यंत त्यांनी ३० च्या वर मुलाखती दिल्या आहेत. अनेक फोटोही काढले आहेत. जेव्हा त्यांचा नातू त्यांना म्हणतो "आजी तू स्टार झालीस का?" तेव्हा आजी हसतात. अनेक वर्षे केलेल्या कष्टाचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.
सामान्य जनतेतील ‘असामान्य’ व्यक्तींना अचूक हेरुन त्यांचा यथोचित सन्मान करण्याची परंपरा पद्म पुरस्कारांच्या रूपाने चालत आलेली आहे. या आजींचा या वयातील उत्साह पाहून त्यांना मनापासून सलाम करावासा वाटतो.
तुम्हाला काय वाटत? लेख आवडल्यास जरूर शेयर करा.
लेखिका: शीतल दरंदळे