भारतीय इतिहासातील ११ अनाकलनीय रहस्य !!
हिस्ट्री टीव्हीवर ‘Ancient Alien’ नावाचा कार्यक्रम आपण पहिला असेल. त्यात जगभरातल्या ऐतिहासिक इमारती, घटनांमागे असलेलं अगम्य लॉजिक शोधून काढलं जायचं. त्यातील एक प्रसिद्ध प्रकरण म्हणजे पिरॅमिड्स. एका थियरी नुसार ‘पिरॅमिड्स’ हे परग्रहावरच्या लोकांनी बांधलेली वस्तू आहे. पिरॅमिड्सच्या निर्मिती मधल्या अश्या काही घोष्टी आजही कोडं आहेत, त्यातूनच लावलेला हा शोध.
मंडळी जशा जगभरात गूढ, अनाकलनीय गोष्टी विखुरलेल्या आहेत तशाच भारतातही काही गूढ आणि अगम्य रहस्ये आहेत ज्यांची उकल अजूनही झालेली नाही.
१. सिंधू संस्कृती नाहीशी होणे.
इजिप्शियन आणि मोसेपोटेमियन संस्कृतीपेक्षा मोठी अशी सिंधू संस्कृती काळाच्या ओघात नाहीशी झाली. जवळजवळ ४००० वर्ष जुन्या या संस्कृतीबद्दल अनेक गोष्टी आजही अनुत्तरीत आहेत. या भरभराटीस आलेल्या आणि प्रगत संस्कृतीचा नाश का झाला याची उकल अजूनही झालेली नाही.
२. चारामा येथील एलियन सदृश्य भित्ती चित्रे
छत्तीसगढ येथील चारामामधल्या गुहेत काही भित्ती चित्रे आढळून आली आहेत. या गूढ भित्तीचित्रात एलियनसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती आहेत आणि त्याच बरोबर उडत्या तबकड्या (युएफओ) सुद्धा आपण पाहू शकतो.
चकित करणारी गोष्ट म्हणजे आसपासच्या गावात ज्या स्थानिक देवता आहेत त्या उडणाऱ्या गोष्टींमधून जमिनीवर अवतरतात आणि गावातल्या लोकांना घेऊन जातात अशी एक धारणा आहे. याचा अर्थ त्या देवता नसून परग्रहावरची माणसे आहेत ? गुहेतल्या खडकावर काढलेली चित्रं काय दाखवण्याचा प्रयत्न करतात ??
३. सोन भंडार गुहा – राजगीर (बिहार)
सोन भांडार गुहेत एक असा दरवाजा आहे जो आजपर्यंत कोणीही उघडू शकलेला नाही. मंडळी, मगध देशाचा राजा बिम्बिसार याला जेव्हा त्याच्याच मुलाने अटक केली तेव्हा त्याच्या पत्नीने आपली संपत्ती या गुहेत लपवून ठेवली आणि सुरक्षेसाठी त्यावर दगडाचा भलं मोठं दार लावून टाकलं. या गुहेच्या मागच्या भिंतीतून गुहेत जाण्याचा मार्ग आहे आणि त्या दरवाजाच्यावर शंख लिपीत काही अक्षरं लिहून ठेवली आहेत. असं म्हणतात की त्यातच दरवाजा उघडण्याचा मार्ग आहे.
सोनभंडार या नावातच सोन्याचा साठा करण्याचं ठिकाण असल्याने अनेकांचं इकडे लक्ष वेधलं गेलं. इंग्रजांनीही प्रयत्न करून बघितला, पण त्यांनाही खजिना मिळवण जमलं नाही.
४. ९ अज्ञात व्यक्ती !!
हे ९ लोक कोण होते ते आजही कोडं आहे. इसवी सन पूर्व २७३ साली खुद्द सम्राट अशोकाने या नऊ जणांची नियुक्ती ज्ञानाचं भांडार असलेलं एक पुस्तक तयार करण्यासाठी केली होती. यात टाईम ट्रॅव्हलपासून सूक्ष्मजीवशास्त्र, तंत्रज्ञान सारखे विषय देखील होते. या अज्ञात व्यक्तींची नावे अजूनही जगासमोर आलेली नाहीत आणि असं म्हणतात की ही एक सिक्रेट सोसायटी असून यांच्या पुढील पिढ्या आजही कार्यरत आहे.
५. मीर उस्मानअलीचा खजिना !
हैद्राबादचे ओस्मानअली हे आज पर्यंतचे सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून ओळखले जातात. भारत स्वतंत्र झाल्यानंतर यांना आपली सर्व संपत्ती गमवावी लागली. पण असं म्हणतात की त्या संपत्तीचा काही भाग आजही त्यांच्या महालात लपवून ठेवला आहे. ती जागा कोणती हे कोडे सुटलेले नाही.
