computer

जंबो जेटच्या यशस्वी उड्डाणाची ५१ वर्ष...वाचा ५१ वर्षांचा इतिहास !!

आपल्याकडे गल्लोगल्ली जंबो वडापाव लिहिलेल्या पाट्या दिसतील. आता ही जंबो संकल्पना आली कुठून ? तर एका विमानावरून. ज्या विमानामुळे या संकल्पनेचा जन्म झाला त्या ‘बोईंग ७४७’ उर्फ ‘जंबो जेट’ विमानाला यावर्षी ५१ वर्ष पूर्ण झाली. बोईंग ७४७ विमान तयार करण्यापूर्वी बोईंग कंपनीतर्फे ‘बोईंग ७०७’ विमानाची निर्मिती झाली होती. जंबो जेट येईपर्यंत ७०७ विमान जगातील सर्वात मोठं विमान समजलं जायचं. पण जंबो जेटचा आकार हा ७०७ विमानाच्या दुपटी पेक्षाही जास्त निघाला. जंबो जेट विमान त्याकाळातील एक क्रांतीकारक विमान होतं.

चला तर जंबो जेटच्या पन्नाशी निमित्त खास त्याबद्दल माहिती वाचून घ्या.

१. जंबो जेटचा जनक कोण ?

जंबो जेटचं डिझाईन ‘जो सटर’ या इंजिनियरने केलं. ‘जो’ हा बोईंग ७४७ विमानाच्या डिझाईन टीमचा प्रमुख होता. त्याच्या अफलातून कामगिरीसाठी त्याला ‘बोईंग ७४७ चा जनक’ म्हटलं जातं.

२. जंबो निर्मिती का करण्यात आली ?

लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी (जसे की न्यूयॉर्क ते लंडन) आणि तत्कालीन मागणीनुसार जास्तीतजास्त प्रवाशी नेता यावेत म्हणून ‘पॅन अमेरिकन एअरवेज’ने बोईंग कंपनी सोबत हातमिळवणी केली होती. एकप्रकारे जगातील सर्वात अवाढव्य विमान तयार करण्याचं आवाहनच ‘पॅन ॲम’ कंपनीने बोईंगला दिले होते.

३. जंबो जेटचं वैशिष्ट्य काय होतं ?

बोईंगने आवाहन स्वीकारत जंबो जेटची निर्मिती केली. जंबो जेट मधून एकावेळी तब्बल ४१६ प्रवासी प्रवास करू शकत होते. तसेच एकावेळी ३३३ टन ओझ्या सोबत उड्डाण भारता येत होतं. ही संख्या त्याकाळातल्या कोणत्याही प्रवाशी विमानाच्या क्षमतेपेक्षा जास्तं होती.

४. जंबो जेटला ३० सप्टेंबर रोजी वॉशिंग्टन, अमेरिका येथे पहिल्यांदा लोकांसमोर आणण्यात आलं. तेव्हा तब्बल ५० हजार लोकांचा जमाव त्याकाळच्या सर्वात मोठ्या विमानाला पाहण्यासाठी आला होता.

५. जंबो जेटचा आकार किती मोठा होता ?

२१० फुट लांब, आणि जवळजवळ १९५ फुट रुंद पंख तसेच उंची एवढी की सहा माजली इमारत तयार होईल. त्याकाळातल्या विमानप्रमाणे जंबो जेटची बनावट लांबीला जास्त आणि रुंदीला कमी अशी नव्हती. याउलट जंबो जेट लांबी व रुंदीला खरोखरच जंबो होता.

६. जंबो जेटला विकत घेण्यासाठी त्याकाळात एअरलाईन्सनी रांगा लावल्या होत्या. याला कारण फक्त आकार नव्हता तर जंबो जेटवर एकवेळच्या इंधनात जवळजवळ ८.५६० किलोमीटर पर्यंतचा प्रवास करता यायचा.

७. भारताचं आणि जंबो जेटचं नातं

भारतात जंबो जेट विमान आलं ते १९७१ साली. एअर इंडियाच्या ताफ्यात पाहिलं जंबो जेट ‘इम्पेरीयर अशोका’ या नावाने रुजू झालं होतं.

८. सर्वाधिक जंबो जेट कोणी विकत घेतले ?

८. बोईंग ७४७ विमान खरेदी करण्यात ब्रिटीश एअरवेज सर्वात पुढे राहिली आहे. त्याकाळात ब्रिटीश एअरवेजने १०१ प्रकारच्या वेगवेगळ्या ‘बोईंग ७४७’ विमानांचा ताफा विकत घेतला होता. आज त्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी ४०० बोईंग ७४७ विमानांचा ताफा आहे.

९. इस्राईलच्या मोहिमेतली जंबो जेटची उत्कृष्ट कामगिरी

९. वर म्हटल्याप्रमाणे प्रवाश्यांची मर्यादा ४१६ पर्यंत होती. पण पुढे जाऊन हा रेकॉर्ड स्वतः जंबो जेटनेच मोडला. झालं असं की, इस्राईलने इथिओपियन ज्यू लोकांच्या सुटकेसाठी जंबो जेटचा वापर केला होता. त्या मोहिमेत विमानात एकावेळी तब्बल १,१२२ लोक सामावले होते. मोठ्या प्रमाणात लोकांना आणता आल्याने इस्राईलची मोहीम फत्ते झाली होती.

१०. एका जंबो जेट मध्ये नासासाठी खास बदल करण्यात आलं होते. या जंबो जेटचा वापर चक्क अंतराळ यान वाहून नेण्यासाठी झाला.

११. मागच्या ५० वर्षांच्या काळात जंबो जेट मधून जवळजवळ ३५० कोटी लोकांनी प्रवास केला आहे. ही संख्या आजच्या जागतिक लोकसंख्येच्या अर्धी आहे राव.

१२. ५० वर्षानंतरची परिस्थिती

जंबो जेट प्रवाशी विमान म्हणून आणि मालवाहू विमान म्हणूनही उत्कृष्ट असल्याचं त्याच्या कामातून सिद्ध झालं. आजवर तब्बल १५०० जंबो जेटची निर्मिती झाली आहे. आज जवळजवळ सगळ्याच जंबो जेटचं रुपांतर मालवाहू विमानात झालं आहे

 

तर मंडळी, अशा या अवाढव्य जंबो जेटला आज ५१ वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल आपण माहिती तर वाचली. आता जंबो जेटची कविता पण वाचून घ्या.

जंबोजेट जंबोजेट

लंडन -मुंबै प्रवास थेट

जगलो वाचलो पुन्हा भेट

जंबोजेट जंबोजेट झुईई...

घराला धडक दाराला कडक

पकडली गाडी आणि निघाला तडक

विमानतळावर शोधतोय स्थळ

भारत सोडून काढतोय पळ

उंच आकाशामधले ढग

चमकून पाही सारे जग

भेदून गेले एक विमान

पंखावरती देऊन ताण

पंखाला त्या पंखे नव्हते

विमानाला शेपूट होते

वायू सागरी तरते जेट

जंबोजेट जंबोजेट झुईइई

सबस्क्राईब करा

* indicates required