computer

११ भारतीय महिला गँगस्टर्स... त्यांच्या कहाण्या काय आहेत? कशा वळल्या या गुन्हेगारीकडे?

जगात आणि पर्यायाने भारतातही गुंड लोकांची काही कमतरता नाहीय. त्यातले बरेच लोक या ना त्या कारणांनी प्रसिद्ध आहेत. पण गुंड म्हणजे फक्त पुरुषच आहेत असे नाही. काही स्त्रियांनीही या क्षेत्रात बरंच नाव कमावलंय(!) आज अशाच काही भारतीय स्त्री गुंडांबद्दल थोडी माहिती आपण वाचणार आहोत. त्यांनी हा मार्ग का आणि कसा स्वीकारला, त्यांच्या आयुष्यात असे काय घडले की त्यांना हे सगळे करावे लागले. त्यांच्या खऱ्या आयुष्याची खरी कहाणी. अर्थात, यात त्यांचं उदात्तीकरण नक्कीच नाही.

१. नीता नाईक

अमर नाईक हा एक कुख्यात गुंड होता. त्याच्यावर अरुण गवळीच्या माणसांकडून हल्ला झाला तेव्हा लंडनमधे शिकलेल्या त्याच्या भावाने, आश्विन नाईक याने अमरच्या उद्योगाची सगळी जबाबदारी सांभाळली. त्याच्या सोबतीला त्याची बायको नीतादेखील होती. कालांतराने अश्विन नाईकवर हल्ला झाला आणि तो देश सोडून पळून गेला. तेव्हा मात्र नीता नाईकने सगळी जबाबदारी पेलली. थोडा काळ लोटल्यावर ती शिवसेनेमधे सामील झाली आणि नगरसेवका देखिल झाली.

२. रुबीना सिराज सईद

ती खास करून ओळखली जायची तिच्या आकर्षक दिसण्यावरून आणि तिच्या बडबडीमुळे. तिच्या खूप लोकांशी ओळखी होत्या आणि ती आतल्या गोटातली माहिती काढण्यात चपळ होती. ही माहिती ती पुढे आपल्या माणसांना पुरवायची. छोटा शकीलच्या टोळीतल्या असलेल्या लोकांना तुरुंगात ती अन्न, पैसे आणि शस्त्रास्त्रे पुरवायची. तिच्याबद्दल आता फारशी माहिती उपलब्ध नाही, पण असं म्हणतात की ती भायखळाच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

३. अंजली मकण

अंजलीच्या नावावर फसवणूक, बनावट कारभार, खोटेपणा यांसारखे गुन्हे दाखल होते. जेव्हा तिने बँकेचा १.५ करोडचा घोटाळा केला तेव्हा ती नजरेत आली, पण दुर्दैवाने तिच्या विरुद्ध एकही पुरावा सापडला नाही. मात्र तिच्यावर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस लागू केली होती.

४. अर्चना बालमुकुंद

ती ओळखली जायची तिच्या घायाळ करणाऱ्या अदांसाठी. पण तिची ओळख इतकीच नव्हती, ती ओम प्रकाश म्हणजेच बबलू या गुंडाची प्रेयसी होती. ती या टोळीमधे सामील होण्याआधी उत्तर भारतात तिच्यावर अपहरणाचे गुन्हे दाखल होते. नंतर तिने रहमानसोबत हातमिळवणी केली. पुढे तिचा पत्ता लागला नाही. असे म्हणतात की ती नेपाळमध्ये गोळी लागून मरण पावली.

५. बेला आण्टी

सत्तरच्या दशकात ही मुंबईच्या धारावीमधे बेकायदेशीर दारूचा धंदा करायची आणि तिला कुणाची आडकाठी नव्हती असं म्हटलं जातं. तिच्या बेकायदेशीर दारूच्या गाड्या येण्याजण्यापासून कोणी अडवू नये म्हणून ती पोलिसांना लाच द्यायची. इतकेच काय वरदराजन नावाचा त्याकाळचा मोठा डॉनदेखील तिला अडवू शकला नाही असं म्हणतात. 

६. जेनाबाई दारूवाली

सुरुवातीला अन्नधान्याची तस्करी करणारी जेनाबाई दारूवाली ही नागपाडामधे राहायची. तिच्या घरी करीम लाला, हाजी मस्तान यांच्या सारख्या बड्या डॉन मंडळींचं आणि काही अधिकाऱ्यांचं येणं जाणं होतं. एवढेच नाही तर हाजी मस्तान तिला मोठी बहीण मानायचा. तिची कधीच कोणती टोळी नव्हती, पण तिचा आदेश कधी कोणी मोडला नाही.

