computer

१२०० वर्ष जुना साबणाचा कारखाना सापडला आहे....त्याकाळी साबण कसा बनायचा जाणून घ्या !!

काही वर्षांपूर्वी आलेला ‘मोहेंजोदडो’ सिनेमा आठवतोय? त्या सिनेमाने आपल्याला तुलनेने फारशी माहिती नसलेल्या ’पुरातत्त्व संशोधन’ नामक खोलीच्या खिडक्या उघडून देत आत डोकावण्याची संधी दिली. ‘जो बीत गया उसका सच तुम्हे बताना अनिवार्य है। नहीं तो आनेवाली पिढी कभी जान न पाएगी मोहेंजोदडो की अच्छाई और सच्चाई।’ हे अगदी खरं आहे. आपल्या संस्कृतीचा वैभवशाली इतिहास अभ्यासायचा तर त्यासाठी पृथ्वीच्या पोटात शिरायला हवं. सर्वसामान्य माणसांना पुरातत्त्वज्ञ ही प्राचीन स्थळं कशी शोधून काढतो? याबद्दल नेहमीच कुतूहल असतं. अशाच एका उत्खननाने साबणाच्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे. ते ठिकाण आहे आपल्यापासून बरंच दूर. थेट इस्रायलमध्ये. पण त्यातून समोर आलेले निष्कर्ष नक्कीच रंजक आहेत.

राहत हे इस्रायलच्या सदर्न इस्रायल जिल्ह्यातील एक बदाऊनी शहर. होय, तेच ते बदाऊनी लोक ज्यांना आपण शाळेत असताना भूगोलात अभ्यासलंय. वाळवंटात राहणारे, भटके जीवन जगणारे आणि आपली अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपणारे. या दक्षिण इस्रायल जिल्ह्यात नेगेव्ह वाळवंटाचा मोठा परिसर येतो. मध्यंतरी हेच वाळवंट चर्चेत आलं ते उत्खननादरम्यान तिथे सापडलेल्या साबण निर्मितीच्या कारखान्यामुळे. हा कारखाना १२०० वर्षांपूर्वीचा आहे, म्हणजे नवव्या शतकातला. पण मिळालेल्या अवशेषांमधून त्या काळातल्या संस्कृतीचे निरनिराळे पैलू उघड झाले आहेत.

सोप फॅक्टरीच्या अवशेषांमधून हा कारखाना म्हणजे खांबांच्या साहाय्याने रचलेलं एक आलिशान व राजेशाही घर असल्याचं स्पष्ट होतं. तिथे बनवला जाणारा साबणही वैशिष्ट्यपूर्ण आणि भरपूर वेळ घेऊन बनणारा असा होता. आज बाजारात जो साबण मिळतो त्यापेक्षा खूपच वेगळा! यात ऑलिव्ह ऑइल आणि सॉल्टवॉर्ट प्लांट नावाच्या झाडाच्या लाकडाची राख वापरली गेली होती. हे झाड मुख्यतः दलदलीच्या खार्‍या जमिनीत, समुद्रकिनारी वाढणारं राजगिर्‍याच्या कुळातील झाड आहे. त्याच्या लाकडात पोटॅश क्षाराचं आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्याने त्याचा साबण निर्मितीत वापर केला जाई. ऑलिव्ह ऑइल आणि राख एका मातीच्या भांड्यात एकत्र कालवून नंतर हे मिश्रण आठवडाभर या भांड्यात शिजवलं जायचं.

त्यानंतर सुमारे १० दिवस हे मिश्रण घट्ट होण्यासाठी मोठ्या घंगाळात ओतलं जाई. त्यानंतर २ महिन्यांनी ते वड्या कापण्यालायक व्हायचं. ज्या ठिकाणी उष्ण हवामान, वारे आणि वाळवंट यामुळे वैयक्तिक स्वच्छता रोजच्या रोज करणं गरजेचं असायचं, तिथे साबण हा लोकांच्या घरातला आवश्यक घटक होता. हा साबण अरब देशांना निर्यात व्हायचा. उत्खननात सापडलेल्या अजून काही शिलालेखांवरून साबण बनवण्याची क्रिया सुमारे ५,००० वर्षांपूर्वीही प्रचलित होती आणि त्या साबणात चरबी, पाणी आणि सोडा वापरला जात असे हे समजतं.

पण हा साबण खरोखर शरीर स्वच्छतेसाठी वापरला जायचा की नाही हे मात्र समजलेलं नाही.

ही आणि अशी इंटरेस्टिंग माहिती प्रत्येक उत्खननाशी जोडलेली असते. हे काम आव्हानात्मक असलं तरी किती समाधान देणारं आहे! यातूनच आपल्याला आपला वारसा समजणार आहे. अगदी आपले पूर्वज कोण, ते कसे राहायचे, काय खायचे, कोणत्या प्रकारची भांडी वापरायचे इथपासून अमुक एक गोष्ट कशा प्रकारे बनवली जायची इथपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरं आणि हजारो रहस्यं जमिनीच्या पोटात दडलेली आहेत. ही रहस्यं बाहेर पडायची आणि जगाला आपली गोष्ट सांगण्याची वाट बघत आहेत.

 

लेखिका : स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required