ओस्मानअली बद्दल आणखी वाचा :
'२३० अब्ज डॉलर' संपत्ती असलेला हा होता भारतातील सर्वात श्रीमंत माणूस !!!
६. बौद्ध लामाची ५०० वर्ष जुनी ‘ममी’ !
हिमाचलमधल्या लाहुल स्पिती भागातील गीयू गावात एक बौद्ध भिकूची ‘ममी’ आहे. असं म्हणतात की ही ममी ५०० वर्ष जुनी आहे. चकित करणारी गोष्ट म्हणजे या मृत लामाचे केस आणि नखं आजही जसेच्या तसे आहेत. विशेष म्हणजे इजिप्तसारख्या देशात मिळालेल्या ममी या झोपलेल्या अवस्थेत आहेत तर ही ममी बसलेल्या अवस्थेत आहे. या लामाच्या शरीराचे ममीमध्ये रुपांतर करताना कोणत्या गोष्टी करण्यात आल्या हे एक मोठं गूढ आहे
७. जयगढ किल्यातील शाही खजिना
बादशाह अकबरचा सेनापती ‘मान सिंह’ हा अफगाणिस्तानच्या मोहिमेवरून परतत असताना त्याने आपल्या बरोबर आणलेला खजिना जयगढच्या किल्ल्यात लपवल्याचं बोललं जातं. तो खजिना कुठे आहे हे कुणालाच माहिती नाही.
१९७७ साली इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये हा किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला. इंदिराजींनी या किल्ल्यात शोध मोहीम चालवली होती पण हाती काहीच लागलं नाही.
८. नानासाहेब अदृश्य होणे
१८५७ च्या संग्रामात भाग घेतलेले नानासाहेब जेव्हा इंग्रजांकडून पराभूत झाले तेव्हा ते आश्चर्यकारकरीत्या गायब झाल्याचं म्हटलं जातं. याशिवाय त्यांचा खजिना देखील इंग्रजांच्या हाती लागला नाही. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार नानासाहेब नेपाळमार्गे निघून गेले आणि जाताना त्यांनी आपल्या खजिन्याचा काही भाग आपल्या बरोबर नेला.
९. जैसलमेर मधील कुलधरा गाव !
पालीवाल ब्राम्हणांनी १३ व्या शतकात हे गाव वसवलं. या गावाला ‘भूतांचं गाव’ म्हटलं जातं. असं म्हणतात की हे गाव चक्क एका रात्रीत खाली झालं. या गावातील सर्व माणसं त्या रात्री अदृश्य झाली.
एका मान्यतेनुसार सलीम सिंह नावाच्या राजाच्या जाचक राजवटीतून सुटण्यासाठी या गावातील लोकांनी रातोरात पलायन केले आणि मागे एक प्रकारचा शाप सोडला. असं म्हणतात की या गावात कोणीच राहू शकत नाही, जर राहिला तर त्याचं मरण निश्चित असतं.
१०. सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू !
भारतीय इतिहासातील हे एक अत्यंत मोठं गूढ आहे. नेताजी तायपेई ते टोक्यो प्रवास करताना त्यांचा अपघात झाला असं खरं तर म्हटलं जातं. पण त्यांचा मृत्यू या पद्धतीने झालाच नाही किंबहुना ते जिवंत आहेत असाही तर्क लावण्यात आला.
बोस यांच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर काही वर्षांनी गुमनाम बाबा नावाचे बाबा चर्चेत आले, जे उत्तर प्रदेशमधील फैझाबादमध्ये आढळून आले असं म्हटलं जातं. हे बाबा म्हणजेच सुभाष बाबू अशी एक समजूत आहे.
अशीच एक मान्यता चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल सुद्धा आहे.
११. लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू
लाल बहादूर शास्त्री देशात सर्वांनाच एक आदर्श पंतप्रधान म्हणून ओळखीचे आहेत. १९६४ साली ते पंतप्रधान झाल्यानंतर केवळ २ वर्षांनी त्यांचा गूढ मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं जातं, पण त्यांच्या शरीरावर जखमेच्या खुणा असल्याचं दिसून आलं. दुर्दैव म्हणजे त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं नाही. त्यामुळे हे एक गूढ राहिलं.
लाल बहादूर शास्त्री हे पहिले पंतप्रधान होते ज्यांचा मृत्यू मायदेशी झाला नाही.
मंडळी, काही प्रश्न कधीच सुटत नाहीत म्हणतात ना ते असं !!!