७. शिल्पा झवेरी

(समद खानची प्रेतयात्रा)

करीम लाला या गुंडाचा भाचा समद खानच्या संपर्कात आल्यानंतर शिल्पा झवेरी हे नाव लोकांसमोर आलं. शिल्पा झवेरीबद्दल प्रसिद्ध गोष्ट इथे सांगायला हवी. जेव्हा समद खान जामीनावर तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा दुसऱ्या एका केसमुळे पोलिस त्याला पकडण्यासाठी आधीच तयार होते. त्याचवेळी शिल्पा कार घेऊन वेगाने तिथे आली आणि समद खानला तिथून पळवून घेऊन गेली. पण समद खान वाचू शकला नाही. त्याचा त्याच्या शत्रूंनी खून केला. आज शिल्पा झवेरीचा फोटोही उपलब्ध नाही.

८. संतोकबेन जडेजा

त्यांना पाहता क्षणी कोणालाही विश्वास बसणार नाही की ती गँगस्टर आहे. ती दिसायला अगदी साधी चार चौघींसारखी गुजराती बाई होती. या बाईचा गुंडगिरीकडे येण्याचा प्रवास थोडा वेगळा आहे. संतोकबेन जडेजाच्या गिरणी कामगार असलेल्या नवऱ्याचा काही गुंडांनी खून केला होता. तिने पोलिसांकडे न जाता जे काही करायचे ते स्वतःच करायचे असे ठरवले. आपल्या विश्वासू माणसांना सोबत घेऊन संतोकबेनने त्या सर्व १४ गुंडांना संपवलं. तिला काठीयावाडच्या माफिया क्वीन म्हणून ओळखलं जायचं. पुढे जाऊन ती विधानसभेच्या सदस्यदेखील झाली होती.

९. अशरफ खान

या बाईला तिचा नवरा मेहमूद कालिया हा दाऊद इब्राहिमसाठी काम करत आहे हे देखील माहीत नव्हते. तो पोलिसांची गोळी लागून ठार झाला आणि तिला  त्यानंतर या सगळ्या गोष्टी समजल्या. दाऊदनेच तिच्या नवऱ्याला पोलिसांकरवी मारले होते. तिने मग दाऊदलाच मारण्याचा कट रचला. तिने शस्त्र चालवणे शिकून घेतले. आपले नाव बदलून सपना ठेवले. पण दाऊदसमोर ती टिकू शकली नाही. दाऊदने तिचाही काटा काढला.

१०. गंगुबाई कोठेवाली

या बाईचाही भूतकाळ खूप वाईट होता. तिच्या प्रियकराने तिला वेश्याव्यवसायात विकले होते. तिचे असे मानणे होते की जर माझे शरीर हे दुसऱ्याला सुख देण्यासाठी बनलेले आहे तर तिच्यासोबत कधीच कोणतेच गैरवर्तन होणार नाही. ज्या मुलींना खूप कमी वयात या व्यवसायात ढकलले जाते त्या मुलींसाठी तिच्या मनात वेगळी जागा होती, माया होती, ती त्यांची एखाद्या आई सारखी काळजी घ्यायची. तिच्या या दयाळू स्वभावामुळे तिला आजही कामाठीपुरा भागात पुजले जाते. संजय लीला भन्साळी तिच्यावर लवकरच सिनेमा घेऊन येत आहे. 

११. फुलन देवी

तिने खूप कमी वयात खूप काही पाहिले होते, खूप अन्याय सहन केला होता. ती अवघ्या ११ वर्षांची असताना तिचे एका मध्यमवयीन माणसासोबत लग्न झाले. खूप वर्ष तिच्यावर बलात्कार होत राहिला. त्यातून ती बाहेर पडली, मात्र त्यानंतर काही वरच्या जातीतील लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने त्या गोष्टीचा सूड घ्यायचे ठरवले आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांचा शोध घेतला आणि त्यांना मारून टाकले. त्या नंतर समाजवादी पार्टीमधून मिर्झापूर विभागासाठी तिने लोकसभा निवडणूक लढवली. मात्र शेवटी २५ जुलै २००१ मधे काही अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून तिला ठार केले.

 

ही खरंतर या बायकांची पूर्ण ओळख नाहीच, पण त्या काय होत्या याची चुणूक आहे. शबाना आझमीने यापूर्वी 'गॉडमदर' या सिनेमातून संतोकबेन साकारली आहे. श्रद्धा कपूरने हसिना पारकर पडद्यावर आणली होती आणि आता गंगूबाईवर सिनेमा येतोय. हे सिनेमे त्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण न करता त्यांचं खरं रूप दाखवोत हीच काय ती इच्छा आपण व्यक्त करु शकतो.

 

लेखिका: सायली सपकाळ

सबस्क्राईब करा

* indicates